नुकतीच प्रसूत झालेली महिला, तिच्या चेहऱ्यावर उजळणारे तेज, तिच्या बाहुपाशातील तिचे गोंडस बाळ.. सूर्यकिरणात चमकणारे तिचे सोनेरी केस.. हे चित्र फक्त जाहिरातीत आपण पाहतो, पण प्रत्यक्षात सर्वसाधारण स्त्रियांसाठी बाळाच्या जन्मानंतर असे रोमँटिक चित्र असते का, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, पण हे रोमँटिक चित्र असायला काही हरकत नसावी, असे शीला किटझिंगर यांना वाटत होते. मानववंशशास्त्रज्ञ व मानवी बाळाच्या नैसर्गिक जन्म प्रक्रियेतील तज्ज्ञ (नॅचरल बर्थ गुरू) अशी ओळख असलेल्या शीला किटझिंगर (वय ८६) यांचे नुकतेच निधन झाले. ‘नैसर्गिक जन्म’ चळवळीच्या त्या प्रणेत्या होत्या व गर्भारपणात महिलांना अधिक सक्षम केले पाहिजे असे त्यांचे मत होते. बाळाच्या जन्मात फोरसेप्ससारखी साधने, कळा लवकर सुरू होण्यासाठी औषधे असले प्रकारही त्यांना मान्य नव्हते.  ‘द कम्प्लिट बुक ऑफ प्रेगनन्सी अ‍ॅण्ड चाइल्डबर्थ’, ‘द एक्सपीरियन्स ऑफ चाइल्डबर्थ’, ‘अवरसेल्व्हज अ‍ॅज मदर्स’ ही त्यांची निवडक पुस्तके. त्यांचे ‘अ पॅशन फॉर बर्थ’ हे आत्मचरित्र पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे.
 शीला हेलेना एलिझाबेथ किटझिंगर यांचा जन्म २९ मार्च १९२९ रोजी झाला. उच्चशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात घेऊन एडिंबर्ग विद्यापीठात त्यांनी संशोधन केले. त्या वेस्ट लंडन विद्यापीठात प्राध्यापक होत्या. त्यांना स्वत:ला पाच मुले होती व मुलांच्या संगोपनात दाई, प्रसविका (मिडवाइफ) महिलेस फार महत्त्व असते असे त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्ष जन्मप्रक्रियेच्या पलीकडे त्यांचे चिंतन होते. बाळंतपणी स्त्रियांवर अनेक दडपणे असतात. मुलगाच झाला पाहिजे हे त्यातील एक प्रमुख दडपण असते, असे सांगणाऱ्या शीला यांचे विश्लेषण भारतालाही लागू पडेल. ज्या स्त्रिया माता बनतात त्यांच्या चेहऱ्यावर खरे तर आनंद असायला हवा पण अनेकदा त्यांच्या मनात मुलाला कसे वाढवणार याची चिंता असते, याची कारणे दारिद्रय़, साध्या घरकुलाचा अभाव, प्रसंगी अन्नाची कमतरता अशी अनेक आहेत. अनेकदा या स्त्रियांना योग्य माहिती मिळत नाही त्यामुळेही त्या घाबरून जातात, त्यांच्यासाठी किटझिंगर यांची पुस्तके म्हणजे आधार आहेत.
 किटझिंगर यांनी महिलांचे सगळे अनुभव अभ्यासले होते. त्यांनी ब्रिटनमध्ये ‘बर्थ क्रायसिस हेल्पलाइन’ सुरू केली होती व त्यावर त्या महिलांच्या प्रश्नांना स्वत: उत्तरे देऊन आश्वासित करीत असत. त्यांचा हा आश्वासक, धीर देणारा आवाज आता कायमचा लोपला आहे.