जिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.  त्यांच्यासारखी माणसे रोज प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही स्वत:ची दुनिया उभी करतात.  एखाद्या वेळी प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर पडतो. प्रतिकूलतेतही ते स्वत:तली ऊर्मी जिवंत ठेवतात, पण ..
अनेकांना वाटते की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या किमान गरजा भागल्यानंतरच कला वगरेसारख्या गोष्टी येतात, किंबहुना हे सारे भरल्या पोटानेच करण्याचे विषय आहेत. ज्यांच्या नशिबी रोजच जगण्याची लढाई आहे त्यांच्यासाठी या गोष्टींचे कितीसे अप्रूप असणार? खरे तर बारकाईने पाहिल्यास असे दिसेल की, या गोष्टी जगण्यालाच चिकटलेल्या असतात, त्या वेगळ्या काढता येत नाहीत. अशा किती तरी गोष्टी आहेत की, ज्यामुळे जगणे सुंदर आणि समृद्ध होते. किती छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये हे आकार शोधता येतात.
कडब्याची गंजी लावण्याचेसुद्धा एक कौशल्य असते. खेडय़ातही सरसकट सगळ्यांनाच ही लावता येते असे नाही. या कामासाठी काही माणसे असतात. कुठे या गंजी आयताकृती असतात, तर कुठे गोलाकार. काही ठिकाणी या गोलाकार गंजीलाही घुमट काढलेला असतो. यातला नेमकेपणा आणि तंत्र खास उठून दिसणारे. उन्हाळ्यात शेणाच्या गोवऱ्या थोपून त्यांचे ढीग लावले जातात. गोलाकार गोवऱ्या रचल्यानंतर त्या शेणाने िलपून घेतल्या जातात. यातही एक कौशल्य आहेच. नागपंचमीच्या दिवशी मातीच्या भिंतीवर हुबेहूब काढले जाणारे नाग आणि त्यावर दिले जाणारे काळे-पांढरे ठिपके, जिवंत वाटणाऱ्या या नागांच्या जिभा. पोळ्याच्या दिवशी गोठय़ात आणि दरवाज्यावर काढली जाणारी चित्रे, टाकून दिलेल्या काचेच्या रंगीबेरंगी बांगडय़ांतूनही भिंतीवर साकारली जाणारी वेगवेगळी चित्रे. जुन्या काळी मातीच्या भिंतीवर पिसारा फुललेल्या मोरापासून ते वेगवेगळ्या नक्षीदार झाडांपर्यंत अनेक चित्रे या बांगडय़ांमधून साकारलेली दिसत. या किती तरी गोष्टी आधी मनात असतात आणि नंतर त्यांना आकार प्राप्त होत जातात. आपण काही तरी कला जोपासतो आहोत असा अभिनिवेशही त्यापाठीमागे नसतो किंवा असे करणारे आपण सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावनाही या लोकांमध्ये नसते. रोजच्या जगण्यातच अनुभवांना असे अर्थपूर्ण आकार देणारी माणसे आपल्यासोबत दुसऱ्यांचेही जगणे समृद्ध करत असतात. यात कुठलाही बडेजाव नसतो, असते ती फक्तयांच्या जगण्यालाच चिकटून असलेली नसíगक सहजता.
ठाणे जिल्ह्य़ातल्या आदिवासी पाडय़ांपुरतीच मर्यादित असलेली ‘वारली’सारखी कला पुढे ‘ग्लोबल’ होते. तारप्याभोवती फेर धरून होणारा नाच असो, की दैनंदिन जगण्यातलेच काही प्रसंग असोत, ते या ‘वारली’ चित्रशैलीमुळेच जगभर गेले. आज पंचतारांकित हॉटेलांपासून ते देशविदेशात कुठेही ही कला पाहायला मिळते. या कलावंतांच्या सगळ्याच गरजा भागल्या होत्या, त्यांना कशाचीही ददात नव्हती आणि सर्व चिंता मिटल्यानेच सुखेनव अवस्थेत त्यांनी या कलेची निर्मिती केली, असे आपण म्हणू शकत नाही. ही कला त्यांच्या जगण्याचाच भाग होती. अभावातच या लोकांनी आपल्या आयुष्यातले भाव शोधले. प्रश्न असतातच, पण त्या प्रश्नांनी खचल्यानंतर जगण्यातलाच उत्साह मावळलेली आणि निराशेच्या छायेने झाकोळून गेलेली अनेक माणसे आपण पाहतो. याउलट जिथे काहीच सकारात्मक नाही तिथे आपल्यातले हे कसब काही लोकांनी प्राणपणाने जपले आहे.
