या दोन्ही हिंदूी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या लेखकांच्या कादंबऱ्या रहस्यमय असल्या तरी त्या ‘टिपिकल’ थाटाच्या नाहीत. त्यात नावीन्यता, कल्पकता आणि वाचनीयता पुरेपूर आहे. त्यामुळे त्या शेवटपर्यंत खिळवून ठेवतात आणि कथानकाबरोबर खेचत नेतात.
इंग्रजीतून साहित्यनिर्मिती करणाऱ्या भारतीय लेखकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा साहित्यामध्ये रहस्यमय, थरारक किंवा रोमॅण्टिक कादंबऱ्यांची संख्या जास्त असली तरी यातील बहुतांश कादंबऱ्यांतील कथासूत्र हे अगदीच हॉलीवूड धाटणीचे असते. काही कादंबऱ्या तर एखाद्या चित्रपटाची पटकथा बनावी, या हेतूनेच लिहिलेल्या असतात. त्यामुळे त्यातील ‘फिल्मी’पणा उघडपणे जाणवतो. अर्थात, काही नवोदित भारतीय लेखकांनी वेगळं कथासूत्र निवडून रचलेल्या कादंबऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यात ‘शांती मेमोरियल’ आणि ‘अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क’ या दोन कादंबऱ्यांचा समावेश करायला हरकत नाही. वाचकाला खिळवून ठेवणारे कथासूत्र, कादंबरीच्या गाभ्याचे गहिरेपण वाढवणारे वर्णन आणि स्थळकाळाची अचूक निवड यांमुळे या दोन्ही कादंबऱ्या थरार आणि उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात.
विशेष म्हणजे, या दोन्ही कादंबऱ्यांचे लेखक बॉलीवूडशी संबंधित आहेत. ‘शांती मेमोरियल’ ही दिवंगत चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे पुत्र शादाब खान यांची पहिली कादंबरी आहे; तर, ‘अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क’ ही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि जाहिरातकर्ते पीयूष झा यांची निर्मिती आहे. सध्या चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक दिग्दर्शक, पटकथाकार पुस्तकलेखनाच्या ‘पूर्ण वेळ’ क्षेत्रात उतरले आहेत. मात्र, यापैकी काहींचे लिखाण हे चित्रपटाच्या पटकथेलाच साजेसे किंवा ‘तीन तासांच्या’ पठडीत बसतील, असे आहे. ‘शांती मेमोरियल’ आणि ‘अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क’ या दोन्हींचे सूत्र चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असे आहे. मात्र, कादंबरी म्हणूनही या दोन्ही पुस्तकांची परिणामकारकता कमी पडत नाही, हे विशेष!
‘अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क’ ही पीयूष झा यांच्या ‘मुंबईस्थान’ या मालिकेतील तिसरी कादंबरी आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील इन्स्पेक्टर वीरकर याच्या साहस आणि चातुर्याची ही कथा आहे. याआधी ‘मुंबईस्थान’ मालिकेतील दुसरी कादंबरी ‘कंपास बॉक्स किलर’मधून झा यांनी ‘इन्स्पेक्टर वीरकर’ जगासमोर आणला होता; पण ‘अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क’ ही वीरकरच्या ‘बॉण्ड’स्टाइल कारनाम्याची कहाणी नाही. मुंबईत ठरावीक अंतराने महाविद्यालयीन तरुणांची हत्या होत असते. प्रत्येक हत्येनंतर मारेकऱ्याने मृत तरुणाच्या शरीराचा एक अवयव निर्घृणरीत्या काढून नेलेला असतो. प्रथमदर्शनी या सर्व हत्यांना जोडणारा एकही धागा न सापडल्याने हे कुणा माथेफिरूचं काम असावं, असा अंदाज बांधला जातो; पण या प्रकरणांचा खोलात जाऊन तपास करताना इन्स्पेक्टर वीरकरच्या हाती जे पुरावे लागतात, त्यातून अतिशय नव्या स्वरूपाच्या गुन्हय़ाची उकल होते. छुप्या कॅमेऱ्याच्या सााहाय्याने प्रेमीयुगुलांची आक्षेपार्ह चित्रफीत बनवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका उच्चशिक्षित आणि तंत्रकुशल टोळीचा त्यातून पर्दाफाश होतो. मात्र, टोळीचे मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआडच असतात. टेक्नॉलॉजीमध्ये ‘ढ’ असलेला वीरकर या ‘टेक्नोक्रॅट’ खलनायकापर्यंत कसा पोहोचतो, त्याचा थरार म्हणजे ही कादंबरी.
