अर्थशास्त्रावरील आज उपलब्ध ग्रंथांत ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हा सर्वात जुना ग्रंथ असून तोही धर्मसूत्र स्वरूपाचा ग्रंथ आहे.  त्यात, राज्य चालविण्याच्या अनेक विषयांसह विवाह, न्यायदान, स्त्रीधन,
अपराध आणि अपराध्यांना शासन, असे तत्कालीन धर्मशास्त्रीय विषय आलेले आहेतच.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी तत्कालीन भारत देशाच्या वायव्य दिशेकडून अफगाणिस्तानातील काबूल नदी ओलांडून आलेल्या आर्यवंशीयांनी त्यांच्या दक्षिणेला सिंधू नदी ओलांडल्यावर पूर्व दिशेला सरकत अनेक लहान-मोठय़ा नद्या ओलांडीत, अनेक आर्येतरांशी सम्मीलित होत त्यांनी गंगेच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेश व्यापिला. ही वाटचाल सुमारे दीड हजार वर्षांची असावी. या सम्मीलित समाजातील लोक हेच मुख्यत्वे आम्हा भारतीयांचे ‘प्राचीन पूर्वज’ होत. आर्याच्या प्रभुत्वामुळे या समाजाची जीवनपद्धती आर्यमूलक होती व त्यांच्या धर्माला ते ‘आर्य धर्म’ असे म्हणत असत. ‘हिंदू धर्म’ किंवा ‘हिंदू’ हे शब्दसुद्धा त्या काळी अस्तित्वात नव्हते. ते फार नंतर आलेले शब्द आहेत.
आम्हा भारतीयांचे मूलत: भटके असलेले हे प्राचीन पूर्वज जगातील इतर मानव समूहांपेक्षा ‘अतिशय कल्पक’ लोक असावेत असे वाटते. अर्धरानटी, भटक्या पशुपालन अवस्थेतून स्थिर, सुसंस्कृत, शेतीप्रधान समाजजीवनाकडे वाटचाल करणाऱ्या या लोकांनी त्या काळात, सबंध जगातील पहिल्या काव्यमय ग्रंथरचना करून त्या गुरू-शिष्य परंपरेने, पाठांतराने टिकवून ठेवल्या हेच मुळात आम्हा भारतीयांना अभिमानास्पद आहे. त्या प्राचीन वेदकाळात ‘धर्म’ हा शब्द वापरात होता व तो ‘आर्य समाजाचा घटक म्हणून, सृष्टीची व समाजाची धारणा होण्यासाठी व्यक्तीचे अधिकार आणि विशेषत: कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या’ या व्यापक अर्थाने वापरला जात होता, असे दिसते. धर्म या शब्दाचे अर्थ काल-प्रांत- परिस्थितीनुसार बदलतही राहिले असणारच; परंतु आजच्या ‘रिलिजन’ या संकुचित अर्थाचे धर्म त्या काळी नव्हते व त्या अर्थाने धर्म हा शब्दही त्या काळी वापरात नव्हता. तर मग या व त्यांच्यानंतरच्या प्राचीन भारतीयांचे धर्मशास्त्र असे काय होते ते आता पाहू या.
आजच्या हिंदू धर्माचे म्हणून जे प्राचीन धर्मवाङ्मय मानले जाते त्यात अधिकृततेच्या दृष्टीने अर्थातच ‘वेद वाङ्मयाला’ प्रथम स्थान असून, त्याच्याखालोखाल स्थान ‘धर्मसूत्रांना’ (किंवा सूत्रग्रंथांना) आहे. भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांच्या मते गौतम, बोधायन आणि आपस्तंब व नंतरची वसिष्ठ, विष्णू इत्यादी महत्त्वाची धर्मसूत्रे निश्चितपणे इ.स.पू. ६०० ते इ.स.पू. २०० या काळातील असली पाहिजे. (म. रा. सा. सं. मं. प्रकाशित ‘धर्मशास्त्राचा इतिहास’- पूर्वार्ध प्रकरण २) धर्मसूत्रांनंतर मनु आणि याज्ञवल्क्य यांसारख्या प्राचीन श्लोकबद्ध स्मृतींचा क्रम लागतो. त्यांच्यानंतर रामायण, महाभारत या आदिकाव्यांचा आणि त्यानंतर भागवतादी पुराणांचा क्रम लागतो. असे हे ग्रंथ कमी-अधिक अधिकृत मानले जातात. नंतरचा क्रम, स्मृतींवरील अनेक टीकांचा लागतो. तसे हे सर्व ग्रंथ शेकडय़ांनी भरतील व त्यातील काही हस्तलिखिते तर काही अनुपलब्ध आहेत.
