News Flash

व्हेनेझ्युएलातील ‘प्रतिक्रांती’

व्हेनेझ्युएलातील ताचिरा राज्यातील एक छोटीशीच घटना. तेथील सान क्रिस्तोबलमधील एका विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. त्या घटनेने विद्यार्थी संतापले. रस्त्यावर उतरले. त्यातून आंदोलनाची ठिणगी पडली

| February 25, 2014 01:04 am

व्हेनेझ्युएलातील ताचिरा राज्यातील एक छोटीशीच घटना. तेथील सान क्रिस्तोबलमधील एका विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. त्या घटनेने विद्यार्थी संतापले. रस्त्यावर उतरले. त्यातून आंदोलनाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता देशभर ते पसरले. गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून व्हेनेझ्युएला धगधगतो आहे. राजधानी कराकसला युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. अनेक शहरांत हा प्रतिक्रांतीचा वणवा भडकला आहे. आंदोलक आणि सुरक्षा दले यांच्यात चकमकी सुरू आहेत. अनेक सरकारी कार्यालये आंदोलकांच्या दगडांचे आणि पेट्रोल बॉम्बचे लक्ष्य बनल्या आहेत. या हिंसाचारात आजवर किमान आठ जण मारले गेले आहेत. त्यात व्हेनेझ्युएलातील एका सौंदर्यसम्राज्ञीचाही समावेश आहे. सरकारविरोधी मोर्चात सहभागी झालेल्या त्या महाविद्यालयीन विद्याíथनीला कोणा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घालून मारले. या घटनेचे पडसाद थेट अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये गेल्या शुक्रवारी हजारो नागरिकांनी व्हेनेझ्युएला सरकारविरोधात निदर्शने केली. या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे – निकोलास मदुरो यांनी अध्यक्षपद सोडावे. देशात अन्नतुटवडा आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. लोकांना साबण आणि कागदी रुमालसुद्धा महाग झालेत. सुरक्षेची ऐशीतशी झाली आहे. रस्त्यांवर गुंडांचे राज्य आहे आणि सरकार बोलायचेही स्वातंत्र्य देत नाही. यापासून त्यांना सुटका हवी आहे. त्या सुटकेचा एकच मार्ग त्यांना दिसतो आहे – मदुरो यांचे सरकार उलथवून लावणे. मुख्य धारेतील जागतिक प्रसारमाध्यमांतून समोर येते ते हे व्हेनेझ्युएलाचे चित्र. ते अर्थातच खरे आहे. व्हेनेझ्युएलामध्ये आज भय आणि भूक हे मोठे प्रश्न आहेतच. चलनवाढीचा अधिकृत दर ५६ टक्के असलेल्या देशात अन्य काय असणार? या ‘अराजका’च्या विरोधात लोकांमध्ये, खरे तर शहरी मध्यमवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहेच. इतका की रस्तोरस्ती आंदोलक आणि सुरक्षा दले यांत चकमकी सुरू आहेत. पण ही नाण्याची एक बाजू झाली. हा खरा संघर्ष आहे तो जुनी समाजवादी राज्यपद्धती आणि बाजारप्रेरित जागतिकीकरणाच्या शक्तींमधला, चाव्हिस्मो आणि उजव्या भांडवलशाहीमधला. आणि हा संघर्ष आजचा नाही. ह्य़ुगो चावेझ यांनी व्हेनेझ्युएलातील तेलउद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्यापासून तो सुरू आहे. हे असे िहसक आंदोलनही आजचे नाही. याआधीही तशी आंदोलने झाली होती. चावेझ यांच्याविरोधात तर एकदा लष्करी उठाव झाला होता. परंतु व्हेनेझ्युएलातील गरीब जनतेने अखेर चाव्हिस्मोच्या, चावेझ यांच्या राज्यपद्धतीच्या बाजूनेच आपले मत दिले. चावेझ यांचे वारस निकोलास मदुरो हेही निवडणुकीच्या माध्यमातूनच अध्यक्षपदी आले. ती निवडणूक अवैध झाल्याचा प्रचार झाला. परंतु त्यात तथ्य नव्हते. आता मदुरो यांच्या विरोधकांनी देशाच्या बिघडलेल्या आíथक स्थितीआडून राजकीय लढाई सुरू केल्याचे दिसत आहे. या विरोधकांना अमेरिकेचा पािठबा आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. अमेरिकेच्या अर्थसंकल्पातच व्हेनेझ्युएलातील सरकारविरोधी कारवायांसाठी पाच दशलक्ष डॉलरची तरतूद आहे. गेल्या दीड दशकात असा किती अधिकृत आणि अनधिकृत निधी व्हेनेझ्युएलात ओतला गेला याचा तर अंदाजही नाही. अमेरिकेच्या आíथक साम्राज्यवादी धोरणानुसारच हे सुरू आहे. मदुरो यांनी निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी हा निकाल नामंजूर असल्याचे म्हटले होते, ही अत्यंत बोलकी गोष्ट आहे. या संघर्षांचा शेवट काय होतो ते लवकरच दिसेल. पण त्यातून एक मुद्दा समोर आला आहे. एखादे निवडून आलेले सरकार उलथवून लावण्यासाठी असा िहसक आंदोलनांचा मार्ग अनुसरावा की निवडणुकीचा? लोकशाहीसाठी अखेर काय चांगले असते? आपल्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2014 1:04 am

Web Title: revolution in venezuela
टॅग : International News
Next Stories
1 गोदावरीचे अश्रू..
2 उमेदवार निवडीची कसोटी..
3 श्रीनींचा धोनी!
Just Now!
X