सोशल मीडियाचा होणारा गैरवापर, महाविद्यालयीन तरुणांतील व्यसनाधीनता, ‘हायफाय’ जीवनशैलीची चटक आणि टेक्नॉलॉजीतील नावीन्याचा सोस या सध्याच्या तरुण पिढीशी निगडित असलेल्या मुद्दय़ांवर ‘अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क’ची थरारकथा उभारली आहे. ‘अ‍ॅण्टी सोशल’चा पूर्ण पट मुंबईत आहे. त्यामुळे लेखकाने मुंबईतील ठिकाणे, व्यक्ती, बोली, जीवनशैली यांचा अचूक वापर करून कादंबरीचा प्रभाव अधिक वाढवला आहे.
या कादंबरीतली खटकणारी आणि दुर्लक्ष न करता येणारी गोष्ट म्हणजे तिचा ‘प्रोलॉग’. कादंबरीची सुरुवात करताना लेखकाने पहिल्या खुनाचं वर्णन ज्या पद्धतीने केलं आहे, ते वाचल्यावर ही कुणा माथेफिरू किंवा अघोरी कृत्याची भयकथा असेल, असं वाटतं. कथेतील धक्कासूत्र मध्यापर्यंत टिकवण्यासाठी लेखकाने तसं केलं असण्याची शक्यता आहे. मात्र, जितक्या प्रभावीपणे पहिल्या खुनाचं वर्णन केलं गेलं, तितका जोर बाकीच्या हत्यांच्या वर्णनात दिसत नाही. ते सातत्य राखलं असतं, तर कादंबरी अधिक उत्कंठावर्धक बनली असती.
भयकथांमध्ये सर्वात महत्त्वाची असतात ती त्यांतील वर्णनं. त्यात गूढता, गहिरेपण आणि थरारकता नसेल, तर भयकथेचं सूत्र कितीही चांगलं असलं तरी ती वाचकाला खिळवून ठेवत नाही. ‘शांती मेमोरियल’ लिहिताना शादाब खान यांनी ही गोष्ट अचूक हेरली आहे. ‘शांती मेमोरियल’ हे ‘रोझलिन’ आणि ‘हारिया’ अशा दोन प्रदीर्घ कथा किंवा लघू कादंबऱ्यांचं पुस्तक आहे. दोन्हींचा एकमेकींशी थेट संबंध नसला तरी त्या ‘शांती मेमोरियल’ या मनोरुग्णालयाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे असं म्हणावं लागेल की, ‘शांती मेमोरियल’ हे दोन्ही कथांच्या केंद्रस्थानी आहे.
‘रोझलिन’ ही एक जुनी गढी आहे. या गढीचा मालक असलेला डॉक्टर पर्सी झोराबियन यांच्या पत्नी आणि मुलाची याच गढीत हत्या होते. मग झोराबियन त्या गढीचं रूपांतर अतिशय घातक अशा मनोरुग्णांच्या उपचार केंद्रात करतो. तिथं आणण्यात आलेल्या मनोरुग्णांचे हाल करून झोराबियन आपल्या पत्नी व मुलाच्या हत्येचा सूड उगवतो. याच डॉक्टरची हत्या करण्याची सुपारी राजू नावाच्या गुंडाला दिली जाते. ठरलेल्या वेळी ठरलेल्या योजनेनुसार, राजू ‘रोझलिन’मध्ये शिरतो; पण आपण शिकार करायला नव्हे, तर शिकार बनवायला येथे बोलावलो गेलोय, हे त्याच्या लक्षात येतं आणि मग एक भयंकर जीवघेण्या थराराला त्याला सामोरं जावं लागतं. ‘रोझलिन’च्या पहिल्या ओळीपासून निर्माण करण्यात आलेलं भय शेवटच्या धक्क्यापर्यंत कायम राहतं. या एकाच कथेत अनेक ‘क्लायमॅक्स’ आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी आता रहस्य उलगडेल, असं वाटत असताना नवीन गूढ त्याची जागा घेतं. संपूर्ण कथा अतिशय ‘नकारात्मकते’नं लिहिली गेली आहे. त्यामुळे मनोरुग्णालयातील थरार अधिक प्रभावी वाटतो.
या कादंबरीतील दुसरी कथा ‘हारिया’ या माथेफिरू खुन्याची आहे. काळोख्या रात्री अंधारात निष्पापांची हत्या करत सुटलेला हारिया पोलिसांपासून नेहमी सुटका करून घेत असतो. मात्र, आपल्या या दुष्कृत्यांची विस्तृत नोंद त्याने त्याच्या डायरीत केलेली असते. त्याची डायरी हीच ‘हारिया’ची कथा उलगडत नेते. पहिल्या कथेप्रमाणे ‘हारिया’मध्येही नकारात्मक विचार, खुनशीपणा, भास-आभासांचा खेळ चांगला रंगवला आहे.
‘शांती मेमोरियल’ वाचकाला खिळवून ठेवते. मात्र, त्यातील बीभत्सपणा किंवा भयचकित करणारं वर्णन विचलितही करतं. काहींना ही कादंबरी वाचू नये, असंही वाटू शकतं. मात्र, असं वर्णन आणि ती शब्दरचना हेच ‘शांती मेमोरियल’चं वैशिष्टय़ आहे. लेखकाने पुस्तकाला ‘शांती मेमोरियल’ हे नाव दिलं असलं तरी त्याचा फारसा संबंध दोन्ही कादंबऱ्यांत येत नाही. तो यायला हवा होता, जेणेकरून पुस्तकाचं शीर्षक समर्पक ठरलं असतं. या कादंबरीचं मुखपृष्ठही कथांना साजेसं आहे. शादाब खानचं हे पहिलंच पुस्तक असलं तरी ‘शांती मेमोरियल’ हा ‘देशी इंग्रजी’ कादंबऱ्यांतीलही नवीन प्रयोग आहे, असं म्हणायला हरकत नाही.
sx04
शांती मेमोरियल : शादाब खान
फ्रॉग बुक्स, नवी दिल्ली
पाने : १७१, किंमत : १४५ रुपये

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

 

 

 

sx05

अ‍ॅण्टी सोशल नेटवर्क : पीयूझ झा
रुपा पब्लिकेशन, नवी दिल्ली
पाने : १९२, किंमत : १९५ रुपये.