कितीही नाकारले, तरी आपल्या सर्वाच्याच मनात जात, धर्म, वंश, कूळ यांचा छुपा अभिमान असतोच. त्यामुळे इटालियन वंशाच्या सोनिया गांधी भारतीय राजकारणात आल्या की, आपला राष्ट्रवादी बाणा भलताच कासावीस होतो आणि श्रीकांत श्रीनिवासन यांच्यासारखा भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेतील उच्चपदी जाताच आपण त्याची अलाबला काढण्यास सज्ज होतो. आपल्या सामाजिक विचारसरणीतील ही विसंगती प्रारंभीच नोंदविल्यानंतर आता आपण श्रीनिवासन आणि अमेरिका यांचे हार्दकि कौतुक आणि अभिनंदन करण्यास मोकळे आहोत. अमेरिकेचे कौतुक अशासाठी की, त्या देशाने हे सातत्याने सिद्ध केलेले आहे की, क्षमता आणि बुद्धिमत्तेसमोर त्वचारंग, धर्म-वंश अशा गोष्टी अगदीच गौण असतात. प्रामुख्याने ओबामांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अमेरिकेतील विविध क्षेत्रांमध्ये, अनेक सत्तास्थानांवर भारतीय वंशाच्या नागरिकांच्या नियुक्त्या झालेल्या दिसून येतील. श्रीकांत श्रीनिवासन ऊर्फ श्री हे त्याच यादीतले एक पुढचे नाव. त्यांची नुकतीच अमेरिकेच्या कोलंबिया जिल्ह्याच्या फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली. अमेरिकेतील विविध राज्यांची मिळून एकूण १३ कोर्ट ऑफ अपील्स आहेत. त्यातील डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया या ‘सर्किट’मधील हे न्यायालय सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे पाहता या पदावर प्रथमच एका आशियाई व्यक्तीची नियुक्ती झाली, तिचे महत्त्व लक्षात यावे. अमेरिकी पद्धतीनुसार राष्ट्राध्यक्षांनी त्यांची या पदासाठी निवड केली आणि गेल्याच आठवडय़ात सिनेटने तिला एकमताने मान्यता दिली. सहसा असे होत नसते. पण श्रीनिवासन हे जरी ओबामांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असले, तरी ते व्यक्तिश: निष्पक्षपाती असल्याची सिनेट सदस्यांची खात्री होती.  त्याला श्रीनिवासन यांची गेल्या १८ वर्षांची वकिलीची कारकीर्द साक्षी होती. श्रीनिवासन हे स्टॅनफर्ड विद्यापाठीचे पदवीधर आहेत आणि ‘स्टॅनफर्ड लॉ स्कूल’ आणि ‘स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस’मधून त्यांनी कायदा व व्यापारविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. वयाच्या चाळिशीतच ते वॉशिंग्टन डीसीमधील ‘ओमेल्वेनी अँड मेयर्स’ या प्रतिष्ठित कायदे कंपनीचे भागीदार बनले. आज ते अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या न्यायालयातील न्यायाधीश आहेत आणि आतापासूनच त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. चंदीगढमध्ये जन्मलेल्या अवघ्या ४६ वर्षीय युवकाचे हे यश भारतीयांची छाती फुलवणारे असेच आहे. तसे पाहता श्रीनिवासन यांचे भारताशी नाते जन्मस्थळापुरतेच आहे. ते नागरिक आहेत ते अमेरिकेचे. तेव्हा त्यांच्या यशाने एवढे हुरळून जाण्याचे कारण काय, असा किरकिरा सवाल कोणी विचारू शकतो. एन्रॉनचे घोटाळेबाज अध्यक्ष जेफ्री स्कििलग यांची वकिली त्यांनी केली होती, याकडेही कोणी बोट दाखवू शकतो. परंतु अशा नियुक्त्यांकडे केवळ वांशिक अभिमानाच्या चष्म्यातून पाहता कामा नये. त्याला महासत्तेच्या कारभारातील भारतीयांचा वाढता सहभाग हे महत्त्वाचे परिमाण आहे. ही बाब भारताच्या हिताची ठरू शकते. (संदर्भासाठी आठवा : अमेरिकेतील ज्यूंची फळी आणि अमेरिका-ज्यू संबंध.) एकंदर अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांची फळी अशीच ‘श्रीमंत’ होत जाणे, ही भारतासाठी समाधानाचीच बाब आहे.