स्वामी पावसला देसायांच्या घरात सहजसाधेपणानं राहात होते. आपण कुणी विशेष आहोत, असा कणमात्रही अविर्भाव त्यांच्या वावरण्यात नव्हता. जिथं अविर्भावाचाच पसारा असतो तिथं खरा शुद्ध भाव असूच शकत नाही. आपण कुणीतरी आहोत, असं मानणं आणि दुसऱ्याला भासवणं हे अज्ञान जिथं आहे तिथं शुद्ध ज्ञान असूच शकत नाही. खरा सत्पुरुष त्यामुळेच ओळखणं कठीण असतं. म्हणूनच स्वामींच्या अगदी जवळ राहाणाऱ्यांनाही त्यांचं खरं अलौकिकत्व उमगायला वेळ जावा लागला. त्यांची सदाचरणी वृत्ती, शिस्तबद्ध जीवनशैली आणि चेहऱ्यावर विलसणारं समाधान; याची जाणीव लोकांना व्हायची पण त्यातून त्यांचं खरं महत्त्व जाणवत असेच, असंही नाही. प्रत्येक सद्गुरूंच्या चरित्रात असंच घडलं आहे. आज शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, गोंदवल्याकडे लोकांचा ओघ आहे. प्रत्यक्षात सद्गुरू त्या-त्या स्थानी होते तेव्हा प्रथम त्यांचं खरं महत्त्व किती लोकांना उमगलं होतं? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।।’’ (गीता, अध्याय ९/ श्लोक ११). हे अर्जुना, माझं पूर्णस्वरूप न जाणणारे मूढ लोक सर्व चराचराचा स्वामी असलेला मी जेव्हा मनुष्यदेह धारण करून येतो, तेव्हा तर माझा परम भाव, परम उद्देश लक्षात न घेता माझी अवहेलनाच करतात! माऊली सांगतात, ‘‘..वेधली दिठी कवळें। ते चांदणियातें म्हणे पिवळें। तेविं माझां स्वरूपीं निर्मळे। देखाल दोष।। नातरी ज्वरे विटाळलें मुख। तें दुधातें म्हणे कडू विख। तेविं अमानुषा मानुष। मानाल मातें।। म्हणऊनि पुढती तूं धनंजया। झणें विसंबसी या अभिप्राया। जे इया स्थूलदृष्टी वायां। जाइजेल गां।। पैं स्थूलदृष्टी देखती मातें। तेंचि न देखणें जाण निरुतें। जैसें स्वप्नींचेनि अमृतें। अमरा नोहिजे।।’’ (ज्ञानेश्वरी, अ. ९ / ओव्या १४१ ते १४४). काविळीमुळे पांढरंशुभ्र चांदणंही पिवळं दिसू लागतं. त्याचप्रमाणे माझं स्वरूप शुद्ध असतानाही त्यावर लोक दोष लादतात आणि ते अशुद्ध मानू लागतात. मी पूर्ण असूनही दोषदृष्टीनं मला अपूर्ण मानतात. तापानं तोंड कडवट झालं आणि दुधाची चव कडू वाटू लागली. निराकार असलेल्या मला आकारात चिणलंत तर तीच गत होईल. म्हणून हे अर्जुना, माझ्या खऱ्या, शुद्ध, पूर्ण स्वरूपाला विसरून स्थूल बुद्धीनं मलाही जडजिवागत पाहू लागशील तर स्वप्नातल्या अमृतपानाइतकंच ते पाहणंही व्यर्थ होईल. वेधली दिठी कवळें। ते चांदणियातें म्हणे पिवळें! इथे चांदण्याचा उल्लेख आहे. हे ‘चांदणं’ म्हणजे काय हो? अठराव्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकाने गीतेची समाप्ती झाली. तो प्रख्यात श्लोक म्हणजे, ‘यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भूतिध्र्रुवा नीतिर्मतिर्मम।।’ जिथं कृष्ण अन् जिथं अर्जुन तिथं विजयश्री आहेच, याचं भावांतर करताना माऊलींनी अनेक उपमा प्रकाशिल्या. त्यातली एक आहे, चंद्र तेथे चंद्रिका! चंद्र आहे तिथे चांदणं असायचंच. अर्थात चांदणं आहे तिथे पूर्णचंद्रही असलाच पाहिजे. चांदण्यात विलसत असलेल्या पूर्णचंद्राचा अर्थात सद्गुरू स्वरूपाचा उल्लेखही याच ओवीत तर आहे!