साधनेच्या सुरुवातीला आपली स्थिती कशी असते, ते आपण जाणत आहोत. ही स्थिती ‘मज हृदयी सद्गुरू’ या जाणिवेसह नसते. उलट ‘मी’ आणि ‘माझे’नं भारलेली असते. थोडक्यात ‘मज हृदयी अहंभारू’ अशी ही स्थिती असते! ‘मी’ आणि ‘माझे’चं ओझं आपण हृदयात अर्थात अंत:करणात जन्मापासून बाळगत असतो. आपल्या मनातले सर्व विचार, कल्पना, आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया या त्या अहंभावनेतूनच होत असतात. मन साधनपथावर लागलं की सुरुवातीला साधना एक कर्तव्य म्हणून पार पडत असते. त्यात कृत्रिमता असते. खरी ओढ असतेच, असं नाही. खरी ओढ दुनियेकडेच असते. साधना तरीही जर चिकाटीनं होऊ लागली तर अवचित एखाद्या क्षणी मनाला शब्दांत सांगता येणार नाही अशा प्रसन्नतेचा अनुभव येतो. तो झटकन ओसरतो, पण तरी त्या क्षणाचा प्रभाव फार मोठा असतो. जीवन म्हणजेच साधना, ही स्थिती नसतानाच्या काळात दैनंदिन कर्तव्याप्रमाणे केल्या जाणाऱ्या साधनेतही मनाला फार थोडा काळ का होईना ज्या मानसिक स्थैर्याचा, मानसिक शांतीचा, निर्भयतेचा अनुभव येतो, तो ती साधना संपून मन भौतिक व्यवहारात येताच ओसरतो. मन पुन्हा अस्थिरतेच्या, अशांतीच्या, भयाच्या अनुभवानं हिंदकळू लागतं. तेव्हा या प्राथमिक पातळीवर मन साधनेत एकाग्र करणं, जीवन सद्गुरूंच्या अनुसंधानात व्यतीत व्हावं, यासाठी त्या अनुसंधानाचा अभ्यास करणं या झटापटीत व्यग्र असतं. समर्थानीही ‘देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी’ या शब्दांत या प्रक्रियेचं ध्येय डोळ्यापुढे ठेवायला सांगितलं आहे. थोडक्यात आज आपल्याला देहभान आहे. त्या जागी आत्मभान जागं करायचं आहे. त्या आत्मभानाची स्थिती कायमची राखायची आहे. ते साधलं तरच ‘म्हणौनि विशेषें अत्यादरू विवेकावरी’, हा टप्पा गाठला जाईल. आज देहभान असल्याने जगणं देहबुद्धीच्या आवडीनुसार व्यतीत होत आहे. देहबुद्धीला जे प्रेय आहे तेच आवडतं. जे प्रेय आहे, माझ्या आवडीचं आहे ते श्रेय असेलच असं नाही, माझ्या हिताचं असेलच असं नाही. जे खऱ्या अर्थानं माझ्या हिताचं आहे त्याचा स्वीकार आणि जे खऱ्या अर्थानं माझ्या अहिताचं आहे त्याचा त्याग, हाच खरा विवेक आहे. जीवनात सार काय, शाश्वत काय आणि असार काय, अशाश्वत काय हे ओळखता येणं आणि ते ओळखल्यावर जे सार आहे, शाश्वत आहे ते स्वीकारून जे असार आहे, अशाश्वत आहे ते मनातून त्यागता येणं, हाच खरा विवेक आहे. आज हा विवेक नाही म्हणूनच आपल्या जगण्यात अविवेकापायी विसंगती, विरोधाभास आहे. जीवनात शाश्वत काय आहे, सार काय आहे, योग्य काय आहे, स्वीकारार्ह काय आहे, त्याग करण्यासारखं काय आहे, हे केवळ सद्गुरूंच्याच बोधातून जाणता येतं. त्यांच्या कृपाछायेतच जे योग्य आहे, स्वीकारार्ह आहे ते जीवनात बाणवण्याचा अभ्यास करता येतो. त्यासाठी वारंवार त्यांच्याच बोधाचं स्मरण मनात घोळवावं लागतं. वारंवार त्यांच्या सहवासाचा अनुभव घ्यावा लागतो किंवा त्यांच्या व्यापक लीलाचरित्रातील प्रसंगांचा आधार मनाला द्यावा लागतो.