काळ बदलत असतोच, तसा बदलणारच होता.. पण करड, पाकिटं, अंतर्देशीयं हेही बदलेल, असं ४० वर्षांपूर्वी इथं कुणाला वाटलं होतं? ईमेलचा पहिला वापर जगात १९७२ साली झाला, तेव्हा मुंबईत ‘दूरदर्शन’ पहिली पावलं टाकत होतं.. गेल्या २० वर्षांमध्ये खूप बदललं सगळं. अगदी आपल्यासकट! त्या बदलांच्या सांध्यांमध्ये, फटींमध्ये अडकलेलं बरंच काही तसंच राहिलं…
घरात पत्रं यायची तेव्हा कुणीतरी घरात नक्की असायचंच. म्हणजे पत्रपेटी वगैरेचं फॅड नव्हतं तेव्हा. घरंही उंच नव्हती म्हणा. पोस्टमनच्या वेळा सहसा ठरलेल्या असायच्या. तास दोनतास इकडे तिकडे झाल्यानं फारसा फरक पडण्याचं कारण नव्हतं. दळण टाकायला गिरणीत जायचं किंवा वाण्याकडे जायचं, तर घराला कुलूप घालण्याऐवजी शेजारच्या काकूंना घराकडे लक्ष ठेवायला सांगता यायचं. काकूही आपलं घर सोडून शेजारच्या घराची प्रेमानं राखण करीत. तेवढय़ात कुणी शेजारच्या घरी पाहुणा आला, तर त्याला आपल्या घरी बसवून घेत. चहापाणीही करीत. त्याच वेळात पोस्टमन आला, तर त्यानं दिलेली पत्रंही त्या अगदी जिवापाड जपत असत. साधं पोस्टकार्ड म्हणजे चव्हाटाच. काय लिहिलंय, ते सहज कळू शकायचं. ख्यालीखुशाली कळवण्यासाठी किंवा अगदीच व्यावहारिक माहिती कळवण्यासाठी, म्हणजे ‘गावाला येऊन पोहोचलो. प्रवासात त्रास झाला नाही. इकडे सगळं ठीक आहे. तिकडे सगळं ठीक असेलच. काळजी घ्या..’ यासारखे निरोप देण्यासाठी हे पोस्टकार्ड बरं पडत असे. स्वस्तही असे आणि वेळेत पोहोचतही असे. जरा जास्त मजकूर लिहायचा असेल किंवा थोडं खासगी वगैरे लिहायचं असेल, तर त्यासाठी आंतरदेशीय पत्र नावाचा एक कागद सोयीचा असतो. त्यात ‘प्रिय.. तुझाच’ सारखे मायने आणि सह्या लिहिता येतात. पाकीट ही कल्पना तर त्याहूनही छान. हवं तेवढं लिहा. पाकिटबंद करा आणि द्या धाडून.
अमेरिकेतून आलेला शेजारचा दिलीप जेव्हा कधी यायचा, तेव्हा काहीतरी अद्भुतकथा सांगायचा. तिकडं लोकं पत्र वगैरे लिहायच्या भानगडीत पडत नाहीत म्हणे. आधीच एकमेकांशी बोलण्याची मारामार. त्यात मेलसारखं साधन. सतत एकमेकांना काहीतरी लिहून पाठवत असतात. उत्तराची अपेक्षा करत बसतात. क्षणार्धात उत्तर येतं. घरात काही कामात असाल आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादा मेल आला, तर कळावं यासाठी घंटा वाजते. हे सगळं वीसेक वर्षांपूर्वीचं. म्हणजे कम्प्युटरला आता आणखी बरंच काही शिकवण्यासाठी अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी विडाच उचलला तेव्हाचं. चाळीस वर्षांपूर्वीपासून हे मेल नावाचं प्रकरण तिथं अस्तित्वात आहे. आणि त्यात सतत बदल होताहेत आणि हे तंत्र अधिकाधिक लोकप्रिय होतंय. आता परिस्थिती अधिक बदललीये असं तो म्हणत होता.
