आयपीएल फिक्सिंगप्रकरणी अखेर शरद पवार यांनी मौन सोडताना सर्वच सामन्यांची केंद्रीय गृहखात्याने चौकशी करण्याची मागणी केली. वरवर पाहता त्यांनी लक्ष्य जरी श्रीनिवासन यांना केले असले तरी त्यांना वेध घ्यायचा आहे दालमिया यांचा. क्रिकेटची काळजी हे काही त्यांच्या भूमिकेमागील कारण नाही.
आयपीएल आणि फिक्सिंगचे वादळ इतके टिपेला गेल्यावर का होईना शरद पवार यांनी तोंड उघडले. गेल्या आठवडय़ात हे वादळ घोंघावायला सुरुवात होत होती तेव्हा पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी थेट क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामाच मागितला होता. तेव्हा अनेकांचा समज असा झाला की त्रिपाठी जे काही बोलले ती राष्ट्रवादीचीच भूमिका आहे. परंतु श्रीनिवासन यांच्याविषयी त्रिपाठी यांचे वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असे सांगत राष्ट्रवादीने या वादाचे शिंतोडे आपल्या पक्षावर उडू दिले नाहीत. त्यामुळे उलट गोंधळ वाढला. कारण पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने मांडलेले मत हे पक्षाचे नाही, असा खुलासा झाल्याने मग पक्षाचे या प्रश्नावर नक्की मत काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. या संदर्भात संबंधितांना अर्थातच रस होता तो पक्षाच्या भूमिकेत नव्हे, तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मतांत. परंतु योग्य वेळी मौन साधायची कला पुरेपूर अंगी बाणवली गेलेली असल्याने या प्रश्नावर त्याही वेळी पवार यांनी भाष्य करणे टाळले. त्यामागच्या कारणांचा अंदाज बांधणे अर्थातच अवघड नाही. परंतु अखेर पवार यांना मौन सोडावेसे वाटले. बुधवारी मुंबईत बोलताना त्यांनी यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वच सामन्यांची चौकशी करण्याची मागणी केली आणि ही चौकशी केंद्रीय गृह खात्याने करावी असेही सुचवले. पवार येथेच थांबले असते तर त्यांच्या भाष्याची दखल घेतली जावी असे काही त्यात नव्हते. परंतु पुढे जाऊन पवार असेही म्हणाले की मी जर क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असतो तर हे सध्या जे काही चाललेले आहे, ते घडले नसते. या संदर्भात त्यांनी ‘हे जे काही’ याकडे निर्देश करण्यासाठी वेडपटपणा हा शब्दप्रयोग वापरला. याबाबत आम्हीही त्यांच्याशी सहमत आहोत. परंतु मुद्दा आहे पवार यांच्या विधानाच्या पूर्वार्धाचा. मी असतो तर असे काही घडले नसते असे पवार यांचे म्हणणे असेल तर त्यांना काही गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. ती खुद्द पवार यांना नाही असे कोणीही म्हणणार नाही. तेव्हा ही आठवण करून द्यायला हवी की आयपीएल या संकल्पनेचा जन्मच पवार यांच्या काळात झाला. पवार हे २००५ ते २००८ या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वेसर्वा होते. आयपीएलचा जन्म २००८ सालचा. याचा अर्थ आयपीएल ही तद्दन बाजारू अणि उनाड संकल्पना जन्माला आली तीच मुळी पवार यांच्या काळात. आयपीएलची प्रेरणा युरोपियन फुटबॉल लीग आहे असे म्हणतात. ते खरे असेल तर विद्यमान आयपीएलमध्ये ज्या काही टुकार आणि भिकार कल्पना घुसवण्यात आल्या आहेत त्या रोखण्यासाठी वा बदलण्यासाठी पवार यांनी काय केले? युरोपियन लीगमध्ये सामन्यांचे समालोचन करणाऱ्यांना सामना सुरू असताना खेळाडूंशी बोलता येत नाही. हे आयपीएलमध्ये होते. ते का? खेरीज क्रिकेट हा काही फुटबॉलइतका गतिमान खेळ नाही. तेव्हा जेमतेम तास-दीडतास चालणाऱ्या एका संघाच्या खेळात मध्येच स्ट्रॅटेजिक टाइम आउट कशासाठी? या टाइम आउटचा फायदा कोणाला असेलच तर तो बुकींना हे पवार यांना समजले नव्हते काय? युरोपियन लीग स्पर्धेत ज्येष्ठ खेळाडूंना नाचायला गायला लावत नाहीत. आयपीएलमध्ये मात्र कपिलदेव असोत की आणखी कोणी. त्यांना झम्पिंग झपाक वगैरे निर्बुद्ध क्रिया करावयास लावण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू एकटा पुरेसा नाही काय? खेरीज महत्त्वाचा मुद्दा असा की विद्यमान व्यवस्थेत सामन्यांच्या समालोचकांना आयोजक भरभक्कम रकमा देऊन बांधून ठेवतात. त्यामुळे हे समालोचक फक्त विकले गेलेले पोपट असतात. सामन्यातील कोणत्याही गैरप्रकारांविषयी ते ब्रही काढू शकत नाहीत. आयपीएलला जन्म देताना पवार यांना हे अभिप्रेत होते काय? असेल तर प्रश्न निकालात निघतो. पण नसेल तर ते रोखण्यासाठी पवार यांनी इतके दिवस काय केले?
