प्रादेशिक भाषेत लिहिले म्हणजे ते संकुचित प्रादेशिकवादीच असणार असे म्हणून त्यावर टीका केली जाते किंवा त्याची दखलच घेतली जात नाही. ही दोन्ही पापे आपल्याकडील इंग्रजी प्रसारमाध्यमांकडून सातत्याने केली जातात आणि येथील पहिल्या पिढीच्या आंग्लाळलेल्या वा आंग्लाळू होऊ पाहणाऱ्या समाजास त्याचे काहीच वाटत नाही..
कलाकृतीच्या मूल्यमापनाचे मापदंड बाजारपेठेच्या आकारावर बेतले जाऊ लागले की सुमारांनादेखील महत्त्व प्राप्त होऊ लागते. सलमान रश्दी यांची भालचंद्र नेमाडे यांच्या पुरस्कारावरील प्रतिक्रिया ही याच बाजारपेठीय गंडातून तयार झालेली आहे. नेमाडे यांनी समीक्षक या नात्याने काही वर्षांपूर्वी रश्दी यांच्या लेखनावर सडकून टीका केली होती. ती योग्य की अयोग्य याबाबत मतभेद होऊ शकतात. रश्दी यांना त्या टीकेवर प्रतिवादाचाही तितकाच अधिकार आहे. परंतु त्या वेळी केलेल्या टीकेचा सूड म्हणून नेमाडे यांच्या ज्ञानपीठावर रश्दी यांनी केलेल्या टीकेचे मात्र समर्थन होऊच शकत नाही. ती आक्षेपार्ह आणि अभिरुचीशून्य असून ती ज्या भाषेत केली आहे ती पाहता रश्दी यांची सांस्कृतिक यत्ता त्यातून दिसून येते. एका लेखकास दुसऱ्या लेखकाच्या कलाकृती थोर न वाटणे यात काही नवीन नाही. हे होतच असते. परंतु म्हणून तीवर टीका करताना सभ्यतेचे किमान निकषदेखील पाळले जाऊ नयेत हे निषेधार्ह आहे. या संदर्भात अधिक निषेधार्ह आहे ती भारतातील, त्यातही महाराष्ट्रातील, लेखन-वाचनविश्वातील शांतता. हे असे होते याचे कारण केवळ बाजारपेठेच्या आकारावरून उत्पादनाचा दर्जा ठरवण्याचे नवीनच खूळ अलीकडे आपल्याकडे रुजले आहे म्हणून. म्हणजे एखाद्या उत्पादनाची बाजारपेठ मोठी असेल तर ते साहजिकच जास्त खपणार आणि तसे ते जास्त खपले म्हणजे ते चांगले असे आपण मानणार असा हा नवबाजारवाद आहे. हा बाजारपेठेचा नियम साहित्य संस्कृतीलाही लागू होताना दिसतो. इंग्रजी साहित्य हे याचे उदाहरण. कोणत्याही देशी बाजारपेठेपेक्षा इंग्रजी भाषेतील साहित्य हे केव्हाही अधिक विकले जाणारच. कारण त्या भाषकांची बाजारपेठ मोठी आहे. परंतु याचा अर्थ म्हणून त्या बाजारपेठेत विकले जाणारे सर्वच साहित्य हे थोरच असते असे नाही. आपल्याकडे इंग्रजीत काही कमी भुक्कड लेखक आहेत असे नाही. रश्दी हेदेखील इंग्रजीत लिहितात. कोणी कोणत्या भाषेत लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या भाषानिवडीबाबत आक्षेप घेण्यासारखे काही नाही. रश्दी यांचा भारताशी संबंध फक्त जन्मापुरता. स्वातंत्र्यपूर्व भारतात ते मुंबईत जन्मले. परंतु स्वातंत्र्य मुहूर्तावरच्या फाळणीमुळे त्यांच्या काश्मिरी मुसलमान वडिलांनी पाकिस्तानात जाणे पसंत केले. तेथून ते इंग्लंडला गेले. त्यामुळे रश्दी यांचे शालेय आणि महाविद्यालयीन आदी शिक्षण हे सर्व इंग्लंडमधलेच. त्या अर्थाने इंग्रजी ही त्यांच्यासाठी मातृभाषाच. तेव्हा त्यांची वाङ्मयीन अभिव्यक्ती त्याच भाषेतून होणार यात काही गर म्हणता येणार नाही. त्यांची लिखाणाची भाषा इंग्रजी आणि लिखाणाचे विषय आशियाई. यामुळे त्यांच्या समीक्षकांनी, विशेषत: भारतीय, रश्दी यांच्यावर भारतीयत्व लादले. ही चूक करणाऱ्यांत अर्थातच नेमाडे यांचाही समावेश होतो.
