बेडकासारखं दिसणारं, आपल्यापुरत्या तळ्यात राहणारं, बेडकासारखंच डरावणारं जर काही असेल, तर त्याला बेडूकच म्हटले पाहिजे, असे म्हटले जाते. आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्षाला हे तंतोतंत लागू पडते. या पक्षाने काँग्रेसच्या नावाने बोटे मोडत दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी २८ जागा मिळविल्यानंतर काँग्रेसच्याच पाठिंब्याने दिल्लीत सरकार स्थापन केले. ४९ दिवसांतच राजीनामाही दिला आणि राजकीय हौतात्म्य मिळविल्याच्या आविर्भावात लगेचच लोकसभेच्या मैदानात उडी घेत देशभर उमेदवार उभे केले. आपली हवा निर्माण झाल्याच्या उन्मादात असलेल्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला आणि उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. वाराणसीत केजरीवाल यांच्या पराभवानंतर आता हा पक्षच सैरभैर झाला असून नाटकबाजीपलीकडे हा पक्ष काही करू शकेल, अशी शक्यताही मावळत चालली आहे. आता पराभवाचे आत्मपरीक्षण करून टीकेचे धनी होण्याचे टाळण्याकरिताच केजरीवाल तुरुंगात जाऊन बसल्याची टीका पक्षातूनच सुरू झाली आहे. तुरुंगवासामुळे पुन्हा एकदा आपले गमावलेले हौतात्म्य प्राप्त होईल हा केजरीवालांचा अंदाज तर फसलाच, पण याच त्यांच्या कृतीमुळे पक्षातही त्यांच्या हेतूविषयीच्या शंकांचे काहूर माजले आहे. जनाधारही गेला आणि पक्षाला गळती लागली अशा दुहेरी पेचात सापडलेल्या आम आदमी पक्षाचे भविष्य पक्षातीलच अनेक जण आता वर्तवू लागले आहेत. राजकारण हा केजरीवालांचा, त्यांच्या पक्षाचा िपड नाही, त्यांनी रस्त्यावरची आंदोलने आणि उपोषणेच करावीत, असे पक्षाबाहेरचा रस्ता धरणाऱ्यांनी सुनावण्यास सुरुवातही केली आहे. केवळ माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या लखलखाटामुळे आणि छोटय़ा पडद्यावरील झगमगाटामुळे मोठय़ा झालेल्या या पक्षाला मात्र, एवढी पडझड होऊनही पुरेसे शहाणपण आलेले दिसत नाही. शनिवारी पक्षाच्या दोघा बडय़ा नेत्यांनी, शाझिया इल्मी आणि कॅप्टन गोपीनाथ यांनी पक्षत्याग केल्यानंतर केजरीवाल यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांतूनही हेच स्पष्ट होते. देशाच्या राजकारणात मोठे बदल घडविण्याची स्वप्ने आम आदमी पार्टीने जनतेमध्ये पेरली, पण पक्षात मात्र लोकशाहीचाच अभाव आहे, असा घरचा आहेर देत शाझिया इल्मी यांनी पक्षत्याग केला. धरणे आणि आंदोलनांपलीकडे काही करण्याचा विचारच अजून पक्षात मूळच धरत नसल्याबद्दलची नाराजीही शाझिया  यांनी बोलून दाखविली आणि पक्षातील नाराजीला तोंड फोडल्याबद्दल आपले महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, असेही त्या म्हणाल्या. कॅप्टन गोपीनाथ यांच्या पक्षत्यागामागेदेखील हीच व्यथा होती. केजरीवाल यांची कृती अलीकडच्या काळात खूपच बदलत गेली आणि पक्ष आपली उद्दिष्टे व ध्येयधोरणेच विसरला, असे गोपीनाथ यांनी म्हटल्याने पक्षाच्या सुकाणू गटामध्ये उफाळलेला चडफडाट योगेंद्र यादव यांच्या कुत्सित शेरेबाजीतून पुन्हा उजेडात आला. कॅप्टन गोपीनाथ कधी पक्षात होते हेही आपल्याला माहीत नाही, असे सांगत त्यांनी गोपीनाथ यांच्या पक्षत्यागाची दखल घेण्यास नकार दिला असला तरी या नेत्यांनी पक्षाच्या शिडातील हवा काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. चारशेहून अधिक जागा लढवून त्यापैकी जेमतेम १८ जणांची अनामत वाचवू शकलेल्या या पक्षाला देशात केवळ दोन टक्के मतांचा जनाधार आहे, हे स्पष्ट झाल्याने हा पक्ष इतिहासात जाणार की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र, या पक्षामुळे देशाच्या राजकारणाला एक महत्त्वाचा धडा मात्र मिळाला आहे. केवळ नाटकबाजी करून राजकीय पक्ष चालविता येत नाही, हे आता सर्वानाच पुरते पटले असेल.