बालवयात यशशिखरावर पोहोचलेल्या सर्वच कलावंतांच्या भाळी लौकिकार्थाने ‘महागुरु’पद नसल्याचा प्रचंड मोठा इतिहास आहे. सिनेमा या जनमानसाच्या जिव्हाळ्याच्या क्षेत्रात अवघ्या साडेतिनाव्या वर्षी उतरून स्वत:साठी आणि नुकत्याच बोलू लागलेल्या हॉलीवूडच्या जगभर विखुरलेल्या प्रेक्षकांसाठी ‘शिशुस्टार’पद तयार करणाऱ्या शर्ली टेम्पल या मात्र लौकिकार्थाने महागुरुपद जगल्या. पहिली जगप्रसिद्ध बालअभिनेत्री म्हणूनही आणि कुशल राजधुरीण म्हणूनही.
जागतिक मंदीच्या काळातील समाजाच्या दु:ख, दारिद्रय़, उपासमार आणि छिन्नमनस्क अवस्था या जखडलेल्या वास्तवावर सामूहिक फुंकर घालण्याची शक्ती शर्ली टेम्पल यांच्या अभिनयामध्ये होती. त्या अभिनयामुळे नुसत्या अमेरिकेच्याच नाही, तर हॉलीवूडच्या साम्राज्याचा झेंडा जिथे रोवला गेला, त्या त्या देशांच्या घरांतील लाडकी बनण्याचा मान त्यांना मिळाला. टेम्पल हिच्या लोकप्रियतेची साक्ष काढताना लक्षात येते की, तत्कालीन पडदासम्राज्ञी ग्रेटा गाबरे, अभिनयाचा बादशहा क्लार्क गेबेल यांच्याहून अधिक पत्रे या शिशुस्टारला चाहत्यांकडून येत. राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्यापेक्षा तिचीच छबी वृत्तपत्रांमध्ये अधिक झळके आणि तिने चित्रपटांत वापरलेल्या बाहुल्या, खेळणी आदी वस्तू अमेरिकी, युरोपीय बाजारांतील सर्वाधिक खपाच्या ठरत. मार्केटिंग, जाहिरात आणि ब्रँड रूपाने उपयोजित स्टारपद तयार होण्याच्या कितीतरी आधी शर्ली टेम्पल यांनी त्या त्या गोष्टी अनुभवल्या. त्यांच्या या लोकप्रियतेची लाट इतकी मोठी होती की, त्यांच्यावर टीका करणाऱ्या ग्रॅहेम ग्रीन यांना खटल्याला सामोरे जावे लागले होते.
कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे जन्मलेल्या शर्ली हिच्या कलागुणांना ओळखून तिच्या आईने तिला वयाच्या तिसऱ्या वर्षी नृत्यदीक्षा दिली. १९३४ साली आठ प्रमुख चित्रपटांमध्ये तिची व्यक्तिरेखा झळकली आणि शर्ली टेम्पल मुख्य अभिनेता-अभिनेत्रीहून अधिक जिव्हाळ्याचा विषय बनली. तिच्या दु:खहर्त्यां चेहऱ्याने मंदीची दाहकता कमी करण्याचे बळ प्रेक्षकांना दिले. प्रसिद्धी, पैसा, ओळख आदी सर्व अवश्यमेव गोष्टींची मालकी तिच्याजवळ तारुण्यावस्थेपूर्वी होती. या शिशुस्टारपदाच्या शिक्क्यानिशी पुढे २१व्या वर्षीच तिने पडद्याला रामराम केला असला, तरी १९५०च्या दशकामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये निधी उभारणीच्या निमित्ताने तिचा राजकारणात प्रवेश झाला. मग अमेरिकी राजदूत म्हणून घाना येथे कार्य, राष्ट्राध्यक्षांच्या शिलेदारांच्या जथ्यामध्ये वर्णी अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांना टेम्पल यांनी स्पर्श केला. निक्सनपासून बुश प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या टेम्पल त्यांच्या मृत्युपश्चात ओळखल्या जातील त्या केवळ आद्य शिशुस्टार आणि खरोखरच्या ‘महागुरू’ म्हणून.