हादेखील एक प्रकारचा गंडच. परदेशात, त्यातही धनाढय़ अशा पाश्चात्त्य देशांत, नाव कमावणाऱ्यांची मुळे भारताशी संबंधित आहेत किंवा काय याचा शोध घेण्याचा रिकामटेकडा छंद आपल्याला आहे. मग ते अमेरिकेतील लोकप्रतिनिधी बॉबी जिंदाल असोत किंवा ब्रिटनमधील कीथ वाझ. या अशांचे भारतीयत्व मिरवायला आपल्याला आवडते. नेमाडे यांनी रश्दी यांच्यावर टीका करताना त्यांना भारतविषयक काहीही कळत नाही, असे अनुमान काढले. त्याची गरज नव्हती. कारण आपल्याला भारताविषयी काही कळते असा रश्दी यांचा दावा नव्हता. त्यांच्यावर भारतीयत्व लादले आपण आणि ते कळत नाही म्हणून टीका केली तीही आपणच. रश्दी यांच्या लिखाणातील वास्तवाचा आणि प्रत्यक्षातील वास्तवाचा काहीही संबंध नाही, असेही नेमाडे यांचे म्हणणे होते. तेही गरच. कारण सत्य हे एकच असते असे नाही आणि ते एकच आहे असे मानले तरी दोन भिन्न कलाकारांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकच असायला हवा असे नाही. तेव्हा नेमाडे यांचे त्याबाबत चुकलेच यात शंका नाही. ललित कलाकृतीतील सत्य हे लेखकाच्या दृष्टिकोनातील सत्य असते. नेमाडे म्हणतात तोच निकष लावायचा झाल्यास त्यांच्या कादंबऱ्यांतील वास्तवाबाबतदेखील प्रश्न उपस्थित करता येतील. मग ते सत्य पांडुरंग सांगवीकरासमोरील असो किंवा ताज्या हिंदूतील खंडेरावाला दिसलेले असो. या अशा सत्यास आव्हान देणे हे लेखकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारे असते. तसे आव्हान देऊन नेमाडे यांनी नकळतपणे रश्दी यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा प्रयत्न केला, हे नि:संशय. तरीही यातील महत्त्वाचा मुद्दा हा की तसे करण्याआधी नेमाडे यांनी रश्दी यांच्या चारित्र्याचे परिशीलन केले. रश्दी यांचे साहित्य न वाचताच ते केवळ इंग्रजीत आहे म्हणून झोडून काढा त्याला असा संकुचित दृष्टिकोन नेमाडे यांचा नव्हता आणि नाही.
हे रश्दी यांच्याबाबत म्हणता येणार नाही. अन्य अनेक मराठी भाषकांप्रमाणे नेमाडे यांचे साहित्य थोरच आहे असे रश्दी यांनीही म्हणावे असा आग्रह कोणी धरणार नाही. नेमाडे यांचे लेखन सुमार आहे, असे मानण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य रश्दी यांना नक्कीच आहे. पण तसे करण्याआधी त्यांनी ते निदान वाचायला तरी हवे. परंतु त्याची गरज रश्दी यांना वाटत नाही. ही त्यांची मिजास एकाच कारणातून येते. ती म्हणजे आपण इंग्रजीत लिहितो म्हणून. वास्तविक जगातील उत्तमोत्तम साहित्य हे काही फक्त इंग्रजीतच लिहिले जाते हा भ्रम आहे आणि तो फक्त भारतातील निर्बुद्ध आंग्लाळलेल्यांनी जोपासलेला आहे. अंतोन चेकॉव्ह इंग्रजी नव्हता. बोरिस पास्तरनाक इंग्रजी नव्हता. लिओ टॉलस्टॉयचे अजरामर लिखाण इंग्रजीत नाही. एमिल झोला याने इंग्रजीत लिहिले नाही. व्हिक्टर हय़ूगो, जाँ पॉल सात्र्, आल्बेर कामू, गाय द मोपासा, काफ्का, डोस्टोव्हस्की इंग्रजी नव्हते. असे अनेक दाखले देता येतील. हे लेखक इंग्रजी भाषेत लिहीत नव्हते म्हणून त्यांच्या लेखनाची दखल न घेताच त्यावर टीका करणार काय? अलीकडे अन्य भाषकांच्या लिखाणावर आपल्याकडे दोनच प्रतिक्रिया उमटतात. एक म्हणजे प्रादेशिक भाषेत लिहिले म्हणजे ते संकुचित प्रादेशिकवादी असणार असे म्हणून त्यावर टीका केली जाते किंवा त्याची दखलच घेतली जात नाही. ही दोन्ही पापे आपल्याकडील इंग्रजी प्रसारमाध्यमांकडून सातत्याने केली जातात आणि येथील पहिल्या पिढीच्या आंग्लाळलेल्या वा आंग्लाळू होऊ पाहणाऱ्या समाजास त्याचे काहीच वाटत नाही. हा समाज सांस्कृतिकदृष्टय़ा अधांतरी असून ना धड इंग्रजी संस्कृतीशी परिचय ना प्रादेशिक अशी त्याची अवस्था आहे. भारतातील इंग्रजी प्रसारमाध्यमे यात मोडतात. त्यामुळे एखाददुसरा सन्माननीय अपवाद वगळता नेमाडे यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराची दखल न घेण्याचा माजोरडेपणा ते करू शकतात आणि तरीही त्यांना कोणी जाब विचारू शकत नाही.
महाराष्ट्राच्या त्रिशंकू अवस्थेचे हे फळ आहे. असा प्रकार एखाद्या बंगाली लेखकाबाबत झाला असता तर समस्त भद्रलोक चवताळून उठला असता आणि त्यांना तेथील इंग्रजी माध्यमांची साथ लाभली असती. येथे सगळीच बोंब. मराठी मराठी करणाऱ्या जय महाराष्ट्रवाद्यांची संस्कृती अमराठी उद्योगपतींकडून खंडणी उकळण्यातच धन्यता मानू लागली आणि ज्यांना या संस्कृतीचे मोल आहे ते इंग्रजी निमंत्रणाची लाचार प्रतीक्षा करण्यात मश्गूल राहिले. त्यामुळेच इंग्रजीचा हा नवबाजारवाद माजला हे वास्तव आहे. आता तो डोक्यावर बसून मिरे कधी वाटू लागतो तेवढेच पाहायचे.