सूत्रग्रंथांचे श्रौतसूत्रे, गृह्य़सूत्रे व धर्मसूत्रे असे तीन प्रकार असतात व या तिन्ही प्रकारांचा एकत्रित उल्लेखसुद्धा धर्मसूत्रे (किंवा कल्पसूत्रे) असा केला जातो. श्रौतसूत्रात ‘विविध यज्ञांसंबंधी नियम’ सांगितलेले असून, गृह्य़ सूत्रात मुख्यत्वे ‘कौटुंबिक धर्मविधी’ (कर्मकांड) सांगितलेले असतात. धर्मसूत्रात मुख्यत्वे ‘वैयक्तिक आचरणांसंबंधी नियम’ सांगितलेले असतात. विवाह, संस्कार, ब्रह्मचाऱ्यांनी पाळायचे नियम, पाहुण्यांसाठी मधुपर्क विधी, तसेच श्राद्धासारखे काही विषय ‘गृह्य़सूत्र’ व ‘धर्मसूत्र’ या दोहोंत असतात. धर्मसूत्रांचे कार्यक्षेत्र गृह्य़सूत्रांपेक्षा अधिक विस्तृत असते व त्यांचा मुख्य हेतू शिष्टाचार व कायदा यासंबंधी नियम सांगण्याचा असतो.
धर्मसूत्रे संपूर्ण गद्यात किंवा गद्यपद्यमिश्रित अशी असतात व त्यांची भाषा सामान्यत: स्मृतींच्या भाषेपेक्षा अधिक प्राचीन असते, कारण मुख्य स्मृतिरचना या मुख्य सूत्रग्रंथांच्या नंतर दोन-चारशे वर्षांनी झालेल्या आहेत, तसेच धर्मसूत्रांतील काही सूत्रे ही प्रत्यक्षात त्या त्या वेदसंहितेतून घेतलेल्या वेदवचनेत असतात व त्यातील विषयांची स्मृतींप्रमाणे सुसंबद्ध अशी रचना केलेली नसते. मुख्य मुद्दा असा की, धर्मसूत्रांचे रचिते स्वत:ला दिव्य दृष्टी असलेले ऋषी अथवा ‘देवादी अतिमानव कोटींतील व्यक्ती’ असे म्हणवीत नाहीत. वेदोपनिषदांनंतरच्या काळात असे मानले जाऊ लागले की, वैदिक वाङ्मयात जे विधिनिषेधपर नियम वर्णनाच्या ओघात आलेले आहेत; परंतु तिथे ते सुसंगतपणे सांगितलेले नाहीत, तेच धर्मशास्त्रात म्हणजे सूत्रग्रंथ, स्मृतिग्रंथ इत्यादींत सुसंगतरीतीने सांगितलेले आहेत. उदा. विवाहांचे निरनिराळे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे पुत्र, संपत्तीची विभागणी, वारसा हक्क, स्त्रीधन, श्राद्ध वगैरे. त्यामुळे सूत्रांना व स्मृतींना, श्रुतींचा (वेदांचा) आणि शिष्टाचारांचा आधार आहे, असे मानले गेले. महान संस्कृत व्याकरणकार ‘पाणिनी’ हा इ.स.पू. ६०० च्या आसपास होऊन गेलेला असल्यामुळे काही धर्मसूत्रांची भाषा, पाणिनीय भाषेच्या जवळची आहे, असे दिसते.