रोज जगताना असे कुतूहल बाळगणारी, आपल्याभोवतीच्या नजरेकडे नव्याने पाहणारी काही माणसे असतात. त्यांच्यामुळेच कष्टप्रद जगणेही सुंदर होते. शेती करणारे अनेक जण असतात, पण एका साळीच्या झाडाला लागलेल्या तीन लोंब्या वेगळ्या आहेत. त्या इतर लोंब्यांपेक्षा वेगळ्या का? या वेगळ्या आहेत याचा अर्थ नक्कीच त्यात खास काही असणार याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून कापणीच्या वेळीही त्या वेगळ्या काढल्या आणि त्यातून लक्षात आले की, ही तांदळाची वेगळी जात आहे. दादाजी खोब्रागडेंना हे सत्य उमगले, कारण ही जिज्ञासा त्यांच्या मनात तीव्रतेने होती. एक-दोन नव्हे, तर अनेक भाताच्या जाती खोब्रागडे यांनी शोधल्या. चंद्रपूर जिल्ह्य़ातल्या नागभिड तालुक्यात नांदेड हे गाव कुठे आहे ते चटकन शोधता येणार नाही, पण इतक्या आडवळणाच्या गावी या माणसाचा ध्यास सुरूहोता. सर्वाचे लक्ष त्यांच्याकडे गेले ते ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने ‘मोस्ट पॉप्युलर रुरल इंडियन’ अशी त्यांची जगाला ओळख करून दिल्यानंतर.. जिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. लग्न समारंभात घराच्या िभतीवर काढल्या जाणाऱ्या चित्रांना सर्वदूर मिळालेली मान्यता आणि शेतातल्या साळीच्या पिकाला लगडलेल्या लोंब्यांमधून नव्या जाती शोधणारी, विकसित करणारी कृतिशील प्रतिभा.. यात तसा फार फरक करता येत नाही. आपल्या आयुष्यातलेच नावीन्य शोधण्याचा आणि त्यात नवे रंग भरण्याचा हा प्रयत्न आहे. दादाजी खोब्रागडेंना राज्य सरकारने ‘कृषिरत्न पुरस्कार’ दिला आणि जिव्या सोमा मशे यांना ‘पद्मश्री’. आपल्याला थोडी जमीन हवी अशी अपेक्षा १९७६ साली जिव्या मशे यांनी व्यक्त केली होती. सरकारने आश्वासनही दिले होते. सरकारी पातळीवरील अनास्था आणि लालफितीचा कारभार यामुळे हे आश्वासन तातडीने अमलात आणले गेले नाही. तब्बल ३४ वर्षांनंतर या कलावंताला थोडीशी जमीन मिळाली. चित्रशैलीला जगभर लौकिक मिळत असताना या कलावंताचा जमिनीच्या तुकडय़ासाठी चाललेला संघर्ष सुरूच होता. दादाजी खोब्रागडेंना तर फक्त तीनच एकर जमीन होती, तीही त्यांना मुलाच्या आजारपणात विकावी लागली. कधीकाळी स्वत:च्या जमिनीच्या तुकडय़ात भाताच्या जाती शोधणाऱ्या दादाजींच्या ‘एचएमटी’ने हजारो एकर जमिनींचा टापू आपल्या अंकित केला. सरकारने त्यांनाही जमिनीचा तुकडा देण्याचे आश्वासन दिले होते. ती त्यांना मिळाली की नाही माहीत नाही. हिंदीतले प्रसिद्ध समकालीन कवी मंगलेश डबराल यांची ‘टॉर्च’ नावाची एक कविता आहे. आपल्या कवितेत त्यांनी एक अनुभव चित्रित केला आहे. कवितेतला आशय असा- माझ्या बालपणी वडिलांनी एक सुंदर अशी टॉर्च आणली. आजकालच्या ‘कार’च्या ‘हेडलाइट’मध्ये जशा काचांना गोल खाचा असतात तशा त्या टॉर्चलाही होत्या. एके दिवशी सकाळी शेजारच्या आजीने माझ्या वडिलांना विचारले, की तुझ्या या उजेड पाडण्याच्या मशीनमधून माझी चूल पेटविण्यासाठी थोडी आग दे. वडील हसले आणि म्हणाले, चाची, यात आग नसते. फक्त उजेड असतो. अंधाऱ्या रात्रीही ही कामाला येते. डोंगरातले खाचखळग्यांचे रस्तेही यामुळे स्पष्ट दिसतात. तेव्हा आजी म्हणाली, बेटा, या उजेडात थोडी आग असती तर किती बरे झाले असते. मला तर रात्रीसुद्धा सकाळची चूल पेटविण्याचीच चिंता असते.
जिव्या मशे, दादाजी खोब्रागडे यांच्यासारखी माणसे रोज प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही स्वत:ची दुनिया उभी करतात. जगण्यालाच एक ध्यासपर्व करून टाकतात. एखाद्या वेळी प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर पडतो आणि सर्वाच्या नजरा तिकडे वळतात. आजवर दुर्लक्षित राहिलेले त्यांचे आयुष्य जगापुढे येते. एका झगझगीत उजेडात त्यांचा लौकिक साऱ्यांनाच दिसतो. प्रतिकूलतेतही ते स्वत:तली ऊर्मी जिवंत ठेवतात, पण त्यांच्याभोवतीचे वर्तमान सुसह्य़ व्हावे यासाठी सरकारसह सर्वाच्याच मनात कुठे तरी एखादा तेवणारा निखारा असतो काय?