अगदी मुळापासून सुरुवात करतो, या योगेंद्रच्या बोलण्यावर, ‘की अगदी मूलाधारापासून सुरुवात करतोस?’, असं ज्ञानेंद्रनं विचारलं तेव्हा कर्मेद्र आणि हृदयेंद्रचे चेहरे प्रश्नचिन्हांकित झाले, पण योगेंद्र खुदकन् हसला आणि म्हणाला..
योगेंद्र – नाही, त्याही आधीपासून थोडी सुरुवात करतो.. माझ्या मनात आलं, कावळा दाराशी ओरडतो, पण मुळात तो ओरडतोच का? बघा हं, हृदयेंद्रच्या म्हणण्याप्रमाणं माउली फार प्रेमानं शब्दांचा वापर करतात.. तरी ‘कोकताहे’ हा काहीसा तीव्र शब्द ते वापरतात त्यामागे तीव्र ओरडणंच अभिप्रेत आहे.. हे ओरडणं भुकेचं आहे.. भुकेची जाणीव झाल्यावरचं आहे..  
हृदयेंद्र – हो! जे आपल्या घरी रोज दुपारी न चुकता काकबळी म्हणून भाताची मूद ठेवतात ना, त्या ठरल्यावेळी कावळा हजर होतो.. यजमानाला थोडा जरी उशीर झाला तरी तो तीव्र कावकाव करून त्याला जागं करतो.  
ज्ञानेंद्र – व्वा! अगदी तसं आत्मज्ञानाची भूक लागलेला अंत:करणाचा कावळा कोकत आहे! आता आत्मज्ञानानं तृप्त झाल्याशिवाय तो शांत होणारच नाही.  हाच शुभशकुन.. मग या ‘यजमाना’कडे ‘पाहुणे’ बनून पंढरीराया कसे येतील? तर त्यासाठी उन्नत झालं पाहिजे, आचरणाला शुद्ध ज्ञानाची जोड पाहिजे..  
योगेंद्र – किंवा शुद्ध साधनाभ्यासाची जोड हवीच! हा विचार मनात आला आणि पुढच्या दारी ओरडणारा कावळा डोळ्यासमोर आला. या पुढे-मागेचा विचार करताना पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्गच डोळ्यासमोर आला.
कर्मेद्र – पूर्व मार्ग-पश्चिम मार्ग? तू जरा गूढ बोलण्यातून बाहेर येशील का?
ज्ञानेंद्र – बाबा रे तुला आणखीनच गूढात शिरावं लागणार आहे!
योगेंद्र – थांबा, जरा नीट लक्ष द्या. म्हटलं तर सगळंच गूढ आहे, म्हटलं तर सगळंच उघड आहे. मी मगाशी म्हटलं ना? या शरीरानं परमतत्त्वाला जाणता येणार नाही, पण आपल्याकडे या शरीराशिवाय या घडीला दुसरं साधन तरी कोणतं आहे? आणि हे शरीर जर परमप्राप्तीसाठीच मिळालं असेल तर मग शरीरातच त्याच्या प्राप्तीसाठीची शक्तीही अंतर्भूत नसेल का? त्या शक्तीचा आणि आपला नित्याचा संबंध आहे.. मी म्हटलं ना? म्हटलं तर सगळंच गूढ, म्हटलं तर सगळंच उघड आहे.. जन्मापासून आपण श्वासोच्छवास करतो. तो इतक्या अंगवळणी आहे, इतका सहज आहे की त्यात काही गूढ आहे, असं आपल्याला वाटतं का? खेळण्यातला निर्जीव बाहुला श्वासोच्छवास करू लागला तर गूढ वाटेल ना?
कर्मेद्र – गूढ काय, भयानकच वाटेल!
योगेंद्र – हो, पण हा श्वासोच्छ्वास सुरू आहे, म्हणूनच आपण सजीव आहोत, हा श्वास थांबला की निर्जीव होतो ना क्षणार्धात? त्या कलेवराला काही किंमत उरते का? काही नावलौकिक उरतो का?
हृदयेंद्र – फार जाणवतं रे! माझा कार्यालयातला मित्र गेला. त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी हे फार जाणवलं.. अरे ज्याला आम्ही अमर अमर म्हणून हाका मारत होतो, ओळखत होतो, त्याला अंत्यविधी करणारे गुरुजी प्रेत प्रेत म्हणून पुकारत होते.. त्याचं नाव जणू उरलंच नव्हतं.. धगधगत्या चितेवर तर उरलंसुरलंही संपलंच!
योगेंद्र – मग असा कोणत्याही क्षणी निर्जीव, प्रेतवत होणारा हा देह सचेतन असतो, त्या देहातल्या गूढांकडे आपलं लक्ष का जात नाही? साधी जेवणाची गोष्ट घ्या..
कर्मेद्र – खरंच काहीतरी खाऊ या का?
हृदयेंद्र – थांब रे.. ऐक ना शांतपणे..
योगेंद्र – आपण जेवतो त्यावेळी हाताची कमी-जास्त उंचीची बोटं समरेषा साधून एकत्र येऊन घास पकडतात, तो ज्या तोंडानं खायचा त्याच्या अगदी जवळच अन्नाचा वास घेणारं नाक आणि घासाचं निरीक्षण करणारे डोळे जडवले आहेत, या गोष्टी आपल्या लक्षात येतात? नाक-डोळ्याच्या चाचणीतून तोंडात गेलेल्या घासाचा पुढचा प्रवास, त्याचंच रक्त बनणं, त्याच्याच टाकाऊ भागाची विभागणी मल-मूत्र-घाम यात सुरू असणं.. या सततच्या प्रक्रियेची जाणीव तरी असते का आपल्याला? तेव्हा याच शरीराच्या आत अनंत गूढ गोष्टी भरून आहेत, त्यातलीच एक आहे कुंडलिनी शक्ती!
चैतन्य प्रेम