News Flash

‘साहेब’ ते ‘बाबा’

महाराष्ट्राचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीला ‘हक्कभंग प्रकरणा’नं मूल्यं जपू पाहणाऱ्या सुसंस्कृत राजकारणालाच आव्हान दिलं, हा योगायोग म्हणू! पण महाराष्ट्राची ताठ मान हळूहळू

| March 29, 2013 12:55 pm

महाराष्ट्राचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीला ‘हक्कभंग प्रकरणा’नं मूल्यं जपू पाहणाऱ्या सुसंस्कृत राजकारणालाच आव्हान दिलं, हा योगायोग म्हणू! पण महाराष्ट्राची ताठ मान हळूहळू खाली कशी जात गेली, याचं एक कारण इथल्या नेतृत्वातही शोधता येतं. तसं केल्यास, आशादायक वर्तमानकाळही भूतकाळामुळे कसा काळवंडतो हे दिसेल..
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत असतानाच विधान भवनात काही आमदारांनी केलेलं लांच्छनास्पद वर्तन हा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल. विधिमंडळात आणि एकूणच सार्वजनिक जीवनात सभ्यता, सहिष्णुता, सुसंस्कृतता, उदारमतवाद यांसारख्या मूल्यांची जपणूक यशवंतरावांनी आयुष्यभर केली. पण काळाच्या ओघात तेच जणू हास्यास्पद ठरत आहे.
अलीकडे राजकारणात ‘साहेब’ हा शब्द तालुका किंवा जिल्हा पातळीवरील नेते, आमदार-खासदारांपासून कोणालाही उद्देशून वापरला जातो. त्याचबरोबर तो सर्वपक्षीयही झाला आहे. १९७० च्या दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा दबदबा होता तेव्हा या पक्षात वसंतरावदादा पाटील, वसंतराव नाईक, नाशिकराव तिरपुडे, बॅ. शेषराव वानखेडे, मधुकरराव चौधरी यासारखी मातबर मंडळी होती. त्याचप्रमाणे विखे-पाटील, मोहिते-पाटील यांसारखी तालेवार घराणीही होती. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आश्वासक युवा नेत्याच्या टप्प्यावर होते, पण या साऱ्यांसाठी एकच ‘साहेब’ होते – यशवंतराव चव्हाण!
चव्हाणसाहेबांचं पहिलं दर्शन शाळकरी वयात असताना, स्वाभाविकपणे दुरूनच झालं. १९६५मध्ये पाकिस्तानबरोबर अनिर्णित ठरूनही भारताचा स्पष्ट वरचष्मा राहिलेलं युद्ध समाप्त झालं होतं. त्या वेळी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनी बजावलेल्या कामगिरीचा सर्वत्र गौरव होत होता. विशेषत: चीनशी झालेल्या युद्धातील लाजिरवाण्या पराभवानंतर तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीत बोलावून नवी जबाबदारी सोपवली तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेल्याची भावना महाराष्ट्रात होती. पाकिस्तानयुद्धानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं. त्या वेळच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून यशवंतरावांना लोकसभेवर बिनविरोध निवडून देण्यात आलं होतं. स्वाभाविकपणे या युद्धानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघाला प्राधान्याने भेट देऊन सत्काराचा स्वीकार केला. उघडय़ा वाहनातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. बंद गळ्याचा कोट आणि खादीची टोपी घातलेले, ताठ मानेने त्या वाहनात उभे असलेले यशवंतराव कायमचे मनावर कोरले गेले. आणखी सुमारे दहा वर्षांनी त्यांच्या दर्शनाचा पुन्हा योग आला तो कराडच्या गाजलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवर त्या संमेलनभर त्यांनी दाखवलेली राजकीय परिपक्वता उपस्थितांच्या मनावर वेगळा ठसा उमटवणारी होती. त्यानंतरही काही कार्यक्रमांच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी यशवंतरावांनी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये या क्षेत्राबद्दल त्यांच्या मनात असलेला कमालीचा आदर आणि त्याच वेळी त्यावर आपल्या व्यासंगी वाचनाद्वारे टिप्पणी करण्याचा मिळवलेला अधिकार अनुभवाला आला होता.
