News Flash

‘बांबूच्या घरा’ला हवी देणाऱ्या हातांची साथ!

कुपोषणाच्या छायेत वावरणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बालकांचा विषय आला की, त्याचा संबंध केवळ आरोग्याशी जोडला जातो, पण आदिवासींच्या जगण्याच्या साधनांवरील ताण हे त्यामागील एक कारण आहे.

| October 14, 2012 09:44 am

कुपोषणाच्या छायेत वावरणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बालकांचा विषय आला की, त्याचा संबंध केवळ आरोग्याशी जोडला जातो, पण आदिवासींच्या जगण्याच्या साधनांवरील ताण हे त्यामागील एक कारण आहे. एका दाम्पत्याने हे ओळखले आणि आदिवासींमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे काम दोन दशकांपूर्वी सुरू केले. शेकडो आदिवासींच्या आयुष्याला त्यांनी ‘बांबूचा आधार’ दिला.
सुनील आणि निरुपमा देशपांडे या त्या दाम्पत्याने स्थापन केलेले धारणी तालुक्यातील लवादा येथील ‘संपूर्ण बांबू केंद्र’ हे आता आदिवासींच्या आत्मबळाचे प्रतीक ठरले आहे.
सुनील देशपांडे यांनी आदिवासी तरुणांना बांबूकला शिकवली. बांबूपासून टिकाऊ  घर तयार करण्यापासून विविध कलावस्तूंपर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या. निरुपमा देशपांडे यांनी आदिवासी महिलांमधील संघटनशक्ती वाढवली. महिला आणि पुरुषांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्याची व्यवस्था उभी केली. देशपातळीवर बांबू केंद्राच्या कामाची दखल घेतली गेली आहे.
आदिवासींच्या हाताला काम मिळाले, तर दारिद्रय़ आणि त्यामुळे सुरू होणारे आरोग्य व इतर प्रश्न सहजरीत्या सुटू शकतील, आदिवासी बालकांना, मातांना पोषक अन्न मिळू शकेल, आदिवासी कुटुंबात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होईल, या उद्देशाने संपूर्ण बांबू केंद्राने काम सुरू केले होते, केंद्राच्या कामाला आता यश मिळू लागले आहे. शेकडो तरुण या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आपापल्या भागात रोजगाराची साधने उभी करण्यात गुंतले आहेत. संपूर्ण बांबू केंद्राच्या विस्तारासाठी लोकांच्या सहकार्याची गरज आहे. बांबू तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणे, बांबू सुरक्षा व रंग प्रक्रियेला चालना देणे, विविध जातींच्या बांबूची लागवड करणे, वस्तुसंग्रहालय उभारणे, परंपरागत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच गुरुकुलाची स्थापना करण्याचा संकल्प केंद्राने केला आहे. या ठिकाणी धातूकाम, चर्मकला, नैसर्गिक रेषाकला या क्षेत्रांत काम करण्यात येणार आहे. केंद्राच्या विस्तारीकरणासाठी निधीची आवश्यकता आहे. इच्छुकांनी संपूर्ण बांबू केंद्र, लवादा, मेळघाट या नावाने धनादेश काढावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 9:44 am

Web Title: sampoorna bamboo kendra amravati social organisation loksatta upkram donation help
टॅग : Help
Next Stories
1 स्वरमंदिराच्या पूर्ततेसाठी हवे रसिकांच्या लोकवर्गणीचे दान
2 रुग्णसेवेच्या ‘भावे प्रयोगा’ला समाजाच्या ‘टॉनिक’ची गरज
3 इतिहास जपण्यासाठी हवा आर्थिक दिलासा
Just Now!
X