‘जाफना लोक वाचनालय’ पस्तीस वर्षांपूर्वी जाळले गेले होते व श्रीलंकेतील वांशिक संघर्षांला वेगळेच वळण देणारी ही घटना आहे, असा धोक्याचा इशारा त्यांनी त्याच वेळी दिला होता. जे लोक पुस्तकांमध्ये दडलेला इतिहास व संस्कृती विसरतात, ते चुकीच्या गोष्टींची पुनरावृत्ती करीत राहतात, असे त्यांचे मत होते. श्रीलंकेतील वांशिक संघर्षांचे अचूक विश्लेषण व तेथील तामिळींवर होत असलेल्या अन्यायाचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले होते, त्यांचे नाव संतसिलन कादिरगमार. त्यांच्या निधनाने श्रीलंकेने एक व्यासंगी इतिहासकार गमावला आहे.

संतसिलन हे २००५ मध्ये हत्या झालेले श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरगमार यांचे चुलतबंधू. त्यांचा जन्म जाफनातील चावाकाछेरी येथे एप्रिल १९३४ मध्ये झाला. त्यानंतर जाफना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तेथून ते इतिहासाचे शिक्षण घेण्यासाठी पेराडेनिया विद्यापीठात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते मलेशियात होते. श्रीलंकेतील डाव्या चळवळीत ते विद्यार्थिदशेपासूनच सक्रिय झाले. नंतर काही काळ ते जाफना महाविद्यालयात इतिहास विषय शिकवत होते. सत्तरच्या दशकात त्यांनी कोलंबो विद्यापीठात अध्यापन केले, नंतर टोकियोतील इंटरनॅशनल ख्रिश्चन विद्यापीठात ते पदव्युत्तर अभ्यासाकरिता गेले. १९७९ मध्ये ते जाफना विद्यापीठात ‘आंतरवंशीय न्याय व समता चळवळीच्या अध्यासना’चे प्रमुख बनले. उत्तरेकडील लष्करीकरण, न्याय पायदळी तुडवून केल्या जाणाऱ्या हत्या असे अनेक विषय त्यांनी मांडले. ‘जाफना लोक वाचनालय’ जाळले गेल्यावर, १९८१ मध्ये त्यांनी जाफना नागरिक समिती स्थापन केली. जाफना यूथ काँग्रेसचा प्रभाव, वांशिक राष्ट्रवादाची संकुचितता, लोकशाही तत्त्वांची पायमल्ली अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या ‘जाफना काँग्रेस’या पुस्तकाचे तामिळमध्ये भाषांतर झाले आहे. एथ्निसिटी- आयडेंटिटी, कॉन्फ्लिक्ट अँड क्रायसिस’या ग्रंथाचे संपादन त्यांनी कुमार डेव्हिड यांच्यासमवेत केले होते. ‘द तमिळ्स ऑफ लंका- देअर स्ट्रगल फॉर जस्टिस अँड इक्व्ॉलिटी विथ डिग्निटी’, ‘द लेफ्ट ट्रॅडिशन इन लंकन पॉलिटिक्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली होती. मानवी हक्क देखरेख व प्रचारात भाग घेतल्याबद्दल त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह १९८३ नंतर विजनवासात जावे लागले; नंतर एकदम इ.स. २००० मध्ये ते श्रीलंकेत परत आले. निवृत्तीच्या पंधरा वर्षांत तामिळ समुदायातील पुरोगामी विचारवंतांच्या वर्तुळात त्यांचा वावर होता, त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी युवकांशी संवाद चालू ठेवला व उत्तर श्रीलंकेतील अनुभव सतत मांडले.