इंदिराजींनी लागू केलेल्या आणीबाणीने यशवंतरावांच्या राजकीय जीवनाला कलाटणी दिली. त्यानंतरच्या शेवटच्या दशकातील त्यांचा उतरणीला लागलेला राजकीय प्रवास सर्वज्ञात आहे. नोव्हेंबर १९८१ मध्ये यशवंतरावांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण त्याबाबत त्यांच्या मनात आधी सुमारे दीड वर्षांपासून विचारचक्र सुरू झालं होतं, अशी पुष्टी देणारा एक किस्सा सांगण्यासारखा आहे.
संजय गांधी या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा २४ जून १९८० रोजी अपघाती अंत झाला. त्यानंतर दिल्लीतील राजकीय स्थितीचा अंदाज घेण्यासाठी साप्ताहिक ‘माणूस’तर्फे गेलो असताना स्वाभाविकपणे चव्हाणसाहेबांची भेट घेण्याची इच्छा होती. त्यासाठी केलेला फोन त्यांनी स्वत:च उचलला तेव्हा पहिला धक्का बसला. कारण त्यांची तेव्हापर्यंतची मनात असलेली प्रतिमा लक्षात घेता एवढय़ा मोठय़ा माणसापर्यंत पोचता येईल की नाही, याचीच शंका होती. त्यांनी सांगितल्यानुसार दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो. नोकराने दार उघडून बसायला सांगितलं. थोडय़ाच वेळात पांढराशुभ्र सदरा आणि धोतर अशा घरगुती पेहरावात ‘साहेब’ आले. पण डोक्यावर चिरपरिचित गांधी टोपी नव्हती. काही क्षण गोंधळायलाच झालं. दिल्लीतल्या सफदरजंग रोडवरील इंदिराजींच्या बंगल्यासमोरच हे निवासस्थान होतं. संजयच्या निधनामुळे इंदिराजींच्या बंगल्यामध्ये काही धार्मिक कार्यक्रम सुरू होते. त्याच गंभीर वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर चव्हाणसाहेब संजयनंतरच्या दिल्लीची मीमांसा करत होते. त्या सगळ्या बोलण्याचा मथितार्थ एवढाच होता की, साहेब पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा गंभीरपणे विचार करत होते. त्यानंतर सुमारे दीड वर्षांने नोव्हेंबर १९८१ मध्ये पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. योगायोगाने त्याही वेळी भेट झाली. चेहऱ्यावर एकीकडे नेहमीचं रुंद हास्य होतं, त्याचबरोबर भवितव्याबद्दलची चिंताही होती. त्यातच मानसपुत्र शरद पवार परदेशात जाऊन बसले होते आणि ते ‘स्वगृही’ परतणार की नाही, याचं ठोस उत्तर साहेब देऊ शकत नव्हते.
काँग्रेस-प्रवेशानंतर इंदिराजींनी यशवंतरावांना लाल दिव्याची गाडी (केंद्रीय नियोजन मंडळाचं अध्यक्षपद) देऊन ज्येष्ठतेचा मान राखला; पण सत्तावर्तुळापासून दूरही ठेवलं. इंदिराजींच्या हत्येनंतर पुन्हा लोकसभा निवडणुकांची जुळवाजुळव सुरू झाली. आपल्या परंपरागत कराड मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी साहेब महाराष्ट्रात येणार होते. पण त्यापूर्वीच काळाने त्यांना गाठलं. १९८४ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांचं दिल्लीत अचानक निधन झालं. कर्मभूमी कराडमध्ये अंत्यसंस्कार झाले त्या वेळी संपूर्ण शहरातलं वातावरण घरातला कर्ता माणूस गेल्यासारखं होतं. त्या दिवशी शहरात फिरत असताना शोकमय हरताळ आणि राजकीय ‘उत्स्फूर्त बंद’ यातील फरक स्पष्टपणे लक्षात आला.
सत्तेत राहून मुंबईसह महाराष्ट्रासाठी आपलं राजकीय कौशल्य पणाला लावलेले यशवंतराव नैसर्गिकपणे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीचा चढता आलेख राहिला. दिल्लीत गेल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परतले नाहीत, पण ‘घार हिंडते आकाशी..’ या उक्तीनुसार इथल्या राजकारणावर त्यांची बारीक नजर आणि पकडही होती. त्यांच्या जन्मशताब्दीपूर्वी दोन र्वष या राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या अल्पकाळात यशवंतरावांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विविधांगी विकासाचा पाया घातला. त्यानंतरच्या गेल्या ५० वर्षांतील १५-१६ मुख्यंमंत्र्यांची कारकीर्द पाहिली तर काय चित्र दिसतं? मुख्यमंत्रिपदाचे त्यांचे उत्तराधिकारी दादासाहेब कन्नमवार यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर व्यक्तिमत्त्वामध्ये खानदानीपणा ओतप्रोत भरलेले वसंतराव नाईक यांच्या रूपाने राज्याला दीर्घकाळ स्थर्य देणारा नेता मिळाला. सहकार क्षेत्रात भक्कम पाळेमुळे रोवलेले कुशल संघटक वसंतदादा पाटील यांनी हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला, पण १९७८ मध्ये पवारांच्या गाजलेल्या ‘पुलोद’ प्रयोगामुळे तो खंडित झाला. १९८० च्या निवडणुकांनंतर इंदिराजींनी बॅ. ए. आर. अंतुले यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं सोपवली. पण इंदिराजींच्याच नावाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठानासाठी देणग्या गोळा करण्याच्या प्रकरणात राजकीय विरोधकांनी गुंतवल्यामुळे अंतुलेंना पायउतार व्हावं लागलं. यानंतर बॅ. बाबासाहेब भोसले आणि शिवाजीराव पाटील-निलंगेकर या औटघटकेच्या राजांसह पुन्हा वसंतदादा, मग हेडमास्तर शंकरराव चव्हाण, विरोधी आघाडीचा झेंडा गुंडाळून १९८६ मध्ये स्वगृही परतलेले शरद पवार, त्यांनीच आपले उत्तराधिकारी म्हणून निवडलेले, पण संधी मिळताच त्यांच्यावर पलटवार करू पाहणारे सुधाकरराव नाईक, १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर राज्यात परतलेले शरद पवार अशी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची आलटूनपालटून सुभेदारी चालूच राहिली. या सर्वावर यशवंतरावांच्या सहवासाचा आणि विचाराचा पगडा होता. पण कृतीमध्ये अंतर पडत गेलं.
राज्यात १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर ही मालिका खंडित झाली. शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना युतीचं सरकार स्थापन झालं. पण या सरकारला यश आणि सत्ता पचवता आली नाही. ऐन निवडणुकांच्या तोंडावर पंतांना बाजूला करून ज्येष्ठ मंत्री नारायण राणे यांची नियुक्ती ‘मातोश्री’वरून झाली. दुसरीकडे पवारांनी पुन्हा एकवार सवतासुभा निर्माण केला होता. तरीसुद्धा निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि युतीच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. इथूनच राज्यात आघाडी सरकारचं राजकारण सुरू झालं. अर्थात ही आघाडी मुख्यत्वे आजी-माजी काँग्रेसजनांचीच आहे. गेल्या सुमारे एक तपाच्या वाटचालीत विलासराव देशमुख दोन वेळा, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी एकेकदा काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. पण या तिन्ही नेत्यांची नावं आदर्श घोटाळय़ात अडकली आणि स्वच्छ प्रतिमेच्या शोधात असलेल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पृथ्वीराजबाबांचा आधार घ्यावा लागला. त्यानिमित्ताने १९९५ नंतर पश्चिम महाराष्ट्राबाहेर गेलेलं राज्याचं सत्ताकेंद्र पुन्हा तिथे आलं आहे. याच सातारा जिल्ह्यातून यशवंतरावांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली होती, हा एक योगायोग. या ठिकाणी नमूद करण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, या वाटचालीत १९७८ च्या पुलोद प्रयोगापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप आणि पकड राखून असलेला एकमेव नेता म्हणून शरद पवार यांचा उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर नेहमी पश्चिम महाराष्ट्राच्या नावानं बोटं मोडणाऱ्या मराठवाडा-विदर्भातील नेते जास्त काळ मुख्यमंत्री राहूनही हे प्रदेश मागासलेले राहिले, याचीही नोंद घ्यायला हवी.
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांची हवा हळूहळू जाणवू लागली आहे. अशा वेळी स्वच्छ, पारदर्शी प्रशासन आणि सार्वजनिक हिताला प्राधान्य देण्याची भाषा बोलणारे पृथ्वीबाबा काँग्रेस पक्षाचा चेहरा बनले आहेत. महाराष्ट्राच्या पन्नास वर्षांच्या राजकीय कालखंडाचं चक्र त्यामुळे पूर्ण झालं आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2013 12:55 pm

Web Title: saheb to baba
Next Stories
1 पार्टी विथ डिफरन्सेस
2 ही यादी थांबणार कधी?
3 आज.. कालच्या नजरेतून : आणखी एक गांधी
Just Now!
X