तेव्हा आपल्याकडे खास पोस्टमन तार घेऊन यायचा. नेहमीची पत्रं वाटणारा आणि तार आणणारा असे वेगवेगळे पोस्टमन असत आणि दिवाळीत दोघंही पोस्त मागायला यायचे. तारवाला क्वचितच आनंदी बातमी आणायचा. म्हणजे कुणी बोर्डात वगैरे आलं, की तेव्हा तार यायची घरी. एरवी बहुतेक तारा कुणाच्या तरी निधनाच्या वार्ता सांगणाऱ्या
किंवा मृत्युशय्येवर असल्याची माहिती देणाऱ्या. तारा इंग्रजीत असत. घरात कुणी सुशिक्षित नसेल, तर तारवालाच अर्थही समजावून सांगायचा. म्हणजे ‘तातडीनं निघा – बापू’ किंवा ‘अण्णा आज सकाळी निवर्तले’. प्रत्येक शब्दाला पैसे पडत असल्यानं कमीतकमी शब्द वापरणं भाग पडायचं तेव्हा. पोस्ट खात्यात तेव्हा खूप सर्जनशील माणसं असल्यामुळे मग त्यांनी लग्नाच्या शुभेच्छा देणाऱ्या, बाळ झाल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या अशा दहा बारा प्रकारच्या तारांचे मजकूर निश्चित करून टाकले होते. आपण फक्त क्रमांक सांगितला की काम व्हायचं.
सकाळी उठल्यावर पेपर वाचायच्या आधी कम्प्युटर सुरू करून टाकला. काही लिहायचं म्हणून नाही, तर काय लिहून आलंय, ते पाहायला; म्हणजे मेल वाचण्यासाठी. वृत्तपत्रं वाचण्यापूर्वी मेल वाचले की रात्रभर काय घडलं, याचा एक अंदाज येतो. कुणी कुणी लगेचच आपल्या मेलला उत्तर देतो, तर काही जण अगदी तंत्रशत्रू असल्यासारखे खूप वेळ घेतात. हे मेल प्रकरण म्हणजे तारेचाही बाप आहे. तार एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचायलाही काही क्षण लागायचे. इंटरनेटवरची मेल पोचायला पापणी लवायचाच काय तो अवकाश. जगात कितीतरी जण असे कम्प्युटरला चिकटून बसलेले असतात; मेलची वाट पाहात. त्यांचा मेलबॉक्स सतत उघडाच असतो. पत्र आलं की लगेच पाहायचं, त्याला उत्तर द्यायचं. पत्र किती मोठं लिहायचं, यावर कसलंच बंधन नाही. शिवाय कागद शोधत बसायला लागत नाही. सगळं कसं पर्यावरणपूरक!
वृत्तपत्रांना पत्र पाठवायचं, तर केवढी धांदल उडते आजकाल. घरात कोरे कागद असत नाहीत. मुलांच्या वह्य़ांची पानं फाडावी लागतात. मग पेन शोधावं लागतं. मग त्या कागदावर आपले विचार सुसंगतपणे लिहावे लागतात. खाडाखोडीनंतर एक शेवटचा खर्डा तयार झाला, की मग पाकिटाची शोधाशोध. मग पोस्टाच्या तिकिटासाठी थेट पोस्टात जायचं. रांगेत उभं राहून तिकिटं घ्यायची. ती त्या पाकिटावर चिकटवण्यासाठी महायुद्ध खेळायचं. कारण त्या तिकिटाला मागच्या बाजूस असलेला िडक पुरेसा नसतो. खळ नामक जो प्रकार पोस्टात ठेवलेला असतो, तो सगळ्या हाताला आणि कपडय़ांना माखल्याशिवाय त्या तिकिटाला लागत नाही. एवढे कष्ट केल्यानंतर आपले महनीय विचार वृत्तपत्रांपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, हे कळणं अवघड असतं. पत्र वेळेत पोहोचलं, तरी ते प्रसिद्ध होईल की नाही, याचा घोर असतो तो वेगळाच. एवढं झंझट करण्यापेक्षा सरळ मेल पाठवून द्यावा, मिळण्याची तरी हमी!
