22 November 2017

News Flash

शिन्झो अ‍ॅबे

जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होत असलेले शिन्झो अ‍ॅबे हे कडव्या राष्ट्रवादी विचारसरणीचे मानले जातात. त्यांची

मुंबई | Updated: December 20, 2012 12:25 PM

जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होत असलेले शिन्झो अ‍ॅबे हे कडव्या राष्ट्रवादी विचारसरणीचे मानले जातात. त्यांची आर्थिक विचारसरणीही उजव्या पंथाची आहे. हे बाळकडू त्यांना घराण्यातून मिळाले. अ‍ॅबे यांचे घराणे व त्यांचे आजोळ राजकारणात बुडालेले होते. वडील व आजोबा हे लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षात वरच्या पदांवर होते, तर आईचे वडील नोबुसुके किशी हे पाच वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. टोजो यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होत असे व अमेरिकेचे युद्धकैदी म्हणून त्यांनी तीन वर्षे काढली. मात्र युद्धानंतर राजकारणात आल्यावर ते पूर्णपणे अमेरिकाधार्जिणे बनले. नातवावर त्यांचाच प्रभाव आहे, असे जपानचे अभ्यासक मानतात. शिन्झो अ‍ॅबे यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. जपानमध्ये परतल्यावर त्यांनी खासगी क्षेत्रात नोकरी केली असली तरी घराण्यातील राजकारणाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. १९८०मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तरुण वयातच पक्षाच्या वरच्या वर्तुळात त्यांचा प्रवेश झाला. विविध पदांवर व नेत्यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी बराच काळ काम केले. प्रखर राष्ट्रीय अस्मितेचा जागर करीत त्यांनी उत्तर कोरियाच्या विरोधात वातावरण तापविले. राष्ट्रीय अहंकार फुलून येईल, असा जपानचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांनी चळवळ हाती घेतली. दुसऱ्या महायुद्धात जपानने केलेल्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या सर्वदूर पसरल्या होत्या व जपानी नागरिकांना याबद्दल खंत वाटत असे. अ‍ॅबे यांनी अशी खंत वाटून घेण्यास नकार दिला व जपानी लष्कराच्या क्रौर्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले. जपानच्या अस्मितेला खतपाणी घालणारे त्यांचे पुस्तक तुफान लोकप्रिय ठरले होते. चीन व कोरिया यांच्याविरोधात त्यांनी कायम कणखर भूमिका घेतली. देशात खासगीकरणाचा पुरस्कार केला. २००७ मध्ये त्यांनी सत्ता मिळाली, पण वर्षभरातच राजीनामा द्यावा लागला आणि पक्षाचीही धूळधाण उडाली. मात्र आता परत ते सत्तेवर आले आहेत आणि पुन्हा एकदा जपानी राष्ट्रवादाचा बिगूल वाजविण्यास त्यांनी सुरुवात केली. याचे परिणाम लवकरच दिसतीलच. अ‍ॅबे भारतप्रेमी आहेत ही आपल्यासाठी जमेची बाजू.

First Published on December 20, 2012 12:25 pm

Web Title: shinzo abe
टॅग Shinzo Abe,Vaktivedh