जो परमात्म्यापासून विभक्त नाही, अशा भक्ताच्या ठायी मीपणाची जाणीव उरत नाही. असाच भक्त ‘ठाईचा मी नेणे’ असं म्हणू शकतो, असं सांगून अचलानंद दादा काही क्षण मौनावले. विचारात बुडालेल्या हृदयेंद्रनं उत्सुकतेनं विचारलं..
हृदयेंद्र- दादा विठा महाराज पुढे म्हणतात, ‘गर्भवास भोगणे तुझी लाज..’ याचा नेमका अर्थ काय असावा? ‘मी तर ‘मी’पणानं उरलो नाही, आता तुझ्या लाजेखातर मी गर्भवास भोगत आहे,’ असा जर या चरणाचा रोख असेल तर तो थोडा खटकतो..
अचलानंद- तुमची बुद्धी कुशाग्र आहे, पण बऱ्याचदा तीच विकल्प निर्माण करून गोत्यात आणते बरं का! या ‘लाज’ला अनेक छटा आहेत. तुम्ही ज्या मनोवृत्तीनं आणि मनोभूमिकेतून पाहता त्याप्रमाणे ती छटा तुम्हाला जाणवेल! विठा महाराजांप्रमाणे शरणभावानं पाहा मग जाणवेल ते म्हणत आहेत, हे केशवा माझ्या ठायी जो ‘मी’पणा होता ना तो तुझ्या भक्तीच्या संचारामुळे ओसरला.. एखाद्या शक्तीचा संचार आपल्यात होतो याचाच अर्थ ती शक्ती उपजत नसते. आपला तिच्यावर ताबा नसतो, ती आपल्या आधीन नसते. तशी परमात्म्याची भक्ती आपण उत्पन्न करू शकत नाही! त्याच्या कृपेनंच ती उत्पन्न होते, तिचा संचार होतो. तेव्हा हे केशवा त्या भक्तीनं ‘मी’पणा उरला नाही तरी तुझ्या भक्तीत परत-परत रममाण होता यावं यासाठी आम्हाला माणसाचा जन्म परत-परत घ्यावासा वाटतो!!
हृदयेंद्र- तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी!!
अचलदादा- बरोबर! प्रत्यक्षात ते कोण होते? त्यांनी एका अभंगात आपला पूर्ण पत्ताच दिला आहे बरं का! ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी।’ खरं तर आम्ही वैकुंठात नित्य वास करणारे आहोत.. केवळ भक्तीसाठी आलो आहोत.. तसं विठा महाराज काय म्हणतात? ‘ठाईचा मी नेणे’. तरीही आम्ही गर्भवासी होतो.. परमात्मा कसा आहे? परमसंकोची आहे.. आपल्या भक्तीचं महिमान वाढविण्यासाठी आपल्या भक्ताला वारंवार गर्भवास भोगावा लागतो.. द्वैतमय जगाचा त्रास सोसावा लागतो, याची त्याला लाज वाटते.. पण या भक्ताला मुक्ती नको!
हृदयेंद्र- मागे आमच्या चर्चेत विठा महाराजांचा अभंग आला होता खरा! ‘ऐसे सुख कोठे आहे। मुक्ती मागोन करिसी  काय।।’
अचलदादा- बघा! जे सुख भक्तीत आहे ते मुक्तीत नाही! तुम्ही जो अभंग सांगताय ना त्याची शेवटची ओळही फार विलक्षण आहे बरं का.. ‘नामयाचा विठा खेळे। बाप नामची माझे भोळे।।’
हृदयेंद्र- हो! पण या ओवीवर चर्चाच केली नव्हती..
अचलदादा- कारण ती समजतेच कुठे? (हृदयेंद्रच्या मनात आलं, अचलदादा असं टोक गाठतात की जणू इतरांना काहीच समजत नाही! त्या चर्चेत बुवाही होतेच की.. त्यांनीही किती छान उकल केली होती..)
हृदयेंद्र- बरं, पण तुम्ही तरी सांगा..
अचलदादा- या चरणाचे अनेक अर्थ होतात.. नामयाचा विठा खेळे म्हणजे मी नामदेवाचा विठा खेळत आहे किंवा नामदेवाचा विठ्ठल खेळत आहे! आता विठा महाराजांचे वडील कोण?
हृदयेंद्र- नामदेव!
अचलदादा- ज्याच्या नावातच ‘नाम हाच देव’ हे सत्य आहे! त्या बापाने मला जे साधंभोळं नाम सांगितलंय ना त्या नामाशी मी आता खेळत आहे! सवंगडय़ांशी खेळण्यात कसा आनंद असतो तसं नामाशी मी खेळत आहे.. जगातला वावर हा खेळच तर आहे जणू आणि नामाच्या संगतीनं तो खेळला जात आहे..
हृदयेंद्र- पण दादा नामदेवांच्या घरातलं वातावरणच किती दिव्य असेल ना? मुलं, सुना, बायको, दास-दासी सर्वच विठ्ठल भक्तीत रमणारे! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना, घरात इतकं प्रेम असावं की बाहेरच्या माणसाला त्या घरातून जावंसंच वाटू नये!
अचलदादा- (गंभीर होत) हृदयेंद्र सत्पुरुषांच्या वचनांचे दोन अर्थ असतात.  परमात्मा अंत:करणातच आहे असं आपण म्हणतो पण त्याचा शोध बाहेरच घेतो ना? (हृदयेंद्र होकार भरतो) तर हा ‘बाहेर’चा माणूस, ‘अतिथी’ या भक्ताच्या अंत:करणरूपी घरात प्रकटू पाहतो. पण तिथल्या विकारांच्या पसाऱ्यामुळे त्याला पाय ठेवायला जागाच नसते.. त्याच ‘घरा’त जर परमात्म्यासाठी अखंड प्रेम उमललं.. तर हा ‘अतिथी’ जाईल का?  बरं पण पुन्हा व्यवहारात येऊ.. नामदेवांच्या मुलांचंही व्यवहारावरून जोरदार भांडण झालं होतं बरं का.. नामदेवांचे पुत्र नारा महाराजांनी ते नोंदवलं आहे!
चैतन्य प्रेम