सचिनचे मोठेपण हे की, काही क्षण तरी त्याच्यामुळे आपणास चारी मुक्ती साधल्याची अनुभूती येते. या अशा गोष्टींमुळेच आपले जगणे सोपे आणि सुसह्य़ होत असते. सचिन मैदानात आहे आणि जगात सर्व ठीक आहे, असे म्हणण्याचे दिवस आता संपले..
कसोटी सामन्यातले ६८वे अर्धशतक पूर्ण होताना पहिल्यांदाच त्याने बॅट आपल्या आईच्या दिशेने उंचावली, तेव्हा जगातल्या सगळ्या क्रिकेटप्रेमींचा ऊर भरून येणे स्वाभाविक होते. दिवंगत वडिलांना त्याने अर्पण केलेल्या शतकी खेळीचीही आठवण अनेकांना असणे साहजिक होते. आकाशात पाहत, बॅट उंचावत त्याने केलेले अभिवादन सगळ्यांच्या परिचयाचे होते. ७४ धावा याही काही कमी नाहीत. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून सलग २४ वर्षे खेळत राहणाऱ्या सचिननं एवढय़ा धावा काढल्या असत्या, तर कुणी फारसे नाराजही झाले नसते. पण शुक्रवारचे दु:ख वेगळे होते. निवृत्त होतानाही त्याने काही देदीप्यमान घडवावे आणि आपण ते याचि डोळा पाहावे, एवढीच अनेकांची अपेक्षा होती. हीदेखील आणखी एक सवय. अपेक्षेची सवय. एरवीही गेली अनेक वर्षे स्कोअर विचारणाऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न एकच असायचा, सचिन आहे ना अजून?
पण सचिन मदानात आहे आणि जगात सर्व ठीक आहे, असे म्हणण्याचे दिवस आता संपले. सचिन यापुढे मदानात नसणार आहे. दोनशेवी कसोटी खेळून तो निवृत्त होत आहे. तेव्हा यापुढे दूरचित्रवाणीच्या पडद्यावर भारताचा क्रिकेट सामना पाहताना ‘देव नाही देव्हाऱ्यात’ अशीच हुरहुरती भावना अनेकांच्या मनात असणार आहे. सचिनला देव मानणे हे निश्चितच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. पण आपणा भारतीयांच्या अतिशयोक्तीवरील प्रेमाचेही ते लक्षण आहे. त्यामुळेच सचिनसारखा विक्रमवीर गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही, असे आपण बिनदिक्कत म्हणू शकतो. आणि आपण असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एवढाच घ्यायचा असतो की सचिनवर आपले प्रचंड प्रेम आहे. आपल्या प्रेमाचीही ही गंमतच होती. सचिन ही आपली, आपलेच जगणे श्रीमंत करणारी सवय आहे, हे आपल्याला मान्यच होते आणि आहे. तरीही गेली काही वष्रे आपण क्रिकेटप्रेमी सचिनच्या निवृत्तीची जणू वाटच पाहत होतो. प्रत्येक क्रिकेट सामन्याआधी आणि नंतर बातम्यांतून, वाचकांच्या पत्रव्यवहारातून चर्चा असायची ती सचिनच्या निवृत्तीचीच. केवढा विरोधाभास होता तो. एकीकडे सचिन आपल्याला हवा असायचा. समोरच्या संघाला फोडण्याची ताकद त्याच्या मनगटांत असल्याने तो आपल्याला हवा असायचा. त्यात तो कमी पडला, की मग मात्र सगळे त्याच्या नावाने शंख करायला मोकळे असायचे. सचिनला आपणच देवत्व दिले असल्याने, त्याने मदानावरही दर वेळी दैवी चमत्कारच करावेत ही आपली भोळीभाबडी इच्छा असायची. त्यात अडचण ही होती, की सचिन माणूसच होता. आपण हे नेहमीच विसरत आलो आहोत, की सचिन माणूस असल्यामुळेच त्याच्या विक्रमांना, त्याच्या महत्तेला मूल्य आहे.
