राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणीही माजी नसतो. एकदा का संघाचे स्वयंसेवकत्व स्वीकारले की स्वीकारले. तेव्हा मा. गो. वैद्य हे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे काही म्हणाले त्यामुळे उठलेल्या वादळावर खुलासा करताना ते संघाचे माजी पदाधिकारी आहेत, असे सांगणे ही पळवाट झाली. वैद्य हे संघाचे अधिकृत प्रवक्ता होते. संघाच्या विचारांशी बांधल्या गेलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे ते संपादकही होते. प्रदीर्घ काळ प्रवक्तेपदावर राहिल्यानंतरही त्यांची मुक्त मतप्रदर्शनाची हौस मिटलेली नाही. ते असेच चालू ठेवता यावे यासाठी त्यांनी ‘तरुण भारत’मध्ये स्तंभलेखन सुरू ठेवले. परंतु त्यामुळे ‘तरुण भारत’ची पंचाईत झाली. मागोंनी व्यक्त केलेले मत हे संघाचेच मत आहे असे समजले जाऊ लागले आणि ही बाब संघ आणि दैनिक दोघांनाही अडचणीची ठरू लागली. अखेर तो स्तंभ बंद करण्याचा निर्णय ‘तरुण भारत’च्या संपादकांना घ्यावा लागला. तुमचे लेखन नको, पण मत आवरा असे म्हणावयाची वेळ संघाच्या अन्य मुखपत्रांवरही आली. ‘पाञ्चजन्य’, ‘ऑर्गनायझर’ आदी नियतकालिकांत त्यांना लिहावयाचे होते. परंतु तेथेही त्यांना लिहिण्यास मनाई करण्यात आली. वस्तुत: आपले मत छापण्यास कोणीच तयार नाही यामागील अर्थ त्यांना कळावयास हवा होता. तो कळला असता तर त्यांनी शांतपणे घरी बसणे पसंत केले असते. सुज्ञांनी तसेच करावयाचे असते. परंतु आपल्या शहाणपणाची गरज समाजास अजूनही आहे असा त्यांचा ठाम समज असल्याने त्यांनी अखेर इंटरनेटचा आसरा घेतला आणि तेथे ते लिहू लागले. याबाबतीत त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या पावलावर पाऊल टाकले, असे म्हणावयास हवे. नेतृत्वाच्या स्पर्धेतून निवृत्त केले गेलेले अडवाणी हेदेखील आपले मुक्तचिंतन इंटरनेटच्या मायाजालात करीत असतात. मागो यांचे तेच सुरू आहेत. राजकारणातील, त्यातही विशेषत: संघ परिवारातील, अनेकांना समाज आपल्या दिशादर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे, असा भास होत असतो. त्यामुळे येता-जाता ते आपल्या मतांची पिंक टाकीत असतात. मागो हे यास अपवाद नाहीत हे पुन्हा एकदा दिसले. नितीन गडकरी यांचे पूर्ती उद्योग चव्हाटय़ावर आल्याने त्यांच्या विरोधात काहूर उठले आहे. जेठमलानी पितापुत्र, जगदीश शेट्टर, इतकेच काय जसवंत सिंग, यशवंत सिन्हा आदींचे मत असे की, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने गडकरी यांनी पदत्याग करायला हवा. तसा तो केला नाही तर गडकरी अध्यक्ष असणे हे भाजपसाठी अडचणीचे ठरेल, असे यातील अनेकांना वाटते. मागो हे या गडकरी टीकाकारांशी सहमत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, गडकरी हटाव मोहिमेमागे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा हात आहे. साक्षात मागोंनीच हे मत व्यक्त केल्याने भाजप आणि संघ या दोन्ही संघटनांच्या नेत्यांना आपले तोंड लपवावे लागले. मागो यांच्या मताशी संघ अजिबात सहमत नाही, हा खुलासा करण्याची वेळ त्यामुळे संघाचे अधिकृत प्रवक्ते मनमोहन वैद्य यांच्यावर आली. या वैद्य घराण्यात संघाचे प्रवक्तेपद आनुवंशिक आहे, असे म्हणावयास मागो यांचा प्रत्यवाय नसावा. मध्यंतरी मागो यांनी आपल्या एका लेखात काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीकाप्रहार केला होता. त्या पक्षात सगळेच कोण कोणाच्या पोटी जन्माला आलेला आहे यावर ठरते, असे त्यांचे म्हणणे. हा मुद्दा संघाला लागू होत नाही, असे मागोंचे मत असणार यात शंका नाही. त्यामुळे मागो यांच्यानंतर संघाचे प्रवक्तेपद त्यांच्याच चिरंजीवांकडे आले, हा आपण केवळ योगायोगच समजायला हवा. तेव्हा पित्याचे मत जाहीरपणे खोडून काढण्याचे काम चिरंजीवास करावे लागले. इतकेच काय, पण मागो हे ज्यांचे हितचिंतक मानले जातात त्या नितीनभौ गडकरी यांच्यावरही मागोंचे मत फेटाळण्याची वेळ आली. संघाचे सर्व पदाधिकारी आणि भाजपचे मुख्यमंत्री एकदिलानेच काम करीत आहेत, तेव्हा मागो जे काही बोलले ते योग्य नाही, असे गडकरी यांना सांगावे लागले. इतके सर्व झाल्यावर आपण जे काही बोललो ते वैयक्तिक मत होते आणि ते मागे घ्यायचे काहीच कारण नाही, असे मागो म्हणाले. तेव्हा वैयक्तिक मत म्हणजे काय, असा प्रश्न त्यांना विचारावयास हवा. ते मत वैयक्तिक होते तर त्यांनी मुळात ते चव्हाटय़ावर मांडलेच कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा या प्रकरणात संघ आणि भाजप दोघांचीही शोभा झाली. हे टाळण्यासारखे होते.
परंतु तरीही ते टळले नाही याचे कारण भाजपतील गटातटांच्या राजकारणात आहे. नरेंद्र मोदी यांच्या झपाटय़ाने अनेकांना नाराज केले आहे, हे लपून राहिलेले नाही. मोदी हे संघाच्या आणि भाजपच्या डोक्यावरून थेट जनतेशी संवाद साधू शकतात आणि त्यांची एकंदरच मोठी प्रतिमानिर्मिती अनेकांना रुचलेली नाही. त्यात मागोंचे चिरंजीव मनमोहन आणि मोदी यांच्यातील संबंधांतही काहीच मनमोहन नाही. तेव्हा चिरंजीवाच्या प्रेमापोटी मागोंनी मोदी यांच्यावर दोषारोप केला, असेही बोलले जाते आणि त्यात तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. वास्तविक आपला आणि भाजपचा काहीही संबंध नाही आणि त्या पक्षाने आपले दुकान स्वत:च चालवावे, असा दावा संघाकडून वारंवार केला जातो. तो खरा मानला तर मागोंना भाजपमध्ये काय सुरू आहे, याची उठाठेव करण्याचे काहीच कारण नाही. परंतु तसे होत नाही. याचे कारण भाजप आणि संघ दोघेही दुटप्पी आहेत. भाजपने आपणास वाटते तसेच चालावयास हवे अशी स्वच्छ भूमिका संघाने एकदाची घेतली तर ते प्रामाणिकपणाचे ठरेल. परंतु भाजपला पूर्ण स्वातंत्र्यही द्यायचे नाही आणि नियंत्रणाची जबाबदारीही घ्यायची नाही, हे संघाचे धोरण आहे. त्यामुळे ना भाजपचे भले होते ना संघाचे. आतापर्यंत या दोघांतील लैत अनेकदा समोर आले आहे. माजी सरसंघचालक सुदर्शन यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे कार्यालयप्रमुख ब्रिजेश मिश्र यांच्यावरच टीकेची झोड उडवली होती. तीही याच दुटप्पी धोरणाचा भाग होती. दत्तोपंत ठेंगडी हे संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी. त्यांनीही भाजपच्या विविध धोरणांवर आणि त्यातही वाजपेयी यांच्यावर टीका केली होती. तेव्हा भाजप ही आपली मक्तेदारी आहे, हे संघाने एकदा मान्य करावे आणि उघड सत्ताकारणात यावे. आताही संघाचा आशीर्वाद आहे म्हणूनच गडकरी भाजपाध्यक्ष पदावर विराजमान झाले हे सत्य आहे आणि तो पाठिंबा आहे म्हणूनच इतक्या वादळानंतरही ते तेथे टिकून आहेत, हेही सत्य आहे. नपेक्षा संघाचे स्वघोषित नैतिक आणि हिशेब तपासनीस एस गुरुमूर्ती यांनी गडकरी यांना स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्याची गरज नव्हती. भाजपच्या अध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर त्याच्या खुलाशाची उठाठेव गुरुमूर्ती यांनी का करावी? गुरुमूर्ती यांच्या प्रमाणपत्राने संघ अगदीच उघडा पडला. एरवी नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या संघाने गडकरी यांच्या संदर्भात नैतिकतेला किती आणि कशी मूठमाती दिली आहे हेही यातून दिसून आले. उद्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या काँग्रेसजनांनीही असेच अंतर्गत प्रमाणपत्र मिळविल्यास ते संघाला चालणारे आहे  काय?
तेव्हा आता जे काही सुरू आहे त्यामुळे संघ आणि भाजप हे दोघेही गोंधळलेले आहेत की काय, असे वाटू शकेल. अशा वातावरणात ज्येष्ठांनी परिपक्वता दाखवीत मार्ग दाखवणे अपेक्षित असते. परंतु येथे हे ज्येष्ठच आहे त्या गोंधळात भर टाकताना दिसतात. ते घालणारे भाजपच्या आजारावर उपचार सुचविणारे वैद्य आहेत की पक्षाचे कसाई हा प्रश्न सामान्य भाजप कार्यकर्त्यांस पडल्यास आश्चर्य वाटायला नको.