महाराष्ट्राच्या विरोधकीय मंचावरील गोंधळनाटय़ात उद्धव, राज, देवेंद्रादी महानायकांची अदाकारी बेमालूम वठत असताना नरेंद्र मोदींच्या उत्तराखंडीय उपकथानकाने रंगत आणली आहे. या नाटय़ातील नायक एकमेकांशी भांडत असल्याने मूळ संहितेबाबतच संभ्रम पडावा हे चित्र सत्ताधारी आघाडीचे मात्र रंजन करणारे आहे.
युद्धास सामोरे जाताना किमान दोन गोष्टींची स्पष्ट कल्पना असणे अत्यावश्यक असते. आपला शत्रू कोण आणि सेनापती कोण. या दोन बाबींबाबत स्पष्टता नसल्यास काय होते हे पाहावयाचे असेल तर सध्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि असून नसल्यासारखा असलेला रिपब्लिकन पक्ष यांच्यात जे काही सुरू आहे तितके उत्तम उदाहरण प्रयत्न करूनही सापडणार नाही. मुळात ही युती दोघांची तरी नक्की आहे की तिघांची? हे तिघेही घट्ट असतील तर चौथा येणार किंवा काय? येणार असल्यास त्याला सामावून घेण्यासाठी विद्यमान तिघांतील नक्की कोणास जरा सरकून घ्यावे लागणार आणि मुदलात हा चौथा नक्की हवा की नको अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नसल्यामुळे झोपेत हातवारे करणाऱ्यासारखी या तीन पक्षांची अवस्था झाली आहे. या अवस्थेतील ताजा गोंधळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उडवून दिला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडीय प्रकोपातील संकटग्रस्तांना मदत करताना त्यातील भाग्यवंत अशा १५ हजार गुजराती बांधवांचाच जीव वाचवल्याची बातमी एका राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या वृत्तपत्राने आणि अन्य काही वाहिन्यांनी दिली. ते उद्धव ठाकरे यांना लागले. कारण ही बातमी ज्या पत्राने दिली त्या पत्राने ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची बातमीही अशाच असमतोली मोठेपणाने दिली होती. त्या वेळी हे कसे छापून आणता येते याच्या सुरस आणि मनोरंजक कथा राजकारण्यांच्या आणि त्यामुळे माध्यमांच्या वर्तुळात चर्चिल्या जात होत्या. तेव्हा असे काही मोठय़ा प्रमाणावर त्या ठिकाणी छापून आणण्यासाठी काय करावे लागते याचे गुपित उद्धव ठाकरे यांना माहीत आहे, हे उघडच आहे. परंतु हे गुपित आता नरेंद्र मोदी यांनाही कळले हेही एक कारण उद्धव ठाकरे यांच्या नाराजीमागे नाही, असे ठामपणाने सांगता येणार नाही. खेरीज, दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यांचा पाठिंबा उद्धव यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनाही उदंड प्रमाणावर आहे. तेव्हा तेही या प्रसिद्धी तंत्रामागे असल्याची बोलवा आहे. तेव्हा प्रसिद्धीचे गुपितही गेले आणि आपला पाठीराखाही नरेंद्र मोदी यांच्या मागे गेला याबद्दल त्यांना दु:खासाठी दुहेरी कारण मिळाले असणार. त्याचमुळे त्यांनी लहान तोंडी मोठा घास घ्यावा त्याप्रमाणे भाजपच्या हिंदुहृदयसम्राटावर टीका केली. वास्तविक मूळ हिंदुहृदयसम्राट हयात असतानाच भाजपने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने त्यांचा स्वतंत्र हिंदुहृदयसम्राट उतरवल्यापासून सेना भाजपवर नाराज होतीच. त्यात आपण १५ हजार गुजरातींना वाचवले असा तर्कदुष्ट दावा करून नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सेनेचा राग ओढवून घेतला. तेव्हा मोदी यांचा समाचार घेताना सेनेने त्यांना चांगलेच खडसावले आणि तुम्ही फक्त गुजरातींचा विचार करून चालणार नाही, याची जाणीव करून दिली. ते एक बरे झाले. कारण मुंबईत सेनेची आणि भाजपची काही मंडळी व्यवसायोपात अपरिहार्यतेमुळे गुजराती