अर्थशास्त्रात राजाच्या कर्तव्यासंबंधी व न्यायदानादिकांसंबंधी विवेचन असते, पण धर्मशास्त्रावरील पुष्कळ ग्रंथांतसुद्धा राजाच्या कर्तव्यासंबंधी नियम सांगितलेले असतात. अर्थशास्त्र व धर्मशास्त्र या दोन शास्त्रांची उद्दिष्टे व ती प्राप्त करून घेण्याचे मार्ग भिन्न असल्यामुळे जरी काही जण ती पूर्णत: वेगळी शास्त्रे मानीत असले तरी त्या प्राचीन काळात साधारणत: मानीत त्याप्रमाणे अर्थशास्त्राला धर्मशास्त्रानेच एक अंग मानणे योग्य आहे. अर्थशास्त्रावरील आज उपलब्ध ग्रंथांत ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हा सर्वात जुना ग्रंथ असून तोही धर्मसूत्र स्वरूपाचा ग्रंथ आहे. ‘जगावर स्वामित्व कसे मिळवावे व आपले राज्य कसे राखावे’ हा जरी या ग्रंथाचा मुख्य विषय असला तरी त्यातही धर्मशास्त्रासंबंधी महत्त्वाची माहिती आलेली आहे. साधारणत: असे मानले जाते की, पूर्व युरोपातील ग्रीसमधून भारतात आक्रमण करून आलेल्या सम्राट अलेक्झांडरच्या समकाळी म्हणजे इ.स.पू. ३२० च्या सुमारास होऊन गेलेल्या सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या विष्णुगुप्त किंवा चाणक्य किंवा ज्याला ‘कौटिल्य’ असेही म्हणतात त्या मंत्र्याने इ.स.पू. ३०० च्या सुमारास हा ग्रंथ रचला आहे. या कौटिल्याने तत्पूर्वीच्या काळात, गर्विष्ठ व अन्यायी बनलेल्या नंदराजाचा स्वकर्तृत्वाने नि:पात करून त्याचे राज्य हस्तगत केले व ते चंद्रगुप्त मौर्याच्या हाती सुपूर्द केले आणि मग हा ग्रंथ रचला असे मानले जाते तेच खरे असावे.
या कौटिल्याला चारही वेदांची माहिती होती. एवढेच नव्हे तर सांख्य, योग, लोकायत या प्राचीन संप्रदायांचेही उल्लेख त्याच्या ग्रंथात आहेत. त्याचा ग्रंथ अर्थातच संस्कृत (पाणिनीय) भाषेत असून, त्या काळी राज्यकारभाराची भाषासुद्धा संस्कृत होती, असे कौटिल्याने म्हटले आहे. कौटिल्याला वनस्पतींची आणि औषधांचीही आश्चर्यकारक माहिती होती, असे त्याच्या ग्रंथावरून दिसते. कौटिल्याच्या या अर्थशास्त्रावरील ग्रंथात, राज्य चालविण्याच्या अनेक विषयांसह विवाह, न्यायदान, स्त्रीधन, अपराध (गुन्हे) आणि अपराध्यांना शासन, असे तत्कालीन धर्मशास्त्रीय विषय आलेले आहेतच.
कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ म्हणते की, जगात चार मुख्य विद्या आहेत. त्या अशा : १) त्रयी, २) वार्ता ३) दंडनीती व ४) अन्विक्षिकी. त्रयी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तीन वेद, ज्यात धर्म सांगितला आहे. वार्ता म्हणजे वाणिज्य, शेती व उद्योगधंदे या उपजीविकेच्या साधनांचे विवेचन, तिसरी ‘दंडनीती’ म्हणजे राष्ट्रकंटकांचा उच्छेद करण्यासाठी वापरण्याची ‘राजनीती’ आणि या तिन्ही विद्यांची चिकित्सा करणारी सर्वश्रेष्ठ विद्या ‘अन्विक्षिकी’ ही होय.
कौटिल्याने अन्विक्षिकीचा अर्थ ‘सांख्य, योग व लोकायत’ असा सांगितला आहे; पण सांख्य व योग ही प्रतिष्ठित आस्तिक दर्शने आहेत. त्यांच्याबरोबर लोकायत या नास्तिक दर्शनाला सर्वश्रेष्ठतेचे स्थान कसे? ‘लोकायत’चा केवळ ‘तर्कविद्या’ एवढाच अर्थ लावला तरी नास्तिकांच्या तर्कविद्येला वेदांची चिकित्सा करण्याचा हक्क कसा?
गौतम बुद्धाच्या महान क्रांतीनंतर यज्ञ, चातुर्वण्र्य व एकूणच वैदिकतेच्या विरोधात जे वातावरण निर्माण झाले त्यात या कौटिल्याचा उदय झाला व त्याचा प्रभाव पडला. मौर्याच्या राजवटीत कौटिल्याचे अर्थशास्त्र टिकून राहिले, पण पुष्यमित्र शृंगाने मौर्याचे राज्य घेतल्यावर (लोकायताचा आदरयुक्त उल्लेख केलेला असल्यामुळे) कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ कुठल्या कुठे गडप झाले व मनुस्मृतीसारखे वर्णवर्चस्वावर उभे असलेले ग्रंथ लिहिले गेले व मान्यता पावले. गडप झालेले कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ इ.स. १९०९ मध्ये म्हणजे गेल्या शतकात संशोधित होऊन आता उपलब्ध झालेले आहे.

 शरद बेडेकर

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास