एकदा एक व्यक्ती मुंबईमध्ये बॉम्बे हाऊस या टाटा मुख्यालयामध्ये शिरत होती, घाईघाईत. त्यामुळे गाडी जरा नीट उभी केली गेली नाही. ते पाहून कावलेला पोलीसवाला त्या व्यक्तीला म्हणाला: रस्ता काय तुमच्या बापाचा आहे काय? ती व्यक्ती म्हणाली हो. त्यांनी मग हवालदाराला त्या रस्त्याच्या पाटीकडे बोट दाखवले. त्यावर नाव होते सर होमी मोदी स्ट्रीट. ते म्हणाले हवालदाराला.. ते माझे वडील.. तेव्हा रस्ता माझ्याच तीर्थरूपांचा. रुसी मोदी असे होते. वडील सर होमी हे जेआरडींच्या काही पहिल्या जवळच्या लोकांमधले. जेआरडी यांच्याप्रमाणे रुसींच्या टाटातल्या सेवेला जमशेदपूरपासूनच सुरुवात झाली. १९४७ साली १७ मार्चला रुसी जमशेदपुरात दाखल झाले. पुढे १९७४ साली रुसी मोदी याच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले, १९७९ साली उपाध्यक्ष आणि १९८४ साली भारतातल्या या सर्वात मोठय़ा कंपनीच्या अध्यक्षपदी बसण्याचा मान त्यांना मिळाला. त्या काळात जगभरातल्या उत्तम व्यवस्थापकांवर बीबीसीने एक वृत्तमालिका तयार केली होती. त्यात भारतातून एकाच व्यवस्थापकाची निवड झाली होती, ती म्हणजे रुसी होमी मोदी. बुटबैंगण, गोलमटोल मोदी बडबडे होते, हरहुन्नरी होते, पियानो उत्तम वाजवत आणि एकाच वेळी अत्यंत उच्चभ्रू वातावरणात आणि खाण कामगारांच्या सहवासात सहजतेने वावरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. रुसी मोदी यांनी जमशेदपुरात कामगारांसाठी सोयीसुविधा पुरवायला, नव्याने उभ्या करायला सुरुवात केली आणि हळूहळू टाटा स्टील- तेव्हाची टिस्को-मधील चित्र पालटले. तोपर्यंत कामगार आणि व्यवस्थापक यांच्यातले अत्यंत ताणतणावाचे असलेले संबंध निवळले. रुसी मोदी यांच्या व्यवस्थापन कौशल्याला त्या अडाणी कामगारांनी दिलेली ती दाद होती. तिथून पुढे जमशेदपूर म्हणजे रुसी मोदी असे समीकरण बनले. टाटा स्टीलमधल्या कामगारांची संख्या त्या वेळी ३० हजार इतकी प्रचंड होती. वेगवेगळ्या टोळ्या आणि त्यांच्या खंडणीखोर प्रमुखांचा सुळसुळाट होता, पण या सगळ्यांना रुसी मोदी यांनी धाकात ठेवले. रुसी मोदी यांचे आणखी एक वैशिष्टय़. त्यांना राजकारणाची जबरदस्त अशी समज होती. त्यामुळे जेआरडींपश्चात रुसी यांच्याकडेच कंपनीची सूत्रे जाणार असे मानले जात होते, परंतु याच काळात टाटा समूहासाठी पातक असलेली एक गोष्ट त्यांनी केली. वर्तमानपत्रांत ते बातम्या पेरायला लागले. या बातम्यांमुळे सगळेच अस्वस्थ झाले. त्या वादात त्या वेळचे टेल्कोचे सुमंत मुळगावकर यांनी रतन टाटांचे नाव पुढे केले. त्या वेळच्या संघर्षांत मोदी अगदीच जायबंदी झाले आणि परिणामी स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच बाद होऊन गेले. नंतर प्रकृतीच्या कुरबुरींमुळे जेआरडींनी रतन टाटा यांच्याकडे कंपनीची सूत्रे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला, पण रतन टाटांची नियुक्ती करावयाच्या बैठकीवर रुसी मोदी यांनी बहिष्कार घातला. त्यानंतर १९९२ सालच्या एप्रिल महिन्यात संचालक मंडळाच्या बैठकीत जेआरडींनी एक महत्त्वपूर्ण ठराव मांडून टाटा कंपनीतल्या सर्व संचालकांचे निवृत्ती वय ६५ वर आणले आणि कंपनीच्या अध्यक्षासाठी ही मर्यादा ७५ अशी केली. त्याचा थेट फटका रुसी मोदी यांना बसला. रागावून, सर्व भल्याबुऱ्या मार्गानी त्यांनी आपले स्थान टिकविण्याचा प्रयत्न केला. इतका की प्रसंगी लालू प्रसाद यादव यांचीही मदत घेतली, पण जेआरडींपुढे त्यांची डाळ शिजली नाही आणि रुसी होमी मोदी यांना काढून टाकण्यात आले. त्यानंतर ते जवळपास पडद्याआडच होते, परंतु अखेपर्यंत ते मनमौजी होते. त्यांच्या निधनामुळे जागतिक स्तरावरील पहिला भारतीय व्यवस्थापक अंतर्धान पावला आहे.