बाकी सगळी ऋणं चुकती करता येतात पण एक ऋण कधीच आणि कशानही चुकतं होत नाही ते म्हणजे श्रीसद्गुरूकृपेचं ऋण. त्यांच्या ऋणात जन्मभर राहून त्यांच्या इच्छेची जाणीव जागी ठेवत जगणं, हाच ते ऋण किंचित, तसूभर फेडण्याचा मार्ग असतो. स्वामींचं सारं जीवन म्हणजे सद्गुरू शरणागतीचा पाठ आहे. श्रीसद्गुरूंच्या इच्छेनुसार जीवनाच्या वाटेवरून त्यांच्याच पावलांच्या पाऊलखुणा हृदयात जपत त्यांच्या आधारानं चालणं हीच सद्गुरू चरणांची खरी उपासना आहे. त्यातच जीवनाची कृतार्थता आहे. अशी वाटचाल होत नसेल तर प्रत्येक दिवस हा मनातली रुखरुख वाढवूनच सरेल. आपण कुणाचं म्हणवतो आणि कसं जगतो, ही खंत तीव्र होईल. तसं झालं नाही तर एक तर वाटचाल योग्य दिशेनं आहे किंवा चुकीच्या दिशेनं सुरू असलेल्या पायपिटीची आपल्याला पर्वा नाही, यापैकी एकच गोष्ट खरी आहे. स्वामींचा आग्रह मात्र जीवन कृतार्थ करून घेण्यासाठीच आहे. आपल्या जीवनावरून ही गोष्ट मूकपणे शिकवण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे. ‘स्वामी म्हणे झालें कृतार्थ जीवन। सद्गुरू-चरण उपासितां।।’ या शब्दांतून स्वामींनी जो कृतार्थभाव व्यक्त केला आहे त्याचा आपल्यालाही अनुभव यावा, अशी त्यांची इच्छा आहेच. त्यांच्या जीवनातील या गुरुकृपेच्या प्रसंगाकडे थोडं पाहू. १९२२ मध्ये म्हणजे विशीच्या उंबरठय़ावर स्वामींनी पावसमध्ये राष्ट्रकार्य सुरू केलं आणि त्यात स्वत:ला झोकून दिलं तरी त्यांच्यातील पारमार्थिक ओढीची ठिणगी विझली नव्हती. मामा केशवराव गोखले हे पुण्याच्या गणेशनाथांचे अनुग्रहित. १९२०मध्ये वडिलांनाही त्यांचाच अनुग्रह लाभलेला. त्यामुळे १९२३मध्ये मामांनी पत्राद्वारे भाच्याला गुरुबंधू होण्यासाठी सुचविलं तेव्हा स्वामींचं मन आनंदानं भरून आलं. १९२३मध्ये स्वामींना बाबामहाराज वैद्य अर्थात गणेशनाथ यांच्याकडून नाथपंथाची दीक्षा मिळाली. गणेशनाथांनी त्यांना सोऽहं मंत्राची दीक्षा दिली. भावसमाधीत निमग्न असलेल्या स्वामींची समाधी काही वेळात ओसरली. अंतरंगात परमानंदाच्या लाटा उसळवणारं मोठं वादळ निर्माण झालं होतं, ते समाधी उतरताच शमलं. स्वामींनी काहीशा अधीरतेनं गणेशनाथांना विचारलं, ‘‘सद्गुरूकृपा होताच पूर्णता प्राप्त होते, असं म्हणतात. मग माझा तसा अनुभव का नसावा?’’ या प्रश्नानं महाराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, ‘‘असं पाहा, आपण दुधाला विरजण लावतो. विरजण लावल्यावर लगेच त्याचं दही होतं का? बरं, विरजण लावल्यावर ते दूधही राहत नाही! त्याचप्रमाणे हे आहे. आपण जेवायला बसल्यावर पहिल्याच घासाबरोबर पोट भरतं का? एक एक घास घेत शेवटी पोट भरतंच. सूर्योदय होताच लगेच दुपार होत नाही. पूर्णावस्थेची स्थिती जाणण्यासाठी काही प्रयत्न हवा. गुरुगम्य मार्गानं आत्मसुखाची गोडी घेत राहणं, हाच तो प्रयत्न. आता तुला जो थोडा वेळ अनुभव आला तो सोऽहं भावाचा सतत अभ्यास केल्यावरच दृढ होईल. सोऽहंच्या ध्यासानं देहबुद्धीचा निरास करून साक्षित्वानं राहा व यथोचित कर्मे कर..’’ या अनुग्रहानंतर १९३४पर्यंतची पुढील ११ वर्षे ही याच ध्यासानं व्यापलेली होती!