देशाची सेवा हे केवळ दोन शब्द नाहीत. त्यामागे एक व्यापक संकल्पना आहे. पण अलीकडे सेवा हाच एक उद्योग असल्याची संकल्पना रूढ होऊ लागल्याने, देशसेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत चालला असावा. म्हणूनच आता देशसेवेला वाहून वगरे घेण्याचे विचार कुणी गांभीर्याने व्यक्त करू लागला, तरीही त्याच्याविषयी आदर वाटणे किंवा वाढणे असे काही फारसे घडतही नाही. उलट काही तरी नव्या उद्योगाचे खूळ डोक्यात शिरले असावे, असाच समज कमी-अधिक प्रमाणात पसरू लागतो. त्यामुळे देशसेवा या शब्दाचे गांभीर्यदेखील कमी-अधिक प्रमाणात व्यक्तिसापेक्षदेखील असते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणाऱ्या आणि ताबडतोब उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीचा दावेदार ठरणाऱ्या सत्यपाल सिंह यांच्या देशसेवेच्या विचाराचे गांभीर्य हादेखील यामुळेच एक चच्रेचा विषय ठरला आहे. देशसेवेचा व्याप नसतो, तर ती एक मानसिक भावना असते. आपापल्या कुवतीनुसार, निरपेक्ष भावनेने केलेल्या देशसेवेतही प्रचंड मानसिक समाधान असते, असे कधी काळी मानले जायचे. स्वातंत्र्यलढय़ातील प्रत्येक योद्धा परकी सत्तेच्या विरोधात कारवाया करून फासावर चढला नाही, पण देशसेवेच्या विचाराने भारून आपल्या कुवतीनुसार बजावलेल्या कर्तव्यातूनही अनेकांना देशसेवेच्या भावनेचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. केवळ राजकारणातून देशसेवा करण्याचा विचार रूढ होऊ लागल्यापासून ही संकल्पनाच बदलत चालली आणि राजकारण म्हणजे देशसेवा हा समज रुजू लागला. आजवर केवळ पोलीस अधिकारी म्हणून देशाची सेवा केली, आता अधिक व्यापक प्रमाणात देशाची सेवा करावयाचा सत्यपाल सिंह यांचा विचार आहे. देशसेवेचा व्याप अधिक वाढविणे ही कल्पनाच कुणालाही मोठी रंजक वाटू शकते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणे आणि खासदारकी मिळाल्यावर लोकसभेत जाणे हा व्यापक देशसेवेचा मार्ग सत्यपाल सिंह यांनी निवडला. सध्याच्या राजकीय रणकंदनात भगवे वारे अधिक जोरदार झाल्यामुळे या वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन त्यानुसार पाठ फिरविण्याचे शहाणपण दाखविण्याचे प्रयत्न अचानक वाढू लागले आहेत. भाजपच्या वाऱ्यांसोबत स्वत:ला झोकून देण्याचे प्रयत्न राजकारणात वेगाने सुरू झालेले दिसू लागले आहे. काहींचे ते प्रयत्न यशस्वी होतात, तर काहींना सोबत घेण्यास या वाऱ्यांचीच हरकत असते. सत्यपाल सिंह मात्र सहजपणे भगव्या राजकारणाचे वारकरी होऊन गेले आहेत. आजवरच्या पोलीसगिरीत त्यांचे नाते खाकीसोबत होते, आता देशसेवेच्या भावनेतून राजकारणात उतरल्यामुळे त्यांचे नाते खादीसोबत जुळणार आहे. कारण खादी हा भारतीय राजकारणाचा ब्रॅण्ड आहे. सत्यपाल सिंह यांच्या खाकी पोलीसगिरीच्या काळात, त्यांना खादीपासून अंतरावर राहण्याचे नतिक बंधन होते. प्रत्यक्षात मात्र, खाकी आणि खादी यांच्या जवळिकीचा त्यांचा अनुभव आता खादीसोबतच्या नव्या नात्यामुळे त्यांना उपयुक्त ठरणार आहे. अर्थात राजकारणात उतरणारे सत्यपाल सिंह हे एकमेव पोलीस अधिकारी नाहीत. याआधी पोलीस सेवेतील किंवा प्रशासकीय सेवेतील अनेकांनी आपल्या सेवाक्षेत्राचा त्याग करून, स्वेच्छानिवृत्ती घेऊन किंवा रीतसर घेतलेल्या निवृत्तीनंतर देशसेवेच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. सनदी सेवा अधिकाऱ्यांनी तर अलीकडच्या काळात आपल्या सेवाकौशल्याचा लाभ खासगी उद्योगक्षेत्रांनाही बहाल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. सनदी सेवा हा आपल्या उपजीविकेचा मार्ग आहे, असे समजणारे सत्यपाल सिंह एकटेच नव्हते. सेवाभावनेचे गांभीर्यच बोथट होण्यामागे अशा विचारांचा वाटाही मोठा आहे..