अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू, हे सयीद हमीद यांच्याकडे १९८० ते ८५ पर्यंत असलेले त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च पद. त्यामुळे, माजी कुलगुरू हीच रूढार्थाने त्यांची ओळख. पण त्यांना मान होता, तो केवळ कधी तरी कुलगुरूपद भूषविल्यामुळे नव्हे. कुलगुरूपदावर येण्याआधीची २८ वर्षे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले, नेहरूकाळातील सर्वधर्मसमभाव खऱ्या अर्थाने आणि संपूर्णपणे त्यांच्या उक्ती आणि कृतीत होता तसेच भारतीय मुस्लिमांचे शिक्षणदारिद्रय़ दूर करण्यासाठी ते झटले, त्यासाठी संस्थाउभारणीही त्यांनी केली, यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाते. दिल्लीत सोमवारी, वयाच्या ९४ व्या वर्षी ते निवर्तले.
नावाचे इंग्रजी स्पेलिंग ‘सय्यद’ अथवा ‘सैद’पेक्षा निराळे- ‘सयीद’ असे करण्याचा निर्णय त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर घेतला होता. ते मूळचे फैजाबादचे. अलिगढ विद्यापीठातूनच १९४१ मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि १९४२ पासून त्या वेळच्या यूपी (युनायटेड प्रोव्हिन्स अथवा संयुक्त प्रांत- आताचा उत्तर प्रदेश) प्रांतिक सेवेत अधिकारी म्हणून, तर १९४८ पासून भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी काम केले.
पदांची आशा न बाळगता, सेवेच्या संधी शोधणे ही सयीद हमीद यांची रीत. ती सरकारी सेवेनंतर आणि अलिगढच्या कुलगुरूपदानंतरही त्यांनी कायम ठेवली. चालून आलेले राज्यपालपद त्यांनी नाकारले आणि ‘हमदर्द’ या औषधनिर्मिती समूहाच्या आर्थिक सहकार्यातून मुस्लिमांसाठी त्यांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या. यातूनच ‘जामिया हमदर्द’ – हमदर्द विद्यापीठ- उभे राहिले. भारतभर यात्रा काढण्याचे राजकारण हिंदुहितकारी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी करून पाहिल्यानंतर, १९९२ साली इतर अनेक बुद्धिवादी सहकाऱ्यांना साथीला घेऊन सयीद हमीद यांनी देशभर ‘तालिमी कारवाँ’ ही यात्रा काढली होती. या ‘कारवाँ’चे पहिले उद्दिष्ट होते साक्षरता आणि शिक्षण, दुसरे आरोग्य, तिसरे जातीय सलोखा आणि चौथे- इस्लाममध्ये सामाजिक सुधारणा. ही चार उद्दिष्टे एका यात्रेने पूर्ण होणारी नव्हती, हे खरे. पण असे अनेक प्रयत्न करण्याची तयारी त्यांनी नेहमीच ठेवली होती. पुढे मुस्लिमांच्या उन्नयनासाठी नेमल्या गेलेल्या राजिंदर सचर समितीमध्ये सयीद हमीद यांचा समावेश झाला. या समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी आणि त्यातील मुद्दे सर्वांपर्यंत पोहोचावेत, या हेतूने त्यांनी ‘कारवाँ ए इन्साफ’ ही दुसरी यात्रा काढली होती. संस्थाउभारणीचे समाधान मिळण्याचे क्षणही कमी का होईना, पण त्यांना मिळाले. श्रीनगरचा शाह फैजल हा २०११ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिला आला होता. त्याने यशाचे श्रेय दिले ते, प्रसंगी उर्दूत शिकवणाऱ्या ‘हमदर्द स्टडी सर्कल’ला! ही संस्था हमीद यांनीच उभारली होती.