‘योगा’च्या नावाखाली परक्या देशांमध्ये ‘आपल्या संस्कृती’चा ‘बाजार’ मांडला जातोय असं वाटतं का तुम्हाला? थांबा- यापेक्षा निराळी भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवणारं एक अभ्यासू पुस्तक आलंय..

प्रतिसंस्कृती म्हणजे काउंटरकल्चर आणि जनसंस्कृती म्हणजे पॉप कल्चर, वगैरे प्रतिशब्द माहीत नसले, तरीही आपण या सांस्कृतिक व्यूहात जगत असतो. उदाहरणार्थ ‘रामदेवबाबाची ऑरेंज क्रीम बिस्किटं’ विकत घेतल्याचं आपल्याला कुणीतरी सांगत असतं, तेव्हा योगगुरूंच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली कोणत्या कृती व्हाव्यात, याबद्दलच्या रूढ (सांस्कृतिक!) कल्पनांना धक्का कधीतरी बसलेलाच असतो; पण आता तो सांस्कृतिक धक्का पचवला गेला असल्यामुळे ही ‘पातंजली’ अशी पाटी असणाऱ्या दुकानांत सर्रास मिळणारी बिस्किटं विकत घेतली जातात, खाल्ली जातात आणि विकणाऱ्यांनी केलेले काही दावे किंवा दावे न करताही त्या उत्पादनाबद्दल प्रचलित असलेले समज (उदाहरणार्थ : ही बिस्किट अधिक शुद्धपणे बनवली जातात, ती अधिक आरोग्यदायी पदार्थानी युक्त आहेत, म्हणून त्यांचा अपाय नाही, इ.) या विक्री-व-उपभोगाच्या प्रक्रियेतून अधिकाधिक घट्ट होत जाऊन, आपल्या ‘जनसंस्कृती’चा भाग बनतात. आसारामबापूंच्या प्रेरणेतूनही तेलं, साबण वगैरे उपभोगवस्तू (ज्याला इंग्रजीत फास्ट मूव्हिंग कन्झ्यूमर गुड्स- एफएमसीजी- म्हणतात,) उत्पादित झाल्या होत्याच.. पण बिस्किटं? तीही ऑरेंज क्रीम? हा प्रश्न रामदेवबाबांच्या प्रेरणेतून उत्पादित झालेल्या वस्तूंबाबत मागे पडलेला आहे. गेल्या दशकभरात जोवर अशी प्रश्नचिन्हं होती, तोवर एका योगगुरूच्या प्रेरणेतून क्रीम बिस्किटांचं उत्पादन होणं हे ‘प्रतिसंस्कृती’ मानलं जात होतं.
थोडक्यात, ‘प्रतिसंस्कृती’ आणि ‘जनसंस्कृती’ हे शब्द कठीण, कंटाळवाणे वगैरे वाटत असले, तरी आपण- म्हणजे विचार करणारे आणि क्रयशक्तीही असणारे सर्व लोक- आपापल्या परीनं त्यात भर घालत असतो.. ‘प्रतिसंस्कृतीचं जनसंस्कृतीत रूपांतर’ ही निव्वळ शब्द पाहिल्यास किचकट वगैरे भासणारी प्रक्रिया आपणच तर करत असतो.. तीही अगदी सहजपणे!
हे सारं स्वतबद्दल आणि स्वतसारख्याच इतरांबद्दल आपल्या लक्षात आणून देण्याचं सामथ्र्य आंद्रिया जैन यांच्या ‘सेलिंग योगा’ या पुस्तकामध्ये आहे.  अमेरिकेत ‘योगा’ – भारतीय ‘योग’ नव्हे, ‘योगा’च- कसा उपभोग्य वस्तूसारखा फोफावला, किंबहुना सर्वदूर पसरण्यासाठी आणि जागतिक रूढ सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाण्यासाठी ‘योगा’चं वस्तुकरण हे प्राप्त परिस्थितीत आवश्यकच कसं ठरलं आणि त्यातून जगाला ‘योगा’ ही नवी- आजच्या आधुनिक किंवा समकालीन जीवनपद्धतीला मदत करणारी- वस्तू कशी मिळाली, ‘योगा’च्या या नव-रूपाचा ‘वस्तूपणा’ कोणीही समजूनच घेत नसल्यामुळे काय काय गोंधळ झाले, अमेरिकी ख्रिस्त्यांमध्ये ‘योगाफोबिया’ (हा शब्दसुद्धा लेखिकेचाच!) कसा पसरला आणि आत्ता देशोदेशी वस्तुरूप होऊन उपयुक्तही ठरलेल्या योगाला- किंवा ‘योगा ब्रँड्स’ना- ‘धार्मिक’ म्हणून धोपण्यात कसा काहीही अर्थ नाही, हे सारं अमेरिकेच्या संदर्भात अभ्यासू पाहणाऱ्या या पुस्तकात आपले योगगुरू रामदेव बाबा किंवा आसाराम अशा थोरथोर लोकांची नावंसुद्धा नाहीत. तरीही, पुस्तकाच्या उपशीर्षकातून (फ्रॉम काउंटरकल्चर टु पॉप कल्चर) अभ्यासविषयाची जी दिशा अभिप्रेत आहे, त्या दिशेनं वाचकालाही  विचारप्रवृत्त करण्यास हे पुस्तक यशस्वी ठरतं.
