समाजविज्ञानाची अभ्यासू पुस्तके काढणाऱ्या ‘सेज’ प्रकाशनसंस्थेने जगभर पन्नाशी , तर भारतात पस्तिशी गाठली.  ही संस्था मराठीत येणार, अशी कुणकुण लागल्यावर ‘लोकसत्ता’ने ‘सेज इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक मेहरा यांच्याशी बातचीत केली..

*बुकमार्क प्रतिनिधी : ‘सेज’ या प्रकाशन संस्थेला ५० वर्षे झाली आणि भारतातही या संस्थेने पस्तिशी गाठली.. याच ३५ वर्षांत भारताने सामाजिक शास्त्रे, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संगणक-गणित या क्षेत्रांतील शिक्षणामध्ये मोठे बदल पाहिले आहेत. व्यवस्थापन आणि विक्रीतंत्र यांसारख्या अभ्यासशाखांची भारतातील भरभराट याच काळातील आहे. भारतीय शिक्षण क्षेत्राच्या या वाढीत ‘सेज’ने कोणता वाटा उचलला?
– विवेक मेहरा : विज्ञान-तंत्रज्ञान किंवा संगणक, गणितशास्त्र या विषयांवरली पुस्तकं आम्ही प्रकाशित करत नाही. ‘सेज’ ५० वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थापन झाली, तेव्हापासून नेहमीच सामाजिक शास्त्रांची प्रकाशन संस्था होती आणि समाजविज्ञान हाच आमच्या कामाचा गाभा आजही आहे. वाणिज्य क्षेत्रातील पुस्तकांसाठी- यात व्यवस्थापनविषयक पुस्तकंही आली- आम्ही ‘सेज रिस्पॉन्स’ ही शाखा सुरू केली, ती वाढते आहेच. परंतु सामाजिक शास्त्रांच्या पुस्तकांचे स्वतंत्रपणे प्रकाशन भारतात ‘सेज’तर्फे १९८१ साली अवघ्या एका पुस्तकानिशी सुरू झालं.. ते आता वर्षांला १०० पुस्तकांवर गेलं आहे. या संख्येपेक्षा, भारतात किंवा जगात कुठेही- विद्यापीठीय क्षेत्रासाठी अभ्यासपूर्ण पुस्तकांची विचारपूर्वक केलेली निर्मिती- हेच सेजच्या प्रवासाचं महत्त्वाचं सूत्र राहिलं आहे.
*पण भारतासाठी म्हणून तुम्हाला काही निराळी आखणी करावी लागली, असं झालं आहे का?
– आपला देश वाढतो आहे. या वाढीमुळे अनेक संधी निर्माण होताहेत. शिक्षण- शैक्षणिक (विद्यापीठ) क्षेत्राची वाढ तर अन्य काही क्षेत्रांपेक्षाही झपाटय़ाने होते आहे. आम्ही आमच्या वाढीकडे, या (शैक्षणिक) क्षेत्राच्या वाढीचा भाग म्हणून पाहतो. आजही या क्षेत्रात वाढण्यासाठी आणखी जागा आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या वाढीचा लाभ वाचकांनाच होणार. स्पर्धेने गुणवत्ता वाढणं, तंत्रज्ञानाच्या वापरातून किमतींची स्पर्धाही वाढणं (त्या किफायतशीर होणं) असे परिणाम होतील. आपल्याकडे ‘सेवा कर’ वाढला की प्रकाशनांच्या किमती वाढत जातात.. त्यामुळे आम्ही कागदाच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवून असतो.
*प्रश्नाचा रोख असा होता की, भारतीय भाषांमध्येही विद्यापीठीय उपयुक्ततेची पुस्तकं ‘सेज’नं काढली का? किंवा भारतीय भाषांतल्या शैक्षणिक प्रकाशनांबद्दल तुमचं मत काय?
– एक खरं की, बहुराष्ट्रीय प्रकाशकांनी भारतीय भाषांतल्या शैक्षणिक प्रकाशनाकडे लक्ष दिलेलं नसल्यामुळे हे क्षेत्र (इंग्रजीच्या तुलनेत) वाढलेलं नाही. काही (बहुराष्ट्रीय) प्रकाशक ललित साहित्य आणि गंभीर ललितेतर गद्य पुस्तकं भारतीय भाषांतही काढू लागले, पण विद्यापीठीय वा एकूणच शैक्षणिक प्रकाशनं ही नेहमी प्रांतोप्रांतीच्या, तुलनेनं छोटय़ा प्रकाशकांकडे राहिली. भारतात इतक्या भाषा आहेत की वास्तविक (इंग्रजीमध्येच पुस्तकं काढणं, यासारखं) सरसकटीकरण टाळावंच लागेल. भारतीय भाषांमधला वाचक वर्ग, ग्रहणकर्ता वर्ग इंग्रजीपेक्षा मोठा असू शकतो. मागणी आहे, पण दर्जेदार पुरवठय़ासाठी कुणी पुढे येत नाही. दर्जेदार प्रकाशनं देण्यासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचंच आणखी एक रूप म्हणजे, ‘सेज भाषा’..  ही आमची भारतीय भाषांसाठी नवी सुरुवात! आधी भाषांतरित पुस्तकं, पण २०१६/ १७ पर्यंत मला खात्री आहे की आम्ही स्वतंत्रपणे भारतीय भाषांतही विद्यापीठीय योग्यतेची पुस्तकं (मूळ भारतीय भाषांत) प्रकाशित करू. सध्या – २०१५ मध्ये मात्र आम्ही मराठी आणि हिंदीपुरताच ‘सेज भाषा’चा व्याप मर्यादित ठेवणार आहोत.
