आता नेमका सगळीकडे बियाणे बाजार तेजीत आहे.  ‘अमुक बियाणं म्हणजे बंदा रुपया खणखणीत नाणं’ इथपासून ते ‘तमुक बियाणं आणा पिशवीभर, कापूस पिकवा गाडीभर’ यांसारख्या जाहिराती सुरूच असतात.  शेतकरी गोंधळून जातो. या दिवसांत शेताची सर्व मशागत करायची आणि वेळेआधी बियाणे घरात आणून ठेवायचे ही धडपड शेतकऱ्याला करावी लागते. हा सारा आटापिटा ‘शुद्ध बीजापोटी’च चाललेला असतो, पण तो प्रत्येक वेळी सार्थकी लागेलच असे नाही..
‘चत्र-वैशाखाचे ऊन खाऊन, नांगरा-कुळवाने मोकळी झालेली जमीन आता पावसाची वाट पाहते आहे. मृगाचे दोन-चार पाऊस झाले म्हणजे खरिपाच्या पेरण्या होतील.. एक मोठा उन्हाळी पाऊस महिन्यापूर्वी झाला. पावसात भयंकर गारा होत्या. जिकडेतिकडे गारांचा खच पडला होता. पुन्हा १५ दिवसांनी गारांचा पाऊस झाला. गुरामागे, शेरडामागे माणसे, मुले रानात फिरत होती. एवढय़ात अचानकपणे एक ढग तयार होऊन एकदम पावसास सुरुवात झाली. सुरुवातीस काही वेळ नुसत्या िलबाएवढय़ा गारा पडत होत्या. वारा जोरात होता. झाडाच्या आसऱ्याला जावे तर वाऱ्याने झाडेच मोडून पडतील अशी भीती वाटत होती. जनावरे सरावैरा पळू लागली.’
हे अवकाळी पावसाचे वर्णन कोणाला आताचे वाटेल. नुकतीच गारपीट झालेली आहे. त्यामुळे याच दिवसांत कुठे तरी लिहिलेले आहे असे वाटेल. प्रत्यक्षात हे चित्र या दिवसांतले असले तरी ते नोंदले गेले ५० वर्षांपूर्वी. ‘गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे’ यांच्यासाठी ग्रामीण जीवनातील आíथक व सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी वि.म. दांडेकर, म.भा. जगताप हे महाराष्ट्रातल्या अनेक खेडय़ापाडय़ांत िहडून माहिती जमा करीत होते. जमा केलेली सगळीच माहिती शास्त्रीय चिकित्सेच्या कसोटीत बसते असे नाही. ही शास्त्रीय अभ्यासाबाहेरची टिपणे त्यांच्याकडे जमा झाली. अशा टिपणांचा उपयोग करीत ‘गावरहाटी’ हे पुस्तक १९६० साली प्रसिद्ध झाले. तब्बल ५० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकातले हे वर्णन आजच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतरच्या पाश्र्वभूमीला तंतोतंत अधोरेखित करते. या पुस्तकातल्या वरील अवतरणात नोंदविलेली ही लगबग मृगाच्या आधीची. पेरणीआधी नांगरा-कुळवाने मोकळी झालेली जमीन आणि या मातीला असलेली पावसाची प्रतीक्षा. ही गोष्ट मात्र सनातन आहे. वर्षांनुवष्रे ती कायम राहिली आणि काळ कितीही बदलला तरीही पुढेसुद्धा ती तशीच कायम राहणार आहे. काळाचे संदर्भ आणि तपशील बदलत जातील. ऋतुचक्राचे राहटगाडगे असेच चालत राहणार आहे.
पेरणीआधीचे हे चित्र असले तरी आता ५० वर्षांनंतर परिस्थिती कमालीची बदललेली आहे. पूर्वीचे पारंपरिक वाण आता राहिले नाहीत. नव्या जाती आल्या. संकरित, संशोधित बियाणे आली. पूर्वी वर्षभरात काही ठिकाणी एकच तर काही ठिकाणी दोन पिके घेतली जात. आता जिथे पाण्याची सोय आहे, तिथे वर्षभरात चार पिकेही घेतली जाऊ लागली. पेरणीआधीच्या या दिवसांत बियाण्यांची तजवीज केली जाते. काय पेरायचे, काय नाही याचा निर्णय घेतला जातो. पूर्वी घरचीच बियाणी असत. जो चांगला वाण आहे, ज्याची उगवणशक्ती चांगली आहे, ज्याचा उतार चांगला येतो त्यातलाच काही हिस्सा बियाणे म्हणून सांभाळला जात असे. कडुिनबाचा पाला, माती या मिश्रणाचा लेप लावून हे बियाणे पुढील हंगामात पेरण्यासाठी जपून ठेवले जात असे. त्याला कीड लागू नये म्हणून खबरदारी घेतली जात असे. आधी हे जवळचे बियाणे वापरले जायचे. आता थेट बाजारातून बियाणे आणले जाते. नेमक्या याच दिवसांत वृत्तपत्रांच्या पानावर रंगीत जाहिराती झळकतात. वेगवेगळ्या वाहिन्यांवरही बियाण्यांच्या जाहिराती चालूच असतात. आता नेमका सगळीकडे बियाणे बाजार तेजीत आहे. सर्वत्र मोठा गलबला सुरू आहे. ‘अमुक बियाणं म्हणजे बंदा रुपया खणखणीत नाणं’ इथपासून ते ‘तमुक बियाणं आणा पिशवीभर, कापूस पिकवा गाडीभर’ यांसारख्या जाहिराती सुरूच असतात. काही ग्रॅम बियाण्यांची किंमत काही हजारात असते. या दिवसांत खेडय़ापाडय़ात बियाण्यांचे रंगीबेरंगी पोस्टर्स आणि बॅनर्स झळकलेले असतात. बसस्थानक, प्रवासी निवाऱ्यांच्या िभती अशा जाहिरातींनी रंगतात. शेतकरी अक्षरश: बावरतो, गोंधळून जातो. यातले काय घ्यावे याचा निर्णय त्यालाही करता येत नाही. पण वेगवेगळ्या जाहिरातींतली चित्रे त्याच्या मनाला भुरळ घालतात. एखादे विशिष्ट बियाणे पेरल्यानंतर कापसाच्या पिकाच्या बाजूलाच नोटांची चळत मोजणाऱ्या नवरा-बायकोचे जाहिरातीतले चित्र त्याला आकर्षति करते. बऱ्याचदा महागामोलाचे बियाणे खरेदी केले जाते आणि कालांतराने ते उगवलेच नाही अशा तक्रारी येतात. हे फक्त खासगी कंपन्यांच्या बाबतीतच होते असे नाही. गेल्या काही वर्षांत शासनाच्या ‘महाबीज’ या बियाण्यानेही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. ‘पेरलं महा, उगवलं महा’ अशी त्याची जाहिरातबाजी केली जाते. प्रत्यक्षात ‘पेरलं महा पण उगवलं नाही पाहा’ असाच अनुभव शेतकऱ्यांना आला. अशा वेळी शेतकऱ्यांचे जे नुकसान होते ते फार मोठे असते. बियाण्यात खोट निघाल्यानंतर पसे तर वाया जातातच, पण हंगामही वाया जातो. दुबार पेरणी साधतेच असे  नाही. अनेकदा ज्या बियाण्यांचा तुटवडा आहे, तेच बियाणे अनधिकृतरीत्या विकणारी मनुष्यसाखळी कार्यरत असते. या बियाण्यात खोट निघाली तर कुठे दाद मागता येत नाही. अनेकदा बियाणे बोगस निघाले तर तालुकास्तरावरील अधिकाऱ्यापासून ते ग्राहक मंचापर्यंत शेतकऱ्याला सर्वत्र टाचा घासाव्या लागतात. या कागदी लढाईत एक एक कागद गोळा करावा लागतो, प्रत्येकच कागद शेतकऱ्याकडे असतो असे नाही.
एखाद्या विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याची साठेबाजी केली जाते आणि अशा बियाण्याचा काळाबाजारही मोठय़ा प्रमाणावर होतो. सर्वत्र एखाद्याच बियाण्याची कृत्रिम टंचाई असते असे नाही. एखाद्या जिल्ह्य़ात जे बियाणे सहज उपलब्ध आहे, त्याच बियाण्याचा अन्य कुठल्या तरी जिल्ह्य़ात काळाबाजार चाललेला असतो. या दिवसांत शेताची सर्व मशागत करायची आणि वेळेआधी बियाणे घरात आणून ठेवायचे ही धडपड शेतकऱ्याला करावी लागते. हा सारा आटापिटा ‘शुद्ध बीजापोटी’च चाललेला असतो, पण तो प्रत्येक वेळी सार्थकी लागेलच असे नाही. मात्र ही घडी चुकवायची नाही याचे प्रयत्न शेतकरी पूर्वापार करत आला आहे. अनेकदा मशागत सगळी झाली आहे, जमीन लोण्यासारखी मऊसूत करून ठेवलेली आहे, पण बियाण्याचीच सोय लागत नाही. अशा वेळी कोणाकडे हात पसरायचा? खेडय़ापाडय़ांत सर्वाचीच गत या दिवसांत सारखी असते. असा बाका प्रसंग जेव्हा निर्माण होतो तेव्हा घरातलाच एखादा दागिना मोडला जातो. आता पेरणीची सगळी अवजारे बाजारात मिळतात, पण जेव्हा ती गावातच सुताराकडे तयार केली जायची तेव्हाही असे होतेच.
सुताराच्या निह्य़ावर, एक नवल घडलं
समस्त सोयऱ्यानं, सोनं मोडून चाडं केलं
यांसारख्या जुन्या लोकगीतातही असा पेरणीआधीच्या धडपडीचा संदर्भ सापडतो. सोनं मोडून चाडं करणे म्हणजे तिफणीचा बंदोबस्त करणे. पेरणीच्या आधीची शेतकऱ्याची बियाण्यासाठीची धडपड आजही तीच आहे. सध्या बियाणे बाजारात प्रचंड चकचकीत, आकर्षक अशा पाकिटात वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे विक्रीसाठी
आलेले आहे. यात बऱ्याचदा ज्या कंपन्या या वर्षी दिसतात, त्या पुढच्या वर्षी दिसतही नाहीत. बियाण्यांची खरेदी करताना शेतकरी धास्तावलेलाच असतो, कारण विकत घेतलेले प्रत्येक बियाणे अंकुरतेच असे नाही.