असं का होतं?
याची तीन प्रमुख कारणं याच मजकुराच्या अगदी शेवटच्या परिच्छेदात वाचायला मिळतील. तोवर पुस्तकाबद्दल अधिक माहिती देणं क्रमसुसंगत ठरेल.
योगामधला ‘पोस्चरल’ आणि ‘प्रीमॉडर्न’ असा भेद ओळखून, त्यावर हे पुस्तक आधारलेलं आहे. यापैकी ‘प्रीमॉडर्न’ योगाच्या साधनामार्गाला आपण आपापल्या भारतीय भाषांमध्ये ‘योग’ असं (‘ग’ला काना न देता) आग्रहानं म्हणू शकतो. ‘पोस्चरल’ किंवा योगासनं आणि योगक्रियांवर आधारलेला योगा मात्र ‘योगा’ म्हणूनच भारतीय उपखंडाबाहेर गेला, ‘योगा’ म्हणूनच त्याचा प्रसार झाला, याचा अभ्यास लेखिकेनं तीन उदाहरणांनिशी मांडला आहे : (१) योगाचार्य बी. के. अय्यंगार यांचा ‘अय्यंगारयोगा’ (२) योगी मुक्तानंद यांचा ‘सिद्धयोगा’ आणि ‘ट्रान्सेंडेन्टल मेडिटेशन’ (३) जॉन फ्रेंड यांनी आरंभलेला ‘अनुसार योगा’. यापैकी पहिली दोन उदाहरणं १९६० च्या दशकातली आहेत, तर जॉन फ्रेंड हे आधी अय्यंगारयोगा, मग सिद्धयोगा शिकून, सिद्धयोगाच्या सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर १९९० च्या दशकात स्वत:ची वाट चोखाळू पाहणारे आहेत. या तिन्ही ‘योगां’नी आपापली लोकप्रियता- किंवा लोकोपयोगिता म्हणू- वाढवताना, स्वत:च्या तत्त्वांचा प्रसार करताना एक प्रकारे ‘ब्रँडिंग’ आणि ‘मार्केटिंग’ची तंत्रं वापरल्याचं लेखिका सांगते. यासाठी लेखिकेनं अय्यंगार यांच्या जुन्या पुस्तकाकडे नव्या दृष्टीनं पाहिलं आहेच, पण इतक्यावरून लेखिकेवर ‘कलुषित दृष्टिकोना’चा आरोप सिद्ध करणं अशक्य व्हावं, एवढा अभ्यास पुढे आहे.. अय्यंगार किंवा मुक्तानंद यांचे ‘ब्रँड’ हे ‘त्यांचेच’ कसे- हे सांगण्यासाठी या दोघांनी प्राचीन योग-तंत्रं आणि योग-विचार यांतून आधुनिक जगासाठी काय काय निवडलं, याचाही यथायोग्य आढावा लेखिका घेते. त्यायोगे, त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेले योगा हे त्यांची ‘बौद्धिक संपदा’ कसे ठरतात- आणि त्या अर्थानेही ‘ब्रँड’ हा शब्द उचितच कसा ठरतो, हे वाचकाला समजू शकेल. याखेरीज या तिन्ही योगांच्या संस्थात्मीकरणाचा मागोवा, या संस्थांची स्वत:बाबतची जाहीर विधानं आणि या संस्थांशी निगडित असलेल्या नियतकालिकांतून प्रकाशित झालेली अनुभवकथनं, याचा आधार या (‘ब्रँडिंग’ असं का म्हणता येईल, याविषयीच्या) अभ्यासाला आहे. फ्रेंड यांच्या अनुसार योगाप्रमाणेच पुस्तकात ‘बिक्रम योगा’चाही उल्लेख येतो, पण या उपशाखेचा आढावा लेखिकेने घेतलेला नाही. ‘बिक्रम योगा’ने कॉपीराइटसाठी अर्ज केला होता, तेव्हा गहजब झाला. त्या गहजबाला कारणीभूत ठरलेल्या समजुतींच्या गफलती लेखिकेनं आधी मांडून मग खोडलेल्या आहेत.
