केवळ प्रपंचातच गुंतलेलं आणि प्रपंचापलीकडे कशाचाही विचार न करू शकणारं मन हे प्रपंचालाच सर्वस्व मानत असतं. ते मन साधनेकडे वळलं की मायेची जाणीव होऊ लागते, पण तिच्या पकडीतून सुटता मात्र येत नाही. आपल्यातील भ्रमाची जाणीव होते पण प्रसंग आला की भ्रमच ताबा घेतो आणि मनाची भटकंती थांबत नाही. मायिक भावनेचा पगडा असलेली साधकाची बुद्धी शुद्ध करण्याचं विशेष र्कम सद्गुरू पार पाडत असतात!  ज्याला पोहता येत नाही त्याला किनाऱ्यावर बसून पोहायला शिकवता येत नाही. शिकवणाऱ्यानंही थेट पाण्यात उतरून शिकवायला सुरुवात केली की त्याच्या अस्तित्वामुळेदेखील आपण बुडणार नाही, हा विश्वास शिकणाऱ्याच्या मनात उत्पन्न होतो.  पोहायचं कसं हे शिकता येतं. तद्वत सुख-दु:ख, लाभ-हानी यांनी भरलेल्या द्वैतमय जीवनात मन शांत कसं राखायचं, स्थिर कसं राखायचं, भगवंताचं चिंतन कसं टिकवायचं आणि वाढवायचं हे किनाऱ्यावर उभ्या असलेल्या माणसाकडून किंवा केवळ सद्ग्रंथातून शिकता येत नाही. सद्गुरूही जेव्हा स्वत: द्वैतमय प्रपंचात उतरतात, प्रपंचात जगतानाच भक्ती कशी करायची हे स्वत:च्या कृतींतून शिकवतात तेव्हाच ते प्रभावीपणे मनावर ठसतं. केवळ त्यांच्याच जीवनाकडे पाहून, द्वंद्वमय, द्वैतमय जगण्यातही माणूस साधना करू शकतो, मन स्थिर राखू शकतो, उच्च पातळीवर नेऊ शकतो, यावर विश्वास बसू शकतो. त्यांना ते सहज साधतं, माझी ती पात्रता नाही, हेदेखील जाणवतंच, पण तेच मला दिलासा देतात, धीर देतात. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत, ‘प्रथम पहिलं पाऊल टाकण्याएवढा तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मग पुढची पावलं तुम्ही विश्वासानं टाकू लागाल!’ तेव्हा जसं स्वामी सांगतात, तसं जगायला निदान सुरुवात तरी करून पाहू, असा निश्चय झाला तरच पहिलं पाऊल टाकता येतं. हा निश्चय व्हायला माझी शुद्ध बुद्धी जागी व्हावी लागते. एकदा ही सदसद्विवेक बुद्धी जागी झाली की ती अवघं जीवन उजळून टाकू लागते. ती प्रज्वलित करणं हेच सद्गुरूंचं अखंड कार्य! त्या सद्गुरूंच्या आंतरिक स्थितीचं वर्णन स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ३५व्या ओवीपासून आहे! ‘नित्यपाठा’तील ३५ ते ४६ अशा ११ ओव्यांमध्ये द्वैतमय प्रपंचात सर्वसामान्य लोकांसारखंच वावरत असताना आणि वरकरणी सर्व सुख-दु:खं भोगत असतानाच सद्गुरूंची आंतरिक स्थिती कशी असते,  अखंड प्रसन्नतेनं त्यांचं चित्त कसं सदा व्याप्त असतं, त्याचमुळे संसारदु:खात ते आहेत, असं भासत असूनही संसारदु:ख त्यांना स्पर्शही कसं करीत नाही, त्यांची बुद्धी सदोदित परमात्म्यात कशी स्थिर असते, कर्मात असूनही त्यांना त्या कर्माची बाधा कशी होत नाही आणि ते म्हणजे जणू मनुष्यवेशात प्रकटलेलं परब्रह्म कसे, याचं माउलींनी केलेलं सूचन आहे. त्या ओव्यांकडे आता वळू. यातील पहिल्या दोन ओव्या अशा : दीपाचेनि प्रकाशें। गृहींचे व्यापार जैसे। देहीं कर्मजात तैसें। योगयुक्ता।। तो कर्मे करी सकळें। परी कर्मबंधा नाकळे। जैसें न सिंपें जळीं जळें पद्मपत्र।।