आत्मदर्शनाची तळमळ आणि त्यासाठी गीतेतील कर्तव्यकठोरता आचरणात आणण्याची तयारी हे गुण मतदारांमध्ये असतील, तर नागरिकांकडे आधी स्पष्ट मते असतील आणि निवडणुकांचा अर्थ अशा मतांचे दान एवढाच असेल..
तत्त्वज्ञान किंवा दर्शन कोणतेही असले, कोणत्याही देशात, कोणत्याही काळात विकसित झालेले असले तरी ‘जग आणि माणूस समजावून घेणे’ ही सर्वसमावेशक व्यापक भूमिका प्रत्येक तत्त्वज्ञानामागे असते. माणूस जिवंत असताना त्या त्या काळातील विद्यमान जगाची रचना, त्याचे स्वरूप आणि पुढील अपेक्षित विकासाची दिशा समजावून घेणे, हा त्या त्या काळातील राजकीय व सामाजिक कार्यक्रम असतो.   
‘मत’ म्हणजे केवळ शिक्का मारणे किंवा बटन दाबणे (व्होट) नसते. ‘मतदान’ ही कृती राज्यकर्ता निवडण्याचे नागरिकाचे आकलन कसे आहे, उमेदवाराचे व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन नागरिक कसे समजावून घेतो आणि भावी राज्यकर्त्यांविषयी त्याच्या अपेक्षा काय आहेत, तसेच ‘लोकशाही’ या संकल्पनेचे त्याचे भान असते. ते ‘चांगले राज्य’, ‘चांगले राज्यकत्रे’ या संकल्पना स्पष्ट करणारे त्याचे ज्ञान (नॉलेज) असते. विकता येईल, असे ते ‘होयबा-मत’ नसते. (लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पाकीट-भेट संस्कृतीचे पाईक पत्रकारांनाही हा नियम लागू आहे.)
लोकशाही जीवनपद्धतीत मतदात्या नागरिकाला हे आकलन नेमके कसे झाले किंवा होत असते; याची जाण तो नागरिक ‘मतदान करणे’ या कृतीतून व्यक्त करीत असतो. मतदान ही भौतिक जीवनातील दु:खाचा अनुभव कमी करणे आणि सुरक्षित, शांत, प्रगत, समृद्ध जीवनाची खात्री, या ऐहिक उद्दिष्टांसाठी केली जाणारी शुद्ध भौतिक कृती असते.  
लोकशाहीतील मत म्हणजे असे अनेक घटकांनी बनलेले नागरिकाचे ज्ञान (नॉलेज) अशी संकल्पना मान्य केली तर ‘भारतातील बेकारालाच काय पण भिकाऱ्यालाही अशा ज्ञानपूर्ण मतदानाचा अधिकार आहे’ हा दावा अभिमानास्पद आहे, हे खरे. पण बेकार असणे, भिकारी असणे, गुन्हेगार असणे, भ्रष्ट असणे, बेवारस वृद्धत्व हे विद्यमान बहुपक्षीय राज्यकारभाराचे फळ आहे आणि त्या कारभाऱ्यांचे आपणा नागरिकांना भोगावे लागणारे कर्मफल आहे, तेच राजकारण आहे, अज्ञान आहे, हे कळत नाही. ‘राजकारणाचे यथार्थ भान हे ‘दर्शन’ किंवा ‘तत्त्वज्ञान’ म्हणून विकसित होण्यापेक्षा तो निवडक राज्यकर्त्यांचा खेळ मात्र बनतो.
