भक्तीचा खरा अर्थ जनमानसावर आपल्या आचरणातून बिंबविण्यासाठीच जे जगले, अशा संतांना त्यांच्या आयुष्यात निंदा, अवमान, मानहानीला तोंड द्यावं लागलं, असं हृदयेंद्र म्हणाला तेव्हा ज्ञानेंद्र उत्स्फूर्तपणे म्हणाला..
ज्ञानेंद्र – भक्तीचं मला माहीत नाही, पण समाजाला वास्तवाचं भान आणण्याचा प्रयत्न ज्यानं ज्यानं केला, मग तो विचारवंत असेल, शास्त्रज्ञ असेल, सुधारक असेल.. त्या प्रत्येकाला अशा विरोधाला तोंड द्यावं लागलंच आहे.. समाजाच्या विचाराची पठडी ही परंपरेनुसार असते. परंपरेला वास्तवाचा आधार असतोच, असंही नाही. तो आधार तपासायलाही समाज तयार नसतो. असं का करायचं? तर शास्त्रात म्हंटलंय.. तेव्हा सामाजिक रुढी किंवा धारणेच्या आधारावर वास्तवाचा विचार किंवा वास्तवाचं आकलन तर्कशुद्धपणे होऊ शकत नाही. त्यासाठी विचारशुद्धीच आवश्यक असते.. मानवेंद्रनाथ रॉय यांचं एक मार्मिक वाक्य आहे.. ‘कोणतीही सामाजिक क्रांती ही विचारक्रांतीशिवाय शक्य नाही!’ विचार बदलल्याशिवाय समाजाची धारणा बदलू शकत नाही.. आणि ज्यांनी ज्यांनी समाजाला वैचारिक वळण लावण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाच्या वाटय़ाला असाच त्रास आला, अवमान आला, मानहानी आली. ज्यांना आपल्या वैचारिक पराभवाची आणि त्यायोगे आपलं मोठेपण गमावण्याची भीती वाटत होती त्या प्रत्येकानंच हा त्रास देण्याचा प्रयत्न केला. येशूचं चरित्रही पहा.. मला एका गोष्टीसाठी येशू आणि महम्मद पैगंबर यांच्याविषयी आदर वाटतो.. लाखोंचा समाज त्यांच्यामागे असताना त्यांनी कधीही स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणवून घेतलं नाही.. आम्ही प्रेषित आहोत, दूत आहोत, असंच ते म्हणाले..
हृदयेंद्र – येशू ख्रिस्तांच्या वाटय़ालाही असाच त्रास आला हे खरंच आहे.. बायबल वाचताना सद्गुरू हा करुणेचा सागर असतो, तो कसा हे प्रकर्षांनं जाणवलं. येशू देवविरोधी आहे, असं तेव्हाच्या धर्मधुरीणांनी राजाच्या मनात बिंबवलं होतं. पर्वतावर शिष्यांसमवेत बसलेल्या येशूला त्याच्या शिष्यांनी विचारलं, उद्या आम्ही काय करीत असू? येशूनं एकाला सांगितलं, उद्या तू माझ्याविरुद्ध साक्ष देशील! तो शिष्य राजाला सामील झाला होता, बरं का! दुसऱ्याला येशू म्हणाले, तू उद्या माझी ओळख नाकारशील! तो म्हणाला, हे शक्यच नाही. एकवेळ मी प्राण गमावीन पण आपली ओळख कशी नाकारेन? येशू हसले आणि म्हणाले, एकदा नव्हे, तीनदा तू ओळख नाकारशील! त्यानंतर त्यांनी त्या सर्व शिष्यांना खऱ्या धर्माचरणाबद्दल बरेच काही सांगितलं. त्यांचं हे अखेरचं प्रवचन म्हणा ना! उद्या आपल्याविरुद्ध कोण कोण जाणार आहे, हे जाणूनही त्यांना सत्य काय ते सांगण्याची तळमळ खऱ्या सद्गुरुशिवाय कोणाला असते? आणि जसं येशू म्हणाले तसंच घडलं. येशूंना देहदंडाचं शासन देण्यात आलं आणि ज्यानं प्राण गेले तरी तुम्हाला सोडणार नाही, असं सांगितलं होतं त्यानं जीव वाचविण्याच्या तळमळीतूनच येशूला आपण ओळखत नाही, असं तीनदा सांगितलं! तिसऱ्यांदा तो कुणाला तरी ते सांगत असताना साखळदंडात जखडलेल्या येशूंनी दुरून त्याच्याकडे पाहात फक्त मंदस्मित केलं!
ज्ञानेंद्र – पण येशूंनी प्राणत्याग स्वीकारला, तत्त्वांचा त्याग स्वीकारला नाही!
योगेंद्र – तरी पुढे काय झालं? प्रत्येक धर्मग्रंथाची पोथीच झाली आणि त्यापलीकडे नवा विचार मांडणाऱ्यालाही प्राणत्याग किंवा तत्त्वत्याग यातच निवड करावी लागली ना? तेव्हा व्यापक वैचारिक संघर्षांनंतर ‘नवा’ विचार समाज स्वीकारतो आणि तोही प्रस्थापित होऊन भावी काळातल्या नव्या विचारांच्या विरोधातच उभा राहातो! त्या प्रत्येक टप्प्यावर वास्तव जो मांडू पाहातो त्याला त्रास, मानहानी, अवमान सोसावाच लागतो, हा इतिहास आहे.. प्राचीन काळी धर्म आणि राजसत्ता यांचं ऐक्य होतं, म्हणून धर्मातील नव्या विचाराविरोधात राजकीय बळ उभं करणं धर्मधुरीणांना साधत असेल एवढंच..
ज्ञानेंद्र – आज तरी काय वेगळं चित्र आहे?
कर्मेद्र – विचारवंतहो, तुकोबांच्या अभंगाचा अखेरचा चरण अर्थनिष्पत्तीसाठी ताटकळत आहे होऽऽ!
हृदयेंद्र – (हसत) ही सर्व चर्चा त्याच चरणाची पृष्ठभूमी आहे होऽऽ! पण त्याआधी या त्रासामागचं रहस्यही मला खुणावतंय होऽऽ!!
चैतन्य प्रेम