भारतरत्न पुरस्काराच्या निमित्ताने सुरू झालेला वाद अजूनही समाजमाध्यमांतून धुमसतच असताना, सध्या पद्म पुरस्कारांच्या निमित्ताने सुरू असलेला वादाचा खेळ मात्र सायना नेहवालची यंदा पद्मभूषण किताबासाठी शिफारस होऊसुद्धा शकते, अशा शक्यतेवर संपला आहे. एरवी हा खेळ दर प्रजासत्ताक दिनानंतर खेळला जातो. यंदा तो आधीच सुरू झाला आहे इतकेच. भारताची अर्जुन पुरस्कार विजेती बॅडिमटन खेळाडू, पद्मश्री सायना नेहवाल हिचे नाव यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत नसल्याची बातमी गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झाली आणि हा वाद सुरू झाला. त्याला तोंड फोडले सायनानेच. सायनाला २०१० मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले होते. गतवर्षी तिने आपले नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे पाठविले होते. तेव्हा तिला सांगण्यात आले, की दोन पुरस्कारांत पाच वर्षांचे अंतर असावे असा नियम आहे. तेव्हा यंदा तुझी शिफारस करता येणार नाही. तेव्हा यंदा तिने पुन्हा आपले नाव पाठविले. आता तरी आपल्याला पुरस्कार मिळेल अशी तिची खात्री होती; पण क्रीडा मंत्रालयाने तिचे नाव गाळले आणि त्या आगीत तेल म्हणून की काय सुशीलकुमारचे नाव पुढे केले. त्यावरून ती फुलराणी भडकली. ते रास्तच होते. सुशीलकुमारलादेखील नियमानुसार पद्म पुरस्कार मिळून अद्याप पाच वष्रे झालेली नाहीत. असे असताना त्याची शिफारस केली जाते आणि सायनाला मात्र नियम दाखविले जातात. या अन्यायाविरोधात तिने मग जोरदारपणे, नापसंतीदर्शक ट्विप्पण्या करणे आरंभले. तेव्हा समजले की, ज्या भारतीय बॅडिमटन संघटनेने सायनाचे नाव क्रीडा मंत्रालयाकडे पाठवायला हवे होते, ते त्यांनी केलेच नाही. याच संघटनेने पाठविलेली शिफारशीची नस्ती म्हणे रविवारी रात्रीच क्रीडामंत्री सर्बनंद सोनोवाल यांच्या बंगल्यावर पोहोचली. ही नस्ती पाठविण्यामागे क्रीडा क्षेत्रातील राजकारणाची उठाठेव आहे, की निव्वळ प्रशासकीय हलगर्जी हे अद्याप समजले नाही. आता सायनाला पुरस्कार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु त्यामुळे या प्रकरणात सर्वाचीच जी नीळ नासली ती काही परत येणार नाही. खरे तर यात सायनाला दोष देण्याचे काही कारण नाही. पद्म पुरस्कारांच्या नियमानुसार तिने आपले नाव पुढे केले. सर्वानाच ते करावे लागते. तेव्हा पुरस्कार हे मिळवावे लागतात, ते मागून घ्यायचे नसतात अशा आदर्शवादाला काही अर्थ नाही. बडे बडे मातब्बरसुद्धा पद्म पुरस्काराच्या हव्यासापोटी मंत्रालयाच्या दारी जाऊन जे काही करतात ते पाहिले की या पुरस्कारविजेत्यांचे पाय कशाने बनलेले आहेत आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर या पुरस्कारांचे मोल काय असते हे नीटच लक्षात येते. सायना ही पद्म पुरस्कारांसाठी लायक नाही असे कोणीही म्हणणार नाही. मग तिचे नाव पुढे का पाठविण्यात आले नाही, हा सवाल उरतोच. त्या अन्यायाविरोधात तिने आवाज उठवला यासाठी खरे तर तिचे कौतुकच करावयास हवे. आजची पिढी पुरस्कारांकडेसुद्धा ‘सड्डा हक एथ्थे रख’ या पद्धतीनेच पाहते, हे यानिमित्ताने सर्वानीच समजून घेण्याची आवश्यकता आहे.