*मराठी? त्याबद्दल बोलूच; पण ‘सेज’ स्वत:च या उद्योगात का पडते आहे? मराठीतले किंवा अन्य भारतीय भाषांमधले सक्षम प्रकाशन हेरून, त्यांना सहयोगी प्रकाशक नसतं करता आलं?
– ते प्रयत्न तर आम्ही २००७ पासूनच सुरू केले आहेत. मराठीच नव्हे, मल्याळम्, तमिळ, बंगाली आणि हिंदी प्रकाशकांशी आम्ही सहयोगाचे प्रयत्न केले. त्या अनुभवातून बरंच शिकायला मिळालं, इतकंच सांगतो! शिवाय, समजा हा सहयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला तरी मूळ लेखकाला त्याचं मूल्य मिळतंच असं नाही. हे धडे शिकल्यावर आम्ही ठरवलं की, आपणच भारतीय भाषांत प्रकाशन सुरू करायचं.
*मराठीत आधी येण्याचा निर्णय कसा झाला? कोणती पुस्तकं आणताहात मराठीत?
– मराठीत खरोखरच शिकणारे जास्त आणि त्या मानानं शैक्षणिक- विद्यापीठीय पुस्तकं कमी, असं नाही का? ‘योग्य मागणीसाठी दर्जेदार पुरवठा’ हे तत्त्वच आमच्या या निर्णयामागे आहे. आम्हाला पाऊल रोवायचं आहे.. दर्जेदार शैक्षणिक साहित्य मातृभाषेतूनच मिळालं, तर केव्हाही चांगलंच. शिवाय, आमची पुस्तकं समाजाच्या कोणा एका थरापुरती नसून शिकण्याची इच्छा असलेल्या सर्वासाठीच आहेत, म्हणून ती सर्वांपर्यंत पोहोचायला हवीत, ही खूणगाठ पक्की होती. त्यामुळे भाषांतरित पुस्तकंही काही कमी नाहीत, हे स्पष्ट झालेलं होतं.
कुठली पुस्तकं मराठीत यंदा (२०१५ सालात) ‘सेज भाषा’तर्फे  येणार, त्यांची यादीच देतो-
(१) ‘लीडर्स ऑन लीडरशिप’ – हे ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’चं पुस्तक (२) ‘पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन अ ग्लोबलायझिंग वर्ल्ड’ – ले. बिद्युत चक्रवर्ती (३) बुद्धिझम इन इंडिया – ले. गेल ऑम्व्हेट (४) द विनिंग मॅनेजर- ले. वॉल्टर व्हिएरा (५) बॉडी लँग्वेज- अ गाइड टु प्रोफेशनल्स – ले. हेडविग ल्युइस. ही आमची पहिली मराठी पुस्तकं!
*तुम्ही बाकीच्या भाषांतही जाणार.. मग प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळी पुस्तकं भाषांतराला निवडणार का? प्रश्न असाही आहे की, प्रत्येक भाषेत येणारी पुस्तकं ही त्या त्या भाषेबद्दलच्या तुमच्या व्यावसायिक व्यूहनीतीप्रमाणे असणार का?
–  सध्या आम्ही दोनच भाषांत असणार आहोत- मराठी आणि हिंदी. आम्हाला काही स्वत:ला सिद्ध वगैरे करून दाखवण्याची घाई नाही. जे करू ते चांगल्या प्रकारे करायचं आहे, इतकंच. हां, आम्ही ‘मोजूनमापून पावलं उचलतो आहोत’ असं म्हणा.. पण हे आवश्यकच आहे. आम्ही भाषांमध्ये येणार ते संख्यावाढीसाठी नसून गुणवत्तावाढीसाठीच.
त्यामुळेच, प्रत्येक भाषेत पुस्तकं काढताना त्या भाषिक समूहाच्या विद्यापीठीय- शैक्षणिक गरजांसाठी आज त्या समूहाच्या मातृभाषेत काय हवं आहे, याचा विचार करण्यास आम्ही महत्त्व देऊ. आपल्या भाषिक वैविध्याची जाण राखायला हवीच. प्रत्येक भाषेवर लक्ष अगदी केंद्रित करायलाच हवं. म्हणूनच आम्ही मराठीतसुद्धा प्रकाशनाच्या प्रत्येक टप्प्यावर (नियोजन, संपादन, मुद्रितशोधन, निर्मितीमूल्य परीक्षण, मुद्रण, मुखपृष्ठरचना..) आमची देखरेख ठेवणार. जेणेकरून, मराठी पुस्तकाचा दर्जा इंग्रजीपेक्षा जराही कमी राहू नये. पुस्तकाची गुणवत्ता अर्थात मजकुरावर ठरते.. सध्या भाषांतरापुरतं बोलायचं तर, इंग्रजीत त्या मजकुरानं गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. मराठीत यापुढेही, (मजकुराच्या) गुणवत्तेशी तडजोड आम्ही होऊ देणार नाही.
‘व्यूहनीती’ हा शब्द बरोबरच आहे, पण ती केवळ व्यवसायवृद्धीसाठी नसेल.. प्रत्येक भाषेची मागणीच अशी असेल की, तिच्या गरजांसाठी आम्ही आमची आखणी नव्यानं किंवा स्वतंत्रपणे करावी. भाषांतरं ही आंतरविद्याशाखीय आणि अगदी सर्वमान्य अशा- नवा विषय मांडणाऱ्या- पुस्तकांची असतील, हे उघड आहे. पण आम्ही काय करणार, हे खऱ्या अर्थानं दिसेल ते आम्ही भारतीय भाषांतून मूळ आणि स्वतंत्र प्रकाशन करू लागू, तेव्हा. तिथे आमचा कस लागेल.