‘ब्रँड’ किंवा ‘सेलिंग’ अशी ग्राहकवादी- उपभोक्तावादी- म्हणजे एक प्रकारे चंगळवादीच- शब्दकळा वापरणारी ही लेखिका योगाच्या ‘प्रॉडक्ट्स’चा (हाही लेखिकेचाच शब्द) अपमान किंवा अवमानसुद्धा कुठेही करीत नाही. याचं कारण म्हणजे भारताबाहेर, सुदूर परदेशांमध्ये भारतीय वंशाचेही नसलेले लोक योगा अंगीकारतात ते कशासाठी, याचा अभ्यास लेखिका स्वत: करते आणि आजवर ग्रंथरूपात वा शोधलेख स्वरूपात जे अभ्यास उपलब्ध आहेत, त्यांचाही सज्जड आधार घेते. ‘मन:शांती’ या गरजेचं आजचं जे स्वरूप आहे ते ‘हे भोवतालचं चंगळवादी/ उपभोक्तावादी जग आपल्याला बदलता येणार नाही’ ही खूणगाठ बांधलेल्या माणसांमुळे झालेलं आहे, अशा अर्थाचा निष्कर्ष अभ्यासाच्या या उपभागातून निघतो. योगा मन:शांतीची जी आशा दाखवतो, ती शरीर-मनाच्या स्वास्थ्यातून आलेली आध्यात्मिक शांती आहे आणि अशाच कुठल्या तरी आध्यात्मिकतेचा शोध आजच्या माणसांना आहे, असंदेखील उपलब्ध ग्रथित अभ्यास सांगताहेत, हे लेखिका नमूद करते. याखेरीज, अशा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उचित तंत्र वापरणं (म्हणजे ब्रँडिंग / मार्केटिंगची तंत्रं) हे आवश्यकच ठरल्याचं आता दिसतं, असा पूर्वलक्ष्यी निष्कर्षांचा सूर लावण्यासाठी लेखिकेला अनुभवकथनांचा आधार उपलब्ध आहेच. योगाभ्यास करणाऱ्यांचा संवाद हा समसंवाद असेल, पण जे ‘योगा करीत नाहीत’ त्यांना ‘योगाचं महत्त्व पटवून देण्या’च्या विषमसंवादासाठी, वरच्याला खालच्या पातळीवर उतरावं लागणार, हे उघडच आहे. मात्र इतक्या स्पष्ट शब्दांत हा निष्कर्ष न नोंदवता हे पुस्तक पुढे जातं.. योगाच्या टीकाकारांचा- नव्हे विरोधकांचा आणि निषेधकांचा- आढावा किंवा समाचारच घेतं.
अमेरिकी ख्रिस्ती म्हणतात की, योगा हा हिंदू धर्माचा प्रचार आहे(!).. तर भारतातले आणि भारताबाहेरचे काही हिंदू ठामपणे म्हणतात की, योग हा आमच्याच (हिंदू) धर्माचा भाग आहे. ही दोन वाक्यं सांगण्यासाठी लेखिका अनेक पुरावे देते. कॅथलिक आणि इव्हान्जेलिस्ट या दोन्ही पंथांतील काही ख्रिस्ती दुराभिमानी हे अन्य कोणत्याही धर्माच्या प्रसाराचा दुस्वासच कसा करीत होते, याचा इतिहास लेखिकेने १९०२ सालच्या एका अमेरिकी टपाल अधिकाऱ्यापर्यंत नेऊन भिडवला आहे. याच प्रकारे, स्वामी विवेकानंदांनी अद्वैतवेदान्त आणि योग यांचा संबंध स्पष्ट करणारी भूमिका घेतली होती आणि बायबलसारख्या ग्रंथांतून निवडक उदाहरणं काढून त्यांचा योगसाधनेशी संबंध लावणं चूक असून भारतीय परिप्रेक्ष्यातच हा विषय पाहिला पाहिजे, असं प्रतिपादन केलं आणि हे १९५० च्या दशकापर्यंत सर्वानाच पटतही होतं, हे लेखिकेला माहीत आहे. थेट विवेकानंदांच्या भूमिकेचा आधार ‘बिक्रम योगा’च्या कॉपीराइट खटल्यात नसला, तरी भारत सरकारने ज्यांच्यामार्फत विरोध केला, त्या संस्थेचंही म्हणणं ‘योग भारतीय, त्याचा परक्या देशांत योगा होऊ नये’ अशा अर्थाचंच असल्याचं लेखिका नमूद करते. इथे कुठेही, ही भूमिका चूक आणि ती बरोबर, किंवा दोन्ही चूक वगैरे लेखिका म्हणत नाही. योगाला धर्माशी जोडणाऱ्या भूमिकांच्या प्रतिवादाची गरजच या सहाव्या प्रकरणात उरू नये, अशी तजवीज आधीच्या पाच प्रकरणांत लेखिकेनं करून ठेवलेली आहे.
