अस्त आणि उदय हे कालचक्राचे वास्तविक परिणाम असले, तरी अस्त आधी की उदय आधी, हा प्रश्न कोंबडी आणि अंडे न्यायासारखाच सनातन आहे. रात्र संपली की उजाडते आणि प्रत्येक उजाडलेला दिवस मावळतोच, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याने, या दोन्हीचे दृष्टान्त सर्वत्र समान पद्धतीने लागू पडतात. राजकारणातदेखील उदय आणि अस्तपर्व अस्तित्वात असतात. कोणतीच गोष्ट शाश्वतपणे टिकत नाही, तरीही अस्ताला गेलेल्या कोणत्याही गोष्टी कायमच्या नष्ट होत नाहीत, हादेखील या न्यायाचाच दृष्टान्त आहे. तब्बल २६ वर्षांपूर्वी, देशाच्या राजकारणात अशाच एका शक्तीचा उदय झाला होता. जनता दल या नावाने अनेक पक्षांची एक मोट बांधली गेली होती. विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जनमोर्चा, भारतीय लोकदल, जनता पार्टी, काँग्रेस-एस यांसारख्या पक्षांनी एकत्र येऊन जनता दलाची स्थापना केली. पुढे काही वर्षे देशातील जनतेने या दलाची शकले होतानाच पाहिली. आता त्या जनता दलाची केवळ द्विदल रूपे उरलेली दिसतात. नितीशकुमार यांचे संयुक्त जनता दल आणि देवेगौडा यांचे धर्मनिरपेक्ष जनता दल.. बाकीची सारी दले जशी एकत्र आली, तशी बाजूलाही झाली आणि आपापल्या स्थानिक राजकीय गरजांनुसार अस्तित्वाचे राजकारण करू लागली. बिहारचे सत्ताकारण नजरेसमोर ठेवून लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल स्थापन केले, तर नितीशकुमारांनी संयुक्त जनता दल नावाने पक्ष पुढे सुरू ठेवला. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादवांनी समाजवादी पार्टी स्थापन केली. थोडक्यात, जनता दलाचा उदय झाल्यानंतर काही वर्षांतच त्याची शकले होऊन त्याचा अस्तदेखील झाला, पण आता तो जनता दलाचा सूर्य राजकीय क्षितिजावर    पुन्हा उदयाला येऊ पाहात आहे. एक मोठी रात्र संपवून नव्याने    उदयाला येणारा हा पक्ष आता भाजपच्या सत्तेसमोर तळपण्याची तयारी करू लागला आहे. २६ वर्षांपूर्वीचा तो पक्ष ज्यांनी स्वत:च्या पाठीवर वाहून अस्ताच्या दिशेने नेऊन ठेवला, त्यांनीच पुन्हा नवी ऐक्याची मोट बांधून त्या पक्षाला पुन्हा उदयाच्या दिशेने आणण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्या जनता दलातून अगोदर बाहेर पडलेल्या मुलायमसिंग यादव यांच्याच खांद्यावर या वेळी नव्या उदयाचा भार आहे. बरोब्बर २६ वर्षांपूर्वी, ऑक्टोबर १९८८ मध्येच त्या जनता दलाची स्थापना झाली होती. आज पुन्हा त्या जनता दलाच्या पुनरुज्जीवनाची स्वप्ने मुलायमसिंगांच्या घरी त्याच सर्वानी रंगविली. ‘नवे वर्ष, नवा पक्ष’ ही नव्या पक्षाच्या उदयाची स्वागत घोषणाही तयार झाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात निवडणुकांची चाहूल सुरू झाली आहे. बिहारमध्ये लालू-नितीश युतीचे अपेक्षित परिणाम दिसल्याने, मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला आतापासूनच नव्या जोर बैठका काढाव्या लागतील, यात शंका नाही. अर्थात, अनेक पक्ष एकत्र आले की निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा वाढतो, हे उदाहरण नवे राहिलेले नाही. त्यातून सन्मानपूर्वक तोडगा काढण्याची कसरत कोण करणार आणि त्यानंतरच्या मानापमान नाटय़ाचे सूत्रधार कोण असणार, हा मुद्दा सध्या तरी नव्या जनता परिवाराने फारसा मनावर घेतलेला नसल्याने, जनता दलाचा नवा सूर्योदय तरी विनासायास होऊ शकतो. परिवारवाद हे या कडबोळ्यातील जवळपास सर्वच नेत्यांचे समान दुखणे आहे. त्यामुळे जागावाटपात केवळ निवडून येण्याची किंवा भाजपला आव्हान देण्याची क्षमता हा निकष कठोरपणे राबविला जाईल का हे आत्ताच सांगणे अवघडच आहे; पण उदयास्ताचा सिद्धान्त कितीही खरा असला, तरी उदयाआधीच अस्ताकडे डोळे लावणे योग्य नाही, हेच खरे! त्यामुळे नव्या उदयपर्वाची प्रतीक्षा करण्यात काहीच गैर नाही.