मराठी साहित्यात स्वातंत्र्योत्तर काळात ज्या कवयित्रींनी आपला वेगळा ठसा उमटवला, त्यात सरिता पदकी यांचे नाव अग्रभागी आहे. केवळ कविताच नव्हे, तर ललित लेखन आणि बालसाहित्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी उठून दिसणारी आहे.  शांता शेळके, पद्मा गोळे, संजीवनी मराठे यांच्या जातकुळीच्या सरिताबाईंच्या कवितेचे त्या काळात वाचकांनी अतिशय मनापासून स्वागत केले होते. पदकी यांनी कविता नेहमीच आपल्या हृदयाशी बाळगली आणि तिच्याशी सतत संवादी राहण्याचा प्रयत्न केला. साहित्यातील अनेक आकृतिबंध वेगवेगळ्या पद्धतींनी हाताळण्याची त्यांची क्षमता अतिशय निराळी होती. त्यामुळे नाटकापासून ते ललित साहित्यापर्यंत अनेक साहित्य प्रकारांत त्या रममाण होऊ शकल्या. शब्दांचे अवडंबर न माजवता, त्यांच्याशी लडिवाळपणे खेळत आपले मनोगत या सगळ्या प्रकारांतून व्यक्त करण्यासाठी सरिताबाईंनी आपले आयुष्य खर्ची घातले. बालसाहित्यातील त्यांचे वेगळेपण तर सहजपणे लक्षात येणारे होते. ‘किशोर’ या मासिकात त्यांनी केलेले लेखन सत्तरच्या दशकात अतिशय लोकप्रिय झाले होते. त्यांच्या लेखनात मुलांचे भावविश्व साकारताना परिसर, निसर्ग, दैनंदिन जीवन यांचे दर्शन घडते. ‘लगनगांधार’, ‘अंगणात माझ्या’ आणि ‘चैत्रपुष्प’ हे त्यांचे काव्यसंग्रह जसे वाचकांनी मनापासून स्वीकारले तसेच ‘बारा रामाचं देऊळ’ आणि ‘घुम्मट’ हे कथासंग्रहही वाचकांच्या स्मरणात राहिले. अनुवादाच्या क्षेत्रातील त्यांचे कामही तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे. करोलीना मारिया डी जीझस यांच्या ‘चाइल्ड ऑफ डार्क’ या आत्मनिवेदनाचा ‘काळोखाची लेक’ या नावाने सरिताबाईंनी केलेला अनुवाद परिणामकारक ठरला. यूजीन ओनील यांच्या नाटकाचा ‘पांथस्थ’ या नावाने केलेला अनुवादही तेवढाच लक्षणीय ठरला. आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्रीविषयक संकलन सरिताबाईंनी आत्मीयतेने केले होते. नाटय़लेखनातील त्यांचे वेगळेपणही त्यांच्या ‘सीता’ या नाटकातून दिसून आले.
अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी केलेला विहार आत्मविश्वासाचा आणि सर्जनाचा होता. त्यांचे पती मंगेश हेही साहित्यातील दर्जेदार नाव. ‘सत्यकथा’चे लेखक म्हणून नाव मिळवलेले मंगेश पदकी हे अर्थशास्त्राच्या क्षेत्रातही दबदबा असलेले नाव होते. जीवनव्यवहाराप्रमाणेच साहित्याच्या प्रांतातही या दाम्पत्याने एकमेकांना अतिशय सुरेख साथ दिली. सरिताबाईंच्या निधनाने मराठी साहित्यातील मंद तेवणारी पणती विझली आहे.