पहिली पाच प्रकरणं मोकळ्या मनानं वाचली नाहीत, तर सहाव्या प्रकरणापर्यंत पोहोचण्याआधीच ‘लेखिकेला अक्कल नाही’, ‘तारतम्य, विवेक वगैरे कशाशी खातात तिला माहीत नाही’, ‘आमच्या योगाभ्यास, योगसाधनेची विकृत रूपंच लेखिका मान्य करीत असेल, तर तिचा राग न येता कीवच करावी’ आदी जाज्वल्य सुविचार काही वाचकांना सुचू शकतात. टेक्सास या राज्यात योगा शिकवणाऱ्या संस्थांना ‘धार्मिक संस्था’ न मानता ‘निरंतर शिक्षण संस्था’ मानलं, त्यामुळे योगा स्टुडिओ, योगा सेंटर वगैरे नावांनी चालणाऱ्या संस्थांमधल्या प्रशिक्षकांचे पगार, प्रशिक्षक-नेमणुकीच्या अटी, करआकारणी यांबद्दल वेगळे नियम लागू झाले. तेव्हा ‘टेक्सास योगा असोसिएशन’नं विरोध केला. मात्र म्हणून, ‘आम्हाला धार्मिक संस्था म्हणून राहू द्या’ असं तेव्हाही म्हटलं गेलं नाही. योगा अनुसरणाऱ्यांना कोणताही एखादा धर्म मान्य असेलच असं नाही, उलट ज्या आध्यात्मिकतेची गरज त्यांना आहे ती कोणत्याही एका धर्माच्या दावणीला न बांधणारा मन:शांतीदायक मार्ग म्हणूनच हे लोक योगा अनुसरताहेत, असं लेखिका वारंवार सांगते. जैन धर्मात (ज्या धर्माला भारतात रीतसर ‘अल्पसंख्याक’ दर्जा आहे,) तेरा पंथ आणि अन्य शाखांचा योगप्रसार हा हिंदू धर्मावर आधारित कसा नाही, हे संबंधित जैन योग-प्रसारक ठामपणेच सांगतात, हेही लेखिका दाखवून देते.
योगा आणि योग यांच्याविषयीचे भरपूर संदर्भ असलेलं हे पुस्तक योगाभ्यासात रस नसलेल्याही विचारी वाचकांना ‘काउंटरकल्चर’ आणि ‘पॉप कल्चर’कडे पाहण्याची दिशा देईल, याची प्रमुख कारणं तीन : पुस्तक कोणाचीही बाजू कधीही घेत नसून सद्य:स्थिती, वस्तुस्थिती यांतून जे निष्कर्ष निघणारच आहेत ते या पुस्तकानं मांडलेले आहेत, हे पहिलं कारण. संस्कृतिसंगम होतच राहणार आणि एकदा तो झाल्यावर नवी बेटंही वसणार, तेव्हा हे आमचंच असं म्हणण्यात काही हशील नसून ‘हे नवंच’ असं कबूल करणं बरं, अशी लेखिकेची भूमिका पुस्तकभर जाणवत राहते, हे दुसरं कारण. तिसरं, त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे, सांस्कृतिक बदलांकडे पाहताना केवळ एका ज्ञानशाखेचा आधार पुरेसा नसतो, या गृहीतकाआधारे कधी तत्त्वचर्चा, कधी ‘केस स्टडी’, कधी अनुभवकथनांची मांडणी, तर कधी मार्केटिंगची परिभाषा यांचा आधार घेत हे पुस्तक पुढे जातं.
ते योगा किंवा योग यांबद्दलचं न राहता, योगाचा प्रसार ज्या जगात झाला, त्या जगाबद्दलचंही पुस्तक ठरतं! योगाभ्यासाबद्दल जिज्ञासू असणाऱ्यांनाही हे पुस्तक जगाकडे पाहायला लावेल.. कारण लेखिका दक्षिण आशियाई धर्माच्या विशेष अभ्यासक आहेत, योगाला होणाऱ्या विरोधामधली हवाच काढून घेणारे अनेक लेख त्यांनी लिहिले आहेत आणि योगा हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे.
* ‘‘सेलिंग योगा- फ्रॉम काउंटरकल्चर टु पॉप कल्चर’
लेखिका- आंद्रिया जैन
प्रकाशक – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पृष्ठे- २४० किंमत – ९९५ रु.