याशिवाय पवार यांना आणखी एका पापात वाटा घ्यावाच लागेल. ते म्हणजे ललित मोदी. या बाजारू आणि उद्दाम व्यक्तीचा उदय आणि वाढ पवार यांच्या काळात झाली. पवार ज्या काळात क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते त्याच काळात मोदी हे उपाध्यक्ष होते. तेही सरळपणे नव्हे. मोदी यांचा मूळ संबंध होता हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेशी. परंतु तेथून तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी त्यांना हाकलून लावले. तेव्हा मोदी राजस्थान क्रिकेट संघटनेच्या आश्रयास गेले. असे म्हणतात की तेथे त्यांनी आपले नाव केवळ ललित कुमार एवढेच लावले. कारण त्यांना हिमाचली संघटनेशीही संबंध कायमचे तोडावयाचे नव्हते. राजस्थान क्रिकेट संघटनेत शिरकाव केल्यावर तेव्हाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हाताशी धरून मोदी यांनी बरेच उद्योग केले. तोपर्यंत राजस्थान संघटना दुसरे उद्योगी पुरुषोत्तम रुंगटा यांच्या ताब्यात होती. संघटनेचे सर्वच्या सर्व संचालक रुंगटा कुटुंबीय वा नातेवाईक होते. त्यांना हुसकावून लावत मोदी यांनी ही संघटना ताब्यात घेतली आणि त्या नात्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळात त्यांना प्रवेश मिळाला. तोपर्यंत या मंडळावर प्रभाव होता तो कोलकात्याचे जगमोहन दालमिया यांचा. एव्हाना पवार यांचे लक्ष सोन्याची अंडीच अंडी देणाऱ्या क्रिकेट संघटनेवर गेले होते आणि दालमिया यांची अध्यक्षपदाची खुर्ची त्यांना खुणावत होती. त्या सत्तासंघर्षांत मोदी यांनी मोलाची भूमिका बजावली आणि पवार यांच्याकडे अध्यक्षपद गेल्यावर ते उपाध्यक्ष बनले. आयपीएलची सुपीक कल्पना त्यांचीच. ती राबवण्यात पवार यांनी त्यांना मुक्तद्वार दिले. त्याच काळात मोदी यांना नक्की कोणाचे आणि किती अभय आहे याबाबतच्या सुरस आणि चमत्कारिक कथा मोठय़ा प्रमाणावर चघळल्या जात होत्या, याची कल्पना अर्थातच पवार यांना नसणे अशक्य आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात सध्या तुरुंगात असलेल्या श्रीशांत यास हरभजन सिंग याने श्रीमुखात भडकावली होती. प्रत्यक्षात त्याचा वळ आयपीएलच्या लौकिकावर उमटला तेव्हाही पवार या सगळ्याचे साक्षीदार होते. हे सगळे टळावे यासाठी त्यांनी त्या काळी काही उपाय योजल्याचे ऐकिवात नाही. क्रिकेट नियामक मंडळातील अध्यक्षपदानंतर दोनच वर्षांनी- २०१० मध्ये पवार यांच्याकडे थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद आले. याच काळात आयपीएलची दिशा नक्की झाली होती आणि काय लायकीच्या मंडळींकडे या खेळाचे नियमन आहे, हे स्पष्ट होऊ लागले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा प्रमुख म्हणून हे सगळे रोखण्यासाठी पवार यांना बरेच काही करता आले असते. ते त्यांनी किती आणि काय केले याचाही तपशील दिल्यास क्रिकेट रसिक त्यांचे ऋ णी राहतील. वास्तव हे आहे की विद्यमान वादग्रस्त अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या पाठीशी जगमोहन दालमिया उभे राहात आहेत हे दिसल्यावर पवार यांना मौन सोडावे असे वाटले. लक्ष्य जरी त्यांनी श्रीनिवासन यांना केले असले तरी त्यांना वेध घ्यायचा आहे दालमिया यांचा. क्रिकेटची काळजी हे काही त्यांच्या भूमिकेमागील कारण नाही.
असे असतानाही मी असतो तर हे घडले नसते, असे म्हणण्यास धाष्टर्य़ लागते. त्याची कधीच कमतरता पवार यांच्याकडे नव्हती. त्यांच्या या धाष्टर्य़ास सलाम.