नाझी क्रूरकर्मा हिटलरच्या शुद्ध आर्य वंशाभिमानाच्या भंपक कल्पनेने केलेले यहुद्यांचे शिरकाण हा विसाव्या शतकावरचा मोठा डाग. हिटलरने उभारलेल्या त्या छळछावण्या, केलेला नरमेध यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कहाण्या अजूनही जग विसरलेले नाही. पण त्यातून मानवजातीने काही शहाणपणा घेतला आहे असे दिसत नाही. आजही हिटलरचे ‘वंश’ज देशोदेशी दिसत आहेत. कधी ते युगोस्लाव्हियात सर्ब विरुद्ध क्रोएट विरुद्ध बोस्नियन मुस्लीम असा वंशविच्छेदाचा क्रूर राष्ट्रीय खेळ खेळत आहेत. तेथे मुस्लिमांच्या झालेल्या शिरकाणाबद्दल अश्रू ढाळणारे इस्लामिक खिलाफतीचे धर्मयोद्धे आज सीरिया आणि इराकमध्ये याझिदी, तुर्कमन, शबाक, ककाई, साबियन आणि शिया मुस्लिमांचे बीजसुद्धा शिल्लक राहू नये म्हणून ‘धर्मयुद्ध’ करीत आहेत. हिटलरचे यहुदींबाबतचे धोरण आणि याझिदींबाबतचे ‘इस्लामिक स्टेट’चे धोरण यात काडीमात्र फरक नाही. या याझिदींच्या टोळ्या हरप्पा संस्कृतीच्या अखेरच्या कालखंडात सुमारे चार हजार वर्षांपूर्वी िहदुस्थानातून मध्यपूर्वेत स्थलांतरित झाल्याचे अभ्यासक सांगतात. त्यांच्यानंतर सुमारे सहा हजार वर्षांनी त्यांच्याचप्रमाणे िहदुस्थानातून स्थलांतरित झालेल्या रोिहगा या इंडो-आर्यन वंशाच्या लोकांवर आज वंशविच्छेदनाची तलवार टांगलेली आहे. हे रोिहगा धर्माने मुस्लीम. ब्रिटिश काळात जगण्याच्या शोधात त्यांच्या टोळ्या ब्रह्मदेशात (म्यानमार) स्थलांतरित झाल्या. त्यातल्या काही पूर्व बंगालात होत्या. आज इतक्या वर्षांनी त्यांना पुन्हा एकदा तेथील ‘घेटों’मधून पळ काढावा लागत आहे. आयुष्यभराची किडुकमिडुक कमाई पिशवीत भरून कुटुंबेच्या कुटुंबे जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या बोटी आणि होडक्यांतून शेजारच्या इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडच्या आश्रयाला जात आहेत. हे देश तरी कुठे त्यांच्या स्वागताला तयार आहेत? तेव्हा तेथे जायचे ते लपूनछपूनच. त्यासाठी मानवी तस्कर असतात. त्यांना भरमसाट पसे देऊन निघायचे, परंतु मुक्कामी पोचण्याची हमी नाही. अशा २१० जणांच्या बोटी भर समुद्रात सोडून तस्करांनी पळ काढला. हालहाल होऊन ते मेले. काहींच्या बोटी किनाऱ्याला लागल्या. त्यातले अनेक जण तेथे मेले. उरलेसुरले कसेबसे सरकारी छावण्यांत पोचले. त्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलले एवढेच. गेल्या जानेवारीपासून हे चालले आहे. पण त्याची सुरुवात सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वीच झालेली आहे. ब्रिटिशांनी रोहिंगांना म्यानमारमध्ये नेऊन वसवले. तेथे बौद्धधर्मीय राखीन आणि रोहिंगा यांच्यात आतले आणि बाहेरचे असा संघर्ष सुरू झाला. दंगली आणि शिरकाणे झाली. पुढे स्वातंत्र्यानंतर म्यानमारने रोिहगांची राष्ट्रीयताच काढून घेतली. जगात कोणालाच नको असलेले हीच त्यांची ओळख बनली. १९७८ नंतर तर त्यांची परिस्थिती अधिकच वाईट बनली. त्यांना म्यानमार सरकारने एकदा बांगलादेशी मुस्लीम ठरवले म्हटल्यावर त्यांना सरकार काही देणे लागतच नव्हते. उलट ती देशापुढची मोठी समस्या ठरली. बौद्ध धर्मीयांची मते मिळवण्यासाठी त्याचा जेवढा उपयोग तेवढाच. त्या छळाला कंटाळून अनेक रोिहगा बांग्लादेशात पळाले. त्यात अर्थातच आगीतून फुफाटय़ात जाणे एवढाच फरक होता. तेथे त्यांच्या साह्य़ाला धर्मही येऊ शकला नाही. आज तेथील छळ आणि हाल यांना कंटाळून अनेक जण पळत आहेत, मरत आहेत. एकविसाव्या शतकातील जग धार्मिक आणि वांशिक कट्टरतावादापुढे किती हतबल आहे याची ती मरू घातलेली उदाहरणे आहेत..