फॉम्र्युला-वन मोटार शर्यतींमधील महान ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २६ वर्षांच्या सेबॅस्टियन वेटेलने गेल्या चार मोसमांवर गाजवलेले प्रभुत्व त्याच्या गुणवत्तेची साक्ष पटवून देते. सलग चार वेळा विश्वविजेतेपद पटकावणे, ही साधी गोष्ट नाही. पण वेटेलने ती किमया करून दाखवली आहे. त्यामुळेच वेटेल आयर्टन सेना, अ‍ॅलन प्रॉस्ट आणि मायकेल शूमाकर, युआन मॅन्युएल फँगियो या महान एफ-वन ड्रायव्हर्सच्या मांदियाळीत जाऊन बसला आहे. वेटेलच्या टीकाकारांचे म्हणणे असे की, जगातील सर्वोत्तम कार हातात असली की, कुणीही जगज्जेता होऊ शकतो! त्यात तथ्य आहे, ते कारच्या दर्जापुरतेच. वेटेल स्पर्धेत चालवतो ती कार एड्रियन निवे यांनी वेग आणि सुरक्षेकडे लक्ष पुरवून खास बनवली आहे. गुणवत्ता असलेला प्रत्येक ड्रायव्हर विश्वविजेता होऊ शकत नाही, तर विश्वविजेता होण्यासाठी लागते ती कठोर मेहनत, अनेक वर्षांची तपश्चर्या आणि सर्वस्व वाहून घेण्याची वृत्ती. वेटेलमध्ये यापैकी एकाही गोष्टीची कमतरता नाही. म्हणूनच आजच्या घडीला तो विश्वविजेतेपदाच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. भारतात वेटेलची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. गेल्या तीन वर्षांत एकाही ड्रायव्हरला बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर आपल्यापेक्षा वरचढ होऊ दिले नाही. त्यामुळे भारत आणि वेटेलचे जेतेपद हे जणू समीकरणच बनले आहे. पण वेटेलच्या वर्चस्वशाहीमुळे भारतीय प्रेक्षकही नाराज आहेत. एखाद्या लढतीतला विजेता जर निश्चित असेल, तर त्या लढतीतली रंगत कमी होऊन जाते, हेच भारतातल्या शर्यतीबाबत होऊ लागले आहे. यामुळे असेल वा अन्य कारणांमुळे, परंतु ‘इंडियन ग्रां प्री’ला मिळणारा प्रतिसाद कमी होत चालला आहे, हीदेखील डोळ्यात अंजन घालणारी बाब आहे. गेल्या तीन वर्षांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट लक्षणीय असल्यामुळे ‘इंडियन ग्रां प्री’चे भवितव्य धोक्यात येऊ शकते. अशा स्पर्धानी खेळाचे चाहते निर्माण करणे अपेक्षित असते, विजेत्याचे नव्हे. परंतु तसे झालेले नाही. त्यातच पुढील वर्षी इंडियन ग्रां प्रि शर्यतीला फॉम्र्युला-वनच्या वेळापत्रकात स्थान मिळू शकले नाही. शर्यतींवर होणारा अमाप पैसा खर्च करण्याची तयारी नसल्यामुळे संयोजक जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलने ही शर्यत ऑक्टोबरऐवजी मार्च महिन्यात व्हावी, यासाठी जागतिक ऑटोमोबाइल महासंघाकडे (फिया) साकडे घातले. पण फॉम्र्युला-वनचे सर्वेसर्वा बनी एस्सेलस्टोन यांनी थेट इंडियन ग्रां प्री शर्यतीलाच पुढील मोसमातून डच्चू दिला. त्यातच प्रत्येक संघाचे सामान शर्यतीच्या ठिकाणी पोहोचवण्यात येणारे अडथळे, सामानावर लागणारा भरमसाट कर आणि व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, यामुळे आधीच भारतातील शर्यतीवर बहिष्कार घालण्याचा इशारा फॉम्र्युला-वन संघांनी दिला होता. त्यातच आता रोडावलेल्या प्रेक्षकसंख्येची भर पडली आहे. त्यामुळे आता भविष्यात पुन्हा फॉम्र्युला-वन शर्यत होणारच नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत. तसे प्रत्यक्ष घडल्यास, अडीच हजार एकराच्या जमिनीवर चार हजार दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च करून बांधण्यात आलेला बुद्ध इंटरनॅशनल सर्किटचा ट्रॅक फक्त छोटय़ा स्पर्धापुरता शिल्लक राहील आणि हा पांढरा हत्ती पोसण्याचे काम जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलला करावे लागेल.