येत्या २३ एप्रिलला शेक्सपिअरच्या जन्माला ४५० र्वष होतील. आजही सर्वाधिक वाचला जाणारा, सर्वाधिक खपाचा, सर्व जगातल्या भाषांत पोचलेला आणि जगातील सर्व साहित्यावर-साहित्यिकांवर प्रभाव असलेला नाटककार म्हणून शेक्सपिअरचं स्थान अबाधित आहे. केवळ ४० नाटकं आणि १५४ सॉनेट एवढीच ग्रंथसंपदा शेक्सपिअरच्या नावावर जमा आहे. पण त्याच्या नाटकांचे प्रयोग जगभरातल्या जवळपास सर्व भाषांमध्ये झाले आहेत, आजही होत आहेत. इंग्रजी नाटकाचा चेहरामोहरा बदलायचं काम शेक्सपिअरनं केलं. रॉयल शेक्सपिअर कंपनी ही नाटय़संस्था तर शेक्सपिअरच्या नाटकांचे प्रयोग गेल्या कित्येक वर्षांपासून करत आली आहे. आताही २३ ते २६ एप्रिलदरम्यान ती शेक्सपिअरच्या नाटकांचे नव्यानं प्रयोग करणार आहे. शेक्सपिअरच्या कुठल्या ना कुठल्या नाटकाचा जगभरात प्रत्येक मिनिटाला एक याप्रमाणे कुठे ना कुठे सतत प्रयोग चालू असतो!  
इंग्रजी भाषा शेक्सपिअर आणि बायबल यांनी घडवली आहे असं म्हटलं जातं. इंग्रजी भाषा ही बहुतांशी शेक्सपिअरीन आहे. शेक्सपिअरनं या भाषेच्या अक्षांश-रेखांशमध्ये जे जे काही व्यक्त करता येईल, ते ते आपल्या नाटकांमधून केलं आहे. भावनेच्या प्रत्येक छटेला, सूक्ष्मादिसूक्ष्म भेदाला इंग्रजीत स्वतंत्र शब्द आहेत. त्याचं बरंचसं श्रेयही शेक्सपिअरलाच जातं. त्यामुळे इंग्रजी भाषा व बायबल या दोन्ही गोष्टी या इंग्रजाच्या मानबिंदू आहेत. इंग्रज माणूस जिथे जिथे जातो, तिथे तिथे तो या दोन्ही गोष्टी घेऊन जातो. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत शेक्सपिअर आणि बायबल या दोन्ही गोष्टी आणल्या. अल्पावधीतच शेक्सपिअरनं भारतीय वाचकांचा आणि लेखकांचा कब्जा घेतला. एक काळ असा होता की, महाराष्ट्रात शेक्सपिअरचे भाषांतरकार, अभ्यासक आणि चाहते यांची संख्या लक्षणीय म्हणावी इतकी होती. आजही ती काही प्रमाणात आहे. शेक्सपिअरचे ‘डायहार्ट फॅन’ म्हणावे असे बरेच लोक आजही महाराष्ट्रात आहेत. त्यांना शेक्सपिअरविषयी ब्र उच्चारलेला चालत नाही. तसंही त्याच्याविषयी ब्र उच्चारणं सोपं नाहीच. पण चुकूनमाकून उच्चारला गेला तर त्याची धडगत राहत नाही. असो.
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने यावर्षी शेक्सपिअरच्या १७०० शब्दांचा समावेश नव्या आवृत्तीमध्ये केला आहे. स्व्ॉगर, क्रिटिक्स, गॉसिप, अ‍ॅड्व्हर्टायजिंग हे शब्द शेक्सपिअरची देणगी आहे. ‘जग ही एक रंगभूमी आहे’, ‘असे मित्र असल्यावर शत्रूची काय गरज?’, ‘नावात काय आहे?’, ‘जगावं की मरावं?’ असे काही वाक्प्रचार मराठीत इतके रूढ झाले आहेत की, ते मूळ शेक्सपिअरच्या नाटकातील आहेत, याची अनेकांना खबरबात नसते.
शेक्सपिअरनं मानवी जीवनाकडे इतक्या विविध पद्धतीनं पाहिलं आहे की, तसं इतर कुणालाही फारसं जमलेलं नाही. तो जीवनाकडे पाहताना ३६० अंशाचा कोन वापरत असावा! त्यामुळे केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगात त्याच्या नाटकातील पात्रं नसतात. मानवी जगण्याच्या सर्व छटा त्याच्या नाटकांतून व्यक्त होतात. ‘रोमिओ अँड ज्युलिएट’, ‘ज्युलिअस सीझर’, ‘अ मिडसमर नाइट्स ड्रीम’, ‘हॅम्लेट’, ‘किंग लिअर’, ‘र्मचट टू व्हेनिस’ ही शेक्सपिअरची नाटकं भाषिक श्रीमंती, मानवी सुखात्मिका-शोकांतिका, प्रहसन, विनोद, उपहास, उपरोध, प्रेम, कारुण्य, सौंदर्य यांचं उच्चप्रतीचं दर्शन घडवतात.
शेक्सपिअरच्या ‘ज्युलिअस सीझर’ या नाटकाचा पहिला प्रयोग १५९९ मध्ये झाला. शेक्सपिअरचं निधन २३ एप्रिल १६१६ रोजी वयाच्या ५२व्या वर्षी झालं. ८,२०,००० लोक दरवर्षी शेक्सपिअरच्या लंडनमधील घराला भेट देतात. शेक्सपिअरच्या नाटकांचे अनुवाद जवळपास जगभरातल्या सर्व भाषांमध्ये झाले आहेत. इंग्रजीत लिहिणारे बहुतांशी लेखक सर्वाधिक प्रमाणात शेक्सपिअरचीच अवतरणं देतात..
शेक्सपिअर हा जगातला असा लेखक आहे, ज्याच्याशिवाय मानवी जीवनाची थोरवी समजून घेताच येत नाही. विंदा करंदीकरांची एक कविता आहे ‘तुकोबा-शेक्सपिअर भेटी’विषयी-
तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।।
तो झाला सोहळा। दुकानात.
जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये.
तुका म्हणे ‘‘विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।’’
शेक्सपीअर म्हणे । ‘‘एक ते राहिले; ।
तुवा जे पाहिले विटेवरी.’’
तुका म्हणे, ‘‘बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;
विठठ्ल अट्टल। त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया.’’
शेक्सपीअर म्हणे, ‘‘तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत’’
तुका म्हणे, ‘‘गडय़ा। वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काटय़ासंगे भेटे । पुन्हा तोच.
ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे.’’
दोघे निघोनिया गेले दोन दिशां।
कवतिक आकाशा आवरेना ।।
(पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित विंदा करंदीकर यांच्या ‘धृपद’ या कवितासंग्रहातून साभार.)