विद्यमान लोकशाही जीवनरीत भारतीय दर्शनांमधून निष्पन्न झालेली नाही तर ती ग्रीक-पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानातून निर्माण झालेली आहे. तिला तत्त्वज्ञानात्मक इतिहास आहे. भारतात तो आयात झालेला आहे, हे भान निर्माण करणे, त्या भानाचे रक्षण करणे किंवा त्यात आपण आपला सहभाग देऊन ते भान अधिक समृद्ध करणे हे ‘तत्त्वभान’ या संकल्पनेचे स्वरूप म्हणता येऊ शकेल. म्हणजे नेमके काय करावयाचे? तर हे आयात (इम्पोर्टेड) तत्त्वज्ञान समजावून घेणे, त्याचे यथार्थ ‘दर्शन’ घेणे आणि त्या विचारविश्वाचा  ‘दार्शनिक’ म्हणून आपण स्वत:ला नवे ट्रेिनग देणे आणि ज्ञानयुक्त मतदान करणे.
उदाहरणार्थ कर्तव्य ही संकल्पना भारतीय आणि पाश्चात्त्य परंपरेत आहे. ‘कर्तव्य म्हणजे काय? ते कसे करावे?’ हा प्रश्न  श्रीमद्भगवद्गीता उपस्थित करते आणि आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात इमान्युएल कांट (१७२४-१८०४) हा तत्त्ववेत्ताही उपस्थित करतो. ‘‘कर्तव्यपालनात नातेवाईकशाही, घराणेशाहीसारख्या भावनिक घटकांना हद्दपार करावे आणि निखळ धर्मरक्षण करावे, जनहित हाच धर्म मानावा’’ हा उपदेश भगवद्गीता करते आणि कांट ‘वस्तुनिष्ठ-व्यक्तिनिरपेक्ष केवळ कर्तव्यासाठी कर्तव्य’ असा सिद्धांत मांडतो. सद्हेतू हाच कर्तव्याचा हेतू असावा, असे तो सांगतो.
 वस्तुत: गीतेची कर्तव्यकठोरता कांटच्या ‘कर्तव्यासाठी कर्तव्य’ या संकल्पनेपेक्षा अधिक सकस मानता येईल. पण भारतीय जनतेच्या विचारविश्वात गीतेतील कर्तव्यकठोरतेऐवजी आत्म्याचे अमरत्व ठाण मांडून बसले. परिणामी इंग्रजी विद्या भारतात आली तेव्हा गीतेवर आधारित कठोर कर्तव्याची संकल्पना भारतीय लोकशाहीत विकसित झाली नाही. उलट पाश्चात्त्य परंपरेतील कांट, रुसो, हॉब्ज, मिल्ल, स्पेन्सर, मार्क्‍स, रॉल्ससारख्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या विचारांमधून ही संकल्पना आली. हक्क, समता, समृद्धी या सामाजिक व राजकीय मूल्यांचा उदयसुद्धा याच पाश्चात्त्य परंपरेत आहे. त्याचाच प्रतिध्वनी लोकहितवादी, फुले, रानडे, राजा राममोहन राय, आगरकर, शाहू, आंबेडकर, महर्षी िशदे, गांधी ते संत तुकडोजी ते अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्या विचारात ऐकू येतो.
श्रीमद्भगवद्गीतेतील ‘आत्मा अमर आहे’ या तत्त्वज्ञानापेक्षा ‘अधर्म करणाऱ्या कुणालाही; मग तो कितीही प्रिय नातेवाईक असला तरी केवळ जनहितार्थ, कसलाही स्वार्थ न बाळगता संपूर्ण अनासक्ती योग साधून, स्थितप्रज्ञ होऊन कर्तव्यकठोरतेने शिक्षा केली पाहिजे,’ हे ‘दर्शन’ घडणे, घडविणे हे लोकशाहीसाठी उपयोजित आहे. हे अनेक तत्त्वभानांपकी एक तत्त्वभान, एखादे ‘नवदर्शन’ असेल.  