नुसता शब्दांचा मेल सातासमुद्रापार क्षणात पोचण्याची कल्पना आपल्याला अगदी वीस वर्षांपूर्वीही करता येत नव्हती. मेलसोबत फोटो पाठवता येतो, एखादी छोटी व्हिडिओ क्लिप पाठवता येते. ही सोय केवळ अफलातून म्हणावी अशी. कल्पनांची अशी देवघेव अंतराचा अडथळा न येता सहजपणे इकडून तिकडे होते आणि त्यातून संवादाचा वेग कमालीचा वाढतो. हवे ते हवे त्याला कळवा आणि प्रतिक्रिया अजमवा, हे अतिशय कमी खर्चात करता येणं, ही मेल संस्कृतीची खरी देणगी. एकाच वेळी शेकडो जणांशी संपर्क साधता येण्याची अचाट क्षमता असणारी ही तंत्राधारित सोय माणसाचं आयुष्य पार बदलून टाकायला पुरेशी ठरली. मेल पाठवण्यासाठी असलेला तुमचा पत्ता सहजपणे कुणाला मिळत नाही. एकदा का कुणाचा मेल आला किंवा तुम्ही कुणाला केलात, की तो पत्ता तुमच्या संगणकात आपोआप साठवला जातो. चुकायचा धोका नाही. अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे मोबाईल क्रांतीमध्ये ‘थ्रीजी’ चा समावेश होईपर्यंत आणि ‘स्मार्ट फोन’ स्वस्त होईपर्यंत किंवा टॅब येईपर्यंत, मेल पाहण्यासाठी तुम्हाला संगणकासमोर जाऊन बसावं लागे. इंटरनेट सुरू करून प्रत्यक्ष मेल पाहीपर्यंतची पाच सात मिनिटं तुम्हाला पाच सात युगासारखी वाटत असत..
अगदी दोन दशकांपूर्वीपर्यंत भारतात साधा पेजरही नव्हता. मोबाइल तर विज्ञानकथांमध्येच होता. केबल दूरचित्रवाणी हे माध्यम पाहून तेव्हा इतकं अचंबित व्हायला व्हायचं, की तंत्रज्ञानाचा हा केवढा मोठा आविष्कार आहे, असं वाटायचं. आणि ३५-४० वर्षांपूर्वी तर रेडिओवर शॉर्टवेव्हवरची अगदी देशांतर्गत असलेली केंद्रं ऐकायला मिळण्यासाठीही केवढी तरी कसरत करावी लागे. पण खरखर करीत, दिल्ली, कानपूर किंवा बीबीसी सारखी केंद्रं ऐकायला मिळायची. रेडिओ घरात असणं हे फारच प्रतिष्ठेचं असायचं. दूरध्वनी मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत थांबावं लागायचं आणि पोस्टातून येणाऱ्या पत्राचं किंवा मनिऑर्डरचं खूप कौतुक असायचं. बहुधा संपर्क करण्याची असोशी कमी असावी तेव्हा. माणसं एकमेकांशी बोलायची. सण समारंभ साजरे करण्याचा हेतूही संपर्क होण्याचाच होता. पत्रांमधल्या अक्षरांमधून तो माणूस सहज कळू शकायचा. दोन ओळीतल्या मोकळ्या जागा किती भरलेल्या आहेत, हेही जाणवायचं. लफ्फेदार किंवा अनाकलनीय सही ही त्या पत्राची ओळख असे. कागदाचा रंग (पांढरा, गुलाबी, निळा.) पत्रातील आशयाचा अंदाज देऊ शकायचा. कागदाचा स्पर्श लिहिणाऱ्याचा आर्थिक दर्जाही समजावून द्यायचा. जेके बॉँड आणि पार्चमेंट किंवा आयव्हरी या कागदांच्या प्रकाराची नावं माहीत नसली, तरी त्यांचा दर्जा परिचित होता.
मेलमध्ये सगळीच अक्षरं एकाच व्यक्तिमत्त्वाची. दोन शब्दांमधलं किंवा ओळींमधलं अंतर सगळीकडे सारखं. कुठंही खाडाखोड नाही की काकपदं (लिहिता लिहिता एखादा शब्द राहून गेला, तर तिथं खूण करून शेजारच्या समासात लिहिण्याची व्यवस्था. ही खूण म्हणजेच काकपद) नाहीत. सगळं कसं नीटनेटकं, स्वच्छ आणि टापटिपीचं. थ्रीजीमुळे आता हातातल्या मोबाईलच्या खेळण्यातच मेल वाचण्याची आणि लिहिण्याची सोय झाली. आता संगणकासमोर जाऊन बसायला नको, की तो सुरू होण्याची वाट बघायला नको. पत्रं अशी चोवीस तास आपल्या हातातल्या यंत्रावर यायला लागली, तर पोस्टमनची वाट पाहायची तरी काय गरज? मनिऑर्डर ऐवजी इंटरनेट बँकिंग आणि एसेमेस बँकिंग सुलभ आणि सोयीचं. पत्रंही हल्ली वेळेवर येत नाहीत आणि पोस्टातही हल्ली फारच क्वचित जावं लागतं. इंटरनेट मेलचा वापर सुरू होऊन आता चार दशकं झाली. या चाळीस वर्षांत आपण कुठल्या कुठं आलो आहोत!

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट