‘राम कर्ता’ ही भावना मनात बिंबत नाही तोवर तो जप ‘समजून’ होत नाही. असा जप भावनाहीन असल्याने, ‘राम कर्ता’ या भावनेचा अभाव त्यात असल्याने जपातून जी शांतता, तृप्ती, विश्राम मनाला लाभला पहिजे, तो लाभत नाही. उलट भावनाहीन जप आणि मनात अशाश्वत दुनियेचं काहूर यामुळे मन अधिकच अस्थिर आणि अस्वस्थ होतं. एखाद्या संकटाच्या भीतीनं आपल्याला ग्रासलं असताना आपला जप कसा चालतो, याचं निरीक्षण करावं. मनाची अतिशय तगमग सुरू असते. ‘काय करू नि काय नको,’ असं आंदोलन मनात उफाळत असतं. माळ ठेवावी आणि त्या संकटाबाबत काहीतरी तातडीनं करावं, अशी ऊर्मीही उसळत असते. ‘श्रीमहाराज योग्य तेच घडवतील,’ असं एक मन म्हणत असतं. पण ‘जे घडेल ते योग्यच असेल ना?’ अशी शंका लगेच दुसरं मन उत्पन्न करीत असतं. अशाश्वत दुनियेतील अशाश्वत परिस्थितीनं भेदरलेल्या मनाला जपाकडे वारंवार खेचणं मोठं नाजूक काम असतं. मन जपाकडे वळत असताना हाच विचार करावा लागतो, अरे ज्या मंत्रातून चराचरावर सत्ता असलेल्या भगवंताचा पुकारा मी करीत आहे, तो मला सांभाळणार नाही का? माझ्या इच्छेतच काहीतरी खोट असेल. प्रत्यक्षात जे घडेल ते माझ्या हिताचंच असेल. तेव्हा जप करताना मधेच दुनिया मधेच परमात्मा अर्थात श्रीमहाराज असं स्मरण चालत असतं. दुनियेचं स्मरण सुरू झालं की चिंता आणि भीतीनं मन अशांत, अस्वस्थ होणारच. श्रीमहाराजांचं चिंतन-स्मरण सुरू झालं तर मन शांत होणारच. श्रीमहाराजही सांगतात- ‘‘साधन कोणतेही असले तरी भगवंताचे स्मरण हेच सर्व साधनांचे वर्म आहे. नुसते साधन शांतता देत नाही. त्यामधील स्मरण शांतता देते.’’ (बोधवचने, अनु. १०६) तेव्हा नेम ‘उगीच’ करू नये. तो उगीच केला, अर्थात नुसता तोंडानं केला पण भावनेनं केला नाही तर त्यातून खरी शांतता, खरी निश्चिंती, खरा लाभ प्राप्त होणार नाही. तेव्हा ‘प्रथम नेम करावा पण फार नेम करू नये,’ या वाक्यातील नेम म्हणजे नेमका काय, हे जाणण्याचा आपण प्रयत्न केला. त्यातून ‘फार नेम’चा रोख थोडा तरी स्पष्ट होईल. ‘फार’ म्हणजे अवडंबर. फार नेम म्हणजे अवडंबरयुक्त नेम. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तिच्या विरहानं किंवा काळजीनं व्याप्त असता त्यात अवडंबर असतं का? तुम्ही तुमची नित्याची सर्व कामं करीत असता पण आतून त्याच व्यक्तिचा विचार आणि काळजी सुरू असते. तरीही कुणाला काही कळू नये, असाच प्रयत्न तुम्ही करीत असता. सर्व कर्तव्यं पार पाडत असता, नेहमीसारखं वागत आणि वावरत असता पण आतून तुम्ही जगाचे नसता! भगवंताचं खरं, आर्त स्मरण हे असंच असतं. ‘बा रे पांडुरंगा केव्हा भेटी देशी, जाहलो परदेशी तुजवीण’ ही आर्त हाक मनात असते पण देह याच परक्या दुनियेत वावरत असतो. सर्व कर्तव्यं करीत असतो. दुनियेत राहून भगवंताचा पुकारा करणारी नाम ही ती आर्त हाक आहे. पण ही फार पुढची स्थिती. नेमाच्या प्रारंभीच ‘फार’चा सापळा अलगद लागतोच आणि त्यात भल्याभल्यांना तो अडकवतोच.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री