सचिनने क्रिकेटच्या मदानावर नवनव्या विक्रमांचे इमले उभारले. भविष्यात कदाचित आणखी एखादा सचिन येईल आणि याहून पुढे जाईल. नवे विक्रम करील. अखेर विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. सचिनने ते मागिलांचे मोडले. उद्या सचिन त्या मागिलांमध्ये समाविष्ट होईल. तेव्हा मुद्दा विक्रमांचा नाहीच. ते महत्त्वाचेच, पण त्याहून त्या विक्रमांतून मिळालेला आनंद महत्त्वाचा. आपल्या रंजल्यागांजल्या आयुष्यात सचिनने आपल्याला नेहमीच हा आनंद दिला. या आनंदाचे कूळ कोणते हे शब्दांत सांगता येणे अवघड आहे. लता गाणे गाते आणि आपले मन आनंदकंद होते, तेव्हा त्याचे कूळ कोणते असते? किशोरी ‘सहेला रे’ आळवते आणि त्या आर्ततेनेही मन सुखावते, त्याची जात कोणती? या गोष्टी शब्दातीत असतात. सचिनच्या खेळी तशाच असायच्या. त्याने किती धावा काढल्या याला त्या-त्या सामन्यात किंमत असायचीच. अखेर अनेकदा त्याच्या खांद्यावर तर भारतीय संघाचा सगळा भार असायचा. पण एका क्षणी त्या धावांचे, त्या विक्रमांचे, सामन्यातील जय-पराजयाचे, सगळ्याचे मोल वजा होऊन जायचे आणि बाकी उरायची ती सचिनची नजाकतभरी खेळी. त्याचे पदलालित्य, त्याने लीलया मारलेले फटके. या देखणेपणातून आपल्याला जे सौख्य मिळायचे ते तेवढेच खरे असायचे. तीच आपली श्रीशिल्लक असायची. तेच त्याने आपल्यावर रचलेले ऋण असायचे. आज क्रिकेटप्रेमींच्या आसमंतात सचिन नामाचा गजर आणि सचिन नामाचा टाहो, असे वातावरण आहे. त्याचे कारण हे आहे.
या सगळ्या वातावरणात, सचिनचे जरा जास्तच कौतुक होत आहे, असा बदसूरही कुठून कुठून कानी येत आहे. म्हणजे भारतात एवढे दैन्य-दारिद्रय़ आहे, रस्त्यावर एवढे खड्डे आहेत आणि कर्जाचे हप्ते केवढे तरी वाढलेले आहेत आणि तुम्ही सचिनला कसले डोक्यावर घेऊन नाचत आहात, असे म्हणणारे आपल्याच आजूबाजूला आहेत. त्यांच्या या मताचा सादर आदरच आहे. ‘निजले जग, कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला.. काय म्हणावे त्या देवाला?’ असा सवाल करणारे गोिवदाग्रजांच्या काळातही होते म्हणून ते त्यांच्या कवितेत आले. असे चिंतातुर आता नसतील, असे कसे म्हणावे? ते आहेतच. परंतु माणसाचा जन्म सदासर्वदा चिंता करण्यासाठीच झालेला नाही. दु:ख असतेच. काळज्या असतातच. सचिनसारख्या व्यक्तींचे मोठेपण हे की, काही क्षण तरी त्यांच्यामुळे आपणास चारी मुक्ती साधल्याची अनुभूती येत असते. या अशा गोष्टींमुळेच आपले जगणे सोपे आणि सुसह्य़ होत असते. सचिनच्या निवृत्तीमुळे हे जगणे सोपे करणारे क्षण आपल्या आयुष्यातून हद्दपार होणार आहेत. आज अनेकांच्या मनावर मळभ दाटले आहे, ते त्याचेच.
सचिन या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात नसेल. त्याने क्रिकेटचे किती नुकसान होईल, हे आकडय़ांत मोजता येणार नाही. गेल्या काही वर्षांतील आयपीएल, टी-ट्वेंटी आदी प्रकारांमुळे क्रिकेटला आलेल्या बाजारूपणामुळे या खेळाची विश्वासार्हता लयाला गेली. तरीही क्रिकेटवेडे त्याच उत्साहाने सामने पाहत आहेत. तेव्हा सचिनचे नसणेही ते पचवतील. क्रिकेट सामने होतच राहतील. पण त्या सामन्यात बाजारशक्ती हाच आघाडीचा फलंदाज असेल. सचिनमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक प्रकारची मध्यमवर्गीयता जिवंत होती. किंवा असे म्हणता येईल, की सचिन हा भारतीय क्रिकेटमधला अखेरचा मध्यमवर्गीय नायक होता. त्याची सर्व मूल्ये आणि जाणिवा मध्यमवर्गीयच होत्या. त्याने त्या जाणीवपूर्वक जपल्या होत्या. आपले यशही कोणाच्या डोळ्यांवर येता कामा नये, हे त्याने खुबीने जपले होते. तो साधा होता. अनेकांच्या अंगी किंचित यशानेही माजोर्डेपणा येतो. तो त्याने आपल्या जवळपासही फिरकू दिला नाही. तो वादांत पडला नाही आणि चमकोगिरी करीत फिरताना आढळला नाही. तो सज्जन होता. चणीने लहान होता आणि असे असूनही त्याच्यात रणी झुंजण्याचे अफाट बळ होते. समोरच्या खेळपट्टीवरून रणगाडे आले, तरी सचिनची बॅट डगमगत नव्हती. हे भारतीय मध्यमवर्गासाठीचे प्रेरणादायक घटित होते. सचिन हा नायक असण्याचा अर्थ हा होता. आता मात्र या अर्थाने भारतीय क्रिकेट निर्नायकी होणार आहे. हीच वेदना आज अनेकांना सलते आहे.