एकनाथ ठाकूर यांच्या दोन गोष्टी ठळकपणे जाणवायच्या. दुर्दम्य उत्साह आणि धडाडी. हे दोन्ही घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकमेकांची सावली झाले होते. ठाकूर ही कधीच एक व्यक्ती नव्हती. ते आजन्म संस्था होते. त्याचमुळे स्टेट बँक ऑफ इंडियातल्या साध्या नोकरीपासून सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांचा प्रवास हा प्रत्येक टप्प्यावर काही ना काही घडवणारा झाला. स्टेट बँकेतल्या नोकरीमुळे त्यांचा बँकिंग व्यवसायाशी परिचय झाला. त्यातूनच त्यांना जाणवल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या गरजा. ज्या काळात बँकांचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होत होता आणि बेरोजगारांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर वाढत होते त्या काळात या दोन्हींतील विसंवादाची जाणीव त्यांना झाली. त्यातूनच जन्माला आले ते नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग.
थोर संस्थापुरुष हरपला!
सुरुवातीला नावामुळे खरे तर ही काही एखादी राष्ट्रीय संस्था असावी असा भास होत असे. परंतु ती पूर्णपणे ठाकूर यांची निर्मिती होती. नवमध्यमवर्गाच्या उदयानंतर त्या काळी बँकांत नोकऱ्या मिळविण्यात फारच लोकप्रियता होती. या नोकऱ्या मिळविण्याचे एक तंत्र होते. ठाकूर यांनी त्यावर हुकमत मिळवली आणि त्यातून व्यवसायसंधी तयार केली. नवीन व्यवसायसंधी शोधण्याच्या खास मराठी अपंगपणाने त्यांना कधीही स्पर्श केला नाही. या बँकिंग प्रशिक्षण संस्थेने ठाकूर व्यवसायाच्या वेगळ्याच परिघात प्रवेश करते झाले. ते ज्या कोकणातून आले होते त्याच परिसरातले असेच धडपडे आणि उमदे जयंत साळगावकर हे त्यांचे खास स्नेही. तेदेखील सारस्वत. तेव्हा या दोन सारस्वतांनी मराठी माणसाच्या व्यवसाय उत्कर्षांसाठी अनेक उपक्रम राबवले आणि ते यशस्वी करून दाखवले. मग ते अगदी दादर व्यापारी संघासारख्या संघटना का असेनात. जो कोणी व्यापारउदीम करू इच्छितो त्यास ठाकूर यांचा मदतीचा हात सदैव तयार असे. ज्या परिसरातून ठाकूर काम करीत होते तो परिसर दादर, प्रभादेवी वगैरे हा. शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकेंद्राचाच तो भाग. त्यातूनच पुढे त्यांचा कै. बाळासाहेबांशी स्नेह जमला आणि नंतर मग ठाकूर राज्यसभेतदेखील जाऊन आले. पुढे सारस्वत बँकेने त्यांना आकृष्ट केले. सारस्वत समाजातल्या अनेक मान्यवरांचा या बँकेत वावर. तेव्हा ठाकूर मागे राहणे शक्यच नव्हते. शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू हे त्या वेळी या बँकेचे अध्यक्ष होते. ठाकूर यांच्या धडाडीसमोर त्यांना बाजूला व्हावे लागले. तेव्हापासून सारस्वत बँकेवर ठाकूर यांनी जी पकड घेतली ती घेतलीच. या बँकेला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनवले. प्रभादेवीत आज जेथे बँकेचे दिमाखदार मुख्यालय आहे तेथे आधी रहिवासी इमारत होती. तेथील रहिवाशांचा बँकेसाठी जागा सोडण्यास विरोध होता आणि ते साहजिकही होते. ठाकूर यांनी जातीने या रहिवाशांना विश्वासात घेतले आणि त्याच परिसरात उत्तम जागा देऊन त्यांची मने जिंकली. नावीन्याचा त्यांचा दुर्दम्य उत्साह इतका प्रभावी की कर्करोगासारखा आजारही त्यांना पहिल्या भेटीत रोखू शकला नाही. या आजाराच्या उपचारात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. एखादा लेचापेचा असता तर हडबडला असता, पण ठाकूर यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. गेली दोन वर्षे त्यांचा ‘लोकसत्ता’च्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या बदलांचा दस्तावेज तयार व्हायला हवा, अशी त्यांची इच्छा होती. त्यातूनच ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू झाला. कर्करोग बळावला, शस्त्रक्रिया झाल्या तरीही ते या चर्चासत्रांना येत. बसून बसून त्यांची पाठ दुखे, तरीही ते थांबत, उपस्थितांशी चर्चा करीत. कर्करोगाच्या नवनव्या लाटा या काळात त्यांच्यावर आदळत होत्या. त्यातच अखेर त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या उमद्या एकनाथी संस्थेस ‘लोकसत्ता’ची आदरांजली.