 परंपरेत जे चांगले, योग्य व यथार्थ आहे, ते टिकवून ठेवण्याचा आग्रह योग्य आहेच, पण ते योग्य म्हणजे धर्म-जात-िलगभेद नाही किंवा मनुस्मृतीची भलावण नाही; तर उदाहरणार्थ गीतेचा नवा अर्थ शोधणे. भंजाळलेल्या आधुनिक अर्जुनांनी भाऊ धर्माधिकारी यांची ‘गीता चिकित्सा’ किंवा राजीव साने यांचे ‘नवपार्थ हृद्गत’ समजावून घेणे, ही तत्त्वभानाची आणखी एक दिशा मानली पाहिजे किंवा कर्तव्य कसे करावे यासाठी सुब्रतो रायसारख्या बेमुर्वत दु:शासन व दुर्योधनांना धडा शिकविणाऱ्या के. एम. अब्राहम, सी. बी. भावे यांसारख्या सनदी अधिकाऱ्यांकडे पाहता येईल.
अद्वैत वेदान्तच स्वीकारायचा असेल तर गांधीजींचा मोक्ष स्वीकारणे ही आधुनिकता आहे. ‘आत्मकथा’च्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘ज्याच्यासाठी तीस वष्रे माझी धडपड चालली आहे ते आहे आत्मदर्शन, माझा मोक्ष! माझी सर्व हालचाल याच दृष्टिकोनातून चालते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मनोभावे पडतो ते मोक्षासाठी!’ गांधीजी गीतेकडे याच कर्तव्यभावनेने पाहतात.  
शेकडो संप्रदायांमध्ये मिसळून गेलेल्या देशभरातील करोडो मतदात्यांचा मोक्ष कोणता? ‘हे पाहा, आत्मा अमर आहे, असे मानणारे कोर्टात का जातात, हे मला कळत नाही,’ असे सॉक्रेटीस म्हणतो. आत्मा अमर असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाईट वाटण्याचे कारण नाही. अन्नसुरक्षेचा आग्रह धरण्याचे कारण नाही. त्यामुळे अमर आत्म्यापेक्षा जिवंत शेतकऱ्यांची, मतदारांची, नागरिकांची काळजी घेणारे राजकारण करणे, हा साऱ्यांचा मोक्ष असेल. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं’ हे शेतीचे तत्त्वज्ञान असेल.
या आयात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मिसळण आपल्या संस्कृतीत कशी झाली, ती आणखी उपयुक्त कशी ठरेल असे पाहता येईल. पारंपरिक भारतीय आचारविचार आणि अनुभवविश्वात ‘भारतीय ख्रिस्ती दर्शन’ अथवा ‘भारतीय इस्लाम दर्शन’ असा नवा विचार प्रस्थापित झाला तरच भारतीय संस्कृती ‘जल्प-वितंड-वाद’ ही परंपरा जपणारी, नवा ‘संवाद’ साधणारी ‘विश्लेषक’ उदारमतवादी, सहिष्णु लोकशाही आहे; असे यथार्थ रीतीने म्हणता येईल.
धर्माच्या रक्षणाचे कंत्राट घेणाऱ्या, कंत्राट हाच धर्म समजणाऱ्या लोकप्रतिनिधीपेक्षा अस्सल लोकशाहीचे रक्षण-संवर्धन हाच धर्म मानणारे आधुनिक धार्मिक नेते निवडण्याचे ‘दार्शनिक शहाणपण’ वास्तवात आणणे, हेही नवे तत्त्वभान आहे. हे तत्त्वभान ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेत आहे; ते तत्त्वज्ञान ही आपली आजच्या काळात जगण्याची चौकट आहे, म्हणून त्याचा परिचय आवश्यक आहे.
अर्थात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाच काय, पण कोणत्याही तत्त्वज्ञानाचा अथवा कशाचाही अभ्यास न करता अत्यंत सुखाने जगता येईल. पण ती निवड (तत्त्ववेत्ता जॉन स्टुअर्ट मिलचे शब्द वापरायचे तर..) ‘सुखी डुक्कर की असमाधानी सॉक्रेटीस?’ अशापैकी ठरेल.
लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत