वाद्य आणि वादक यांचा स्वभाव जेव्हा मिळतो तेव्हा रविशंकर यांच्यासारखा कलाकार तयार होतो. मुळात सतार हे वाद्यच मोकळे आणि प्रसन्न. सरोद हेदेखील तंतुवाद्यच. सतारीची बहीण म्हणावे असे. पण सरोदच्या स्वराला एक प्रौढतेची किनार असते. व्याकूळ करणारी. सतारीचे तसे नाही.  ती आजन्म नवतरुणीच. जगात सर्वत्र फक्त आनंदच भरून राहिलेला आहे आणि त्या आनंदाचे तरंग आपणही अनुभवूया असेच जणू सतार सांगत असते. रविशंकर यांची सतार हे भरभरून सांगायची. याचे कारण रविशंकर आणि सतार हे समानधर्मी होते आणि दोघांत एक प्रकारचे अद्वैतच तयार झालेले होते. अल्लडपणाच्या सीमा ओलांडण्याच्या टप्प्यावर असलेली घरातली एखादी मुलगी उत्फुल्ल उत्साहात जिन्यावरून धावत उतरताना पैंजणांच्या मंजूळ नादाने घरास जशी भारून ठेवते तशी रविशंकर यांची सतार ऐकणाऱ्यास भारून टाकायची. ही नृत्यमयता रविशंकर यांच्या सतारीत होती याचे कारणच हे की रविशंकर हे मुळात नर्तक होते. आपले बंधू ख्यातनाम नर्तक उदयशंकर यांच्या नृत्यमेळ्यांत रविशंकर यांची पावले सुरुवातीस बराच काळ थिरकली होती. त्याचाही परिणाम रविशंकर यांच्या कलाविष्कारात सहज जाणवत असे. आनंदी माणसे मोकळी असतात. रविशंकर तसे होते. ज्या काळात फ्युजन वगैरे कल्पना जन्मालाही आलेल्या नव्हत्या, त्या काळात रविशंकर यांनी परदेशी वाद्य आणि संगीताशी हातमिळवणी करण्यात जराही मागेपुढे पाहिले नाही. रविशंकर यांच्या मोठेपणाची ही बाजू महत्त्वाची. याचे कारण असे की आपलेच संगीत थोर असे मानत हिंदुस्थानी संगीतातील दुढ्ढाचार्य आपापल्या मठीत आत्ममग्न होऊन राहिले होते त्या काळी कसलाही आगापिछा नसलेला रविशंकर हा तरुण जगाच्या सांगीतिक मुशाफिरीवर निघाला होता. रविशंकर यांनी कधीही प्रयोगात कमीपणा मानला नाही आणि संगीत हे पोथीनिष्ठच असायला हवे असेही त्यांना कधी वाटले नाही. पण ही नवी परंपरा जन्माला घालताना त्यांनी कधी बंडाचे निशाण फडकावले असेही झाले नाही. तो त्यांचा स्वभावही नव्हतो. शड्डू ठोकून नवीन काही करून दाखवतोच.. असा त्यांचा कधी आवही नसायचा. जे आवडले ते त्यांनी मुक्तपणे केले. त्यांच्या संपूर्ण सांगीतिक कारकिर्दीवर ही मुक्तानंदी छाया कायमच राहिलेली आहे.
रविशंकर हे खरे तर रोबींद्र शंकर चौधरी. बंगाली. जन्म गंगाकिनारी वाराणसी येथील. वडील भद्रलोकीय मान्यवर. वकील आणि त्याच वेळी संस्कृतप्रेमीही. त्या काळात इंग्लंडात कारकिर्दीसाठी गेले आणि तिकडेच राहिले. त्यामुळे रोबींद्राच्या पालनपोषणाची जबाबदारी भारतात मागे राहिलेल्या त्यांच्या पत्नीवर येऊन पडली. बालपण वाराणसीत गेल्यावर दहाव्या वर्षीच रविशंकर यांना बंधू उदयशंकर यांच्यासमवेत पॅरिसला जाण्याची संधी मिळाली. अवघ्या तेराव्या वर्षी रविशंकर हे उदयशंकर यांच्या मेळ्यातील उत्तम नर्तक म्हणून ओळखले जाऊ लागले होते आणि अर्धाअधिक युरोप त्यांचा त्या वर्षी हिंडून झाला होता. जाझ आदी पाश्चात्त्य संगीत आणि सिनेमाशी त्यांचा याच काळात परिचय झाला आणि फ्रेंच भाषेसह पाश्चात्त्य संस्कारही त्यांनी आत्मसात केले. लहान वयातच जग पाहायला मिळाले की एक प्रकारचा मोकळेपणा स्वभावात येतो. रविशंकर हे त्यामुळे मोकळे होते. युरोप दौऱ्याहून परतल्यावर कलकत्यात त्या वेळचे मेहेर दरबारचे कलाकार अल्लाउद्दिन खान यांचे सतारवादन दोघा शंकर बंधूंनी ऐकले आणि ते भारावूनच गेले. आपल्या पुढच्या दौऱ्यात अल्लाउद्दिन खान यांनी सतारीये म्हणूनच यावे अशी गळ उदयशंकर यांनी मेहेर संस्थानच्या महाराजांना घातली आणि त्यांच्याकडून होकार मिळवला. रविशंकर यांचा सतारीशी परिचय झाला तो याच काळात. पुढे या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर मीलनात. या वेळी एखाद्या शिस्तप्रिय वधुपित्यासारखे अल्लाउद्दिन खान वागले आणि सतारीचा हात मागणाऱ्या रविशंकर यांना म्हणाले- सतार शिकायची तर नृत्य सोड. एव्हाना सतारीच्या प्रेमात पडलेल्या रवीने नृत्यत्याग केला आणि सतारीसाठी पहिले प्रेम- नृत्य सोडले. पुढे प्रेमात वाहून जायचा हा त्यांचा स्वभाव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेकदा दिसून आला. त्या वेळी त्यांनी सतार हाती घेतली ती घेतलीच. तरुण रवी हे अल्लाउद्दिन खान यांच्या मुलामुलींसह गुरुकुल पद्धतीने सतार शिकू लागले. अल्लाउद्दिन यांचे चिरंजीव म्हणजे सरोदवादक म्हणून विख्यात झालेले अली अकबर खान. यांच्याचसमवेत रविशंकर यांनी जुगलबंदी वादन करून शास्त्रीय संगीतात एक नवा पायंडा पाडला आणि अली अकबर यांची बहीण अन्नपूर्णा देवी हिच्याशी काही काळ संसारही केला. ‘सारे जहाँसे अच्छा.’ हे नव्याने संगीतबद्ध करणे असो वा आकाशवाणीचा वाद्यवृंद. वेगवेगळे प्रयोग हेच त्यांचे वैशिष्टय़ बनले. दरम्यानच्या काळात न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात पाश्चात्त्य कलाकारांसह सतारवादनाचे निमंत्रण त्यांना आले. परंतु तोपर्यंत त्यांचा पहिला विवाह विभक्तिप्रत्ययाच्या फेऱ्यात सापडलेला असल्याने त्यांची ही संधी हुकली. रविशंकर यांनी अली अकबर खान यांना न्यूयॉर्कला पाठवले आणि त्यांच्या वादनास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून आकाशवाणीतील चाकरी सोडून परदेशात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यहुदी मेन्युहिनसारखा दंतकथा बनून गेलेला व्हायोलिनकार ते बीटल्सचा जॉर्ज हॅरिसन अशा अनेकांबरोबर रविशंकर यांनी पुढच्या आयुष्यात सतारवादनाचे प्रयोग केले. बीटल्सचा चमू तर त्यांच्या इतक्या प्रेमात होता की हॅरिसनदेखील सतार शिकला आणि हिंदुस्थानी रागदर्शनावर त्याने अनेक कार्यक्रम केले आणि ध्वनिमुद्रिका काढल्या.    भारतातही रविशंकर यांनी अनेक प्रयोग केले.  सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’चे संगीत हा त्यातील एक लक्षणीय म्हणावा असा प्रयोग. यातून ज्या प्रमाणे सत्यजित रे यांचे संगीतप्रेम दिसून येते तशीच दिसून येते प. रविशंकर यांची साहित्य जाण. काबुलीवाला (बंगाली), मीरा, अनुराधा, गांधी आदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. शास्त्रीय संगीतातील बुजुर्गाना चित्रपट संगीत कमअस्सल वाटते. रवीशंकर यांनी असला शिष्टपणा कधीही केला नाही. संगीताच्या क्षेत्रात  ते विचाराने इतके मुक्त होते की राजीव गांधी यांच्या काळात भरलेल्या एशियाडच्या स्वागतम शुभस्वागतम या गीताचे संगीत देखील त्यांनी तितक्याच उत्साहाने बांधले.  पाश्चात्त्य देशात हिंदुस्थानी संगीताची ध्वजा उंच फडकवण्यात ज्यांना यश आले त्यात रविशंकर यांचे नाव अग्रक्रमाने येते ते याच गुणामुळे.
ते हे करू शकले याचे कारण त्यांची हिंदुस्थानी संगीतावरची पकड मजबूत होती आणि ते त्यांनी पूर्णपणे अंगी भिनवलेले होते.  घरचा श्रीमंती ऐवज लुटूनच ते विश्वसंगीताच्या मुशाफिरीस निघाले होते आणि त्यामुळे  या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच त्यांची संगीतशिदोरी मुबलक होती. अलीकडच्या काळात ‘इंटरनॅशनल म्युझिक’ करण्याच्या नशेत अनेक थिल्लर प्रयोग केले जातात. ना ते ‘इंटरनॅशनल’ होतात आणि ना ‘नॅशनल’. हे प्रयोग वरवरचे राहतात याचे कारण देशी जे काही आहे ते अंगी न बाणवता, त्याचे मोठेपण न समजून घेता परदेशाचे अनुकरण केले जाते. रविशंकर यांचे मोठेपण हे की त्यांनी भारतीय संगीताची उंची जाणून, ती अबाधित ठेवून पाश्चात्त्य संगीताच्या अंगणात मुशाफिरी केली. रविशंकर यांच्यामुळे पाश्चात्त्यांना आपल्या संगीताची खोली कळून आली. हे सगळे करीत असताना कलेच्या क्षेत्रात पहिलेपणाचा एक विशेष मान असतो. तो नि:संशयपणे रविशंकर यांच्याकडे जातो. त्यांनी धाडसाने हे नवीन विश्व भारतीय संगीतास खुले करून दिले. विश्वमोहन भटसारखा गिटार या पूर्णपणे पाश्चात्त्य वाद्याचे हिंदुस्थानी सादरीकरण करणारा कलाकार असो वा झाकीर हुसेन यांच्यासारखा तबलिया. विश्वसंगीताच्या क्षेत्रात हे सर्व मुक्त मुशाफिरी करू शकले याचे कारण या हमरस्त्याच्या मुळाशी रविशंकर यांची पायवाट आहे.
एकाच कुटुंबातील अनेकजण ग्रॅमी पुरस्काराच्या शर्यतीत आहेत असे फार कधी झाले नसेल. ते रविशंकर यांच्या बाबत घडले. रविशंकर यांच्याच दोन कन्या अनुष्का आणि नोरा जोन्स या दोघींना एकाच वेळी याच पुरस्कारासाठी नामांकने होती. यंदा वडील आणि कन्या अनुष्का यांना आहेत. त्याचा निकाल जाहीर व्हायच्या आतच रविशंकर गेले. त्यांचे जगणे स्वानंदी होते. हा आतूनच भरून राहिलेला आनंद ते सतारीच्या तारांतून पेरत गेले. या स्वानंदमग्न सतारीयास दै. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे श्रद्धांजली.