लंडन, हॅम्बर्ग, हाँगकाँग, सिंगापूर, न्यूयॉर्क, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को वगैरे भूमंडळावरील वित्तीय साम्राज्याची आज प्रस्थापित आगारे गणली जातात. तेथील दिग्गज गुंतवणूकदारांनी खूण करावी आणि भारतातील नवीन ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेतील कंपन्यांच्या प्रवर्तकांनी तेथील बाजारातून उभे राहिलेले भांडवल उपसून आपला व्यावसायिक पसारा वाढवावा, हा आजवर चालत आलेला प्रघात आहे. गेल्या दोन दशकांत किमान डझनावारी भारतीय कंपन्या असतील ज्यांनी हाच परिपाठ अनुसरून आपले उद्योगसाम्राज्य फैलावल्याचे दिसून येईल. रिडिफ, सिफी, डब्ल्यूएनएस ही त्यातील काही ठळक नावे. तोळामासा जीव असलेल्या आणि पुरता नफाक्षमही न बनलेल्या त्यांच्या व्यवसायाला नॅसडॅक अथवा न्यूयॉर्क शेअर बाजारात अवाच्या सव्वा बाजारमूल्य मिळतानाही दिसले आहे. असा वित्तीय परीसस्पर्श या व्यवसायांच्या नवतरुण संस्थापकांना तोवर कल्पनेतही शक्य नव्हता. आयआयटी-आयआयएममधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या, जुगाडू दृष्टिकोन, भन्नाट कल्पकता, दुर्दम्य ध्यास व अवीट जिद्दीच्या या पहिल्या पिढीच्या उद्योजकतेला असा विदेशातील गुंतवणूकदारांच्या पाठबळातून बहर यावा, यात वावगे काही नसले तरी असाच प्रयोग भारतातही आणि गुंतवणुकीची संधी भारतातील गुंतवणूकदारांनाही मिळावी, या कल्पनेला ‘सेबी’ने मूर्तरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी सूक्ष्म-लघू-मध्यम (एसएमई) उद्योगांसाठी असाच शेअर बाजारात सूचिबद्धतेतून भांडवलाची कवाडे खुली करणारा निर्णय घेतला होता. तोच आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेतील नवशिलेदारांसाठी अर्थात सेबीच्या परिभाषेत ‘स्टार्ट अप’ना खुला होत आहे. त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक भांडवलाचा स्रोत अधिक सहजसाध्य करणाऱ्या या पावलांचे स्वाभाविकच उद्योगजगताने स्वागत केले आहे. भारताची विशाल बाजारपेठ, अगणित संगणकक्षम, नेटकर व मोबाइलधारक लोकसंख्या आणि त्यातून अमर्याद व्यवसायशक्यतेचे कोंदण जर बाहेरच्या गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत असेल, तर ज्या मातीत ही व्यावसायिक सर्जकता फुलत आहे, तेथील गुंतवणूकदारांसाठी ही खरे तर पर्वणीच ठरावी. ‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या मंगळवारच्या निर्णयामागे हाच विचार आहे. ज्ञान हेच प्रधान भांडवल गाठीशी घेऊन, उद्योग सुरू करणाऱ्या या नवागत मंडळींना काळाच्या मागणीनुरूप पसारा विस्तारत नेणे क्रमप्राप्त असून, त्यासाठी ‘पुंजी’रूपी भांडवलाची गरज लागतेच. साहसी भांडवलदार संस्थांनी नवागतांना पैशाची राशी खुल्याही केल्या आणि खासगी भांडवल स्वरूपात गेल्या दोन वर्षांत ५०० कोटी गुंतविले आहेत. रतन टाटांसारख्या ज्येष्ठ उद्योगधुरीणाने व्यक्तिगत स्वरूपात जवळपास नऊ नवागतांना धन-पाठबळ दिले आहे. पण ‘सेबी’च्या अंदाजाप्रमाणे आजच्या घडीला नवसर्जक उद्यमींची अर्थात ‘स्टार्ट अप्स’ची संख्या तीन हजारांहून अधिक असेल. आर्थिक पाठबळ नाही म्हणून नवागतांची उमेद मारली जाऊ नये अथवा पैशाच्या जोरावर बडय़ा धेंडांकडून ती गिळंकृत होऊ नये, यासाठी टाकले गेलेले हे पाऊल स्वागतार्हच ठरावे. इंटरनेट, ई-व्यापार विश्वात आज भले सूक्ष्मसा ठिपका असेल, पण शिखर गाठायचेच अशी उमेद नाशिक, नागपूर, लुधियाना अशा छोटय़ा शहरांतूनही दिसून येते. या उद्यमी नवशिलेदारांची स्वयंप्रेरणा शाबूत ठेवायची, तर त्यांची स्व-मालकी व अस्मिता कायम राखली जायला हवी. सेबीच्या निर्णयामागे असााच प्रयत्न आहे. उद्याच्या फेसबुक, गुगल अथवा अ‍ॅमेझॉन, ईबेसारख्या जगविख्यात नाममुद्रा घडविण्याच्या दिशेने आवश्यक रचनेची ही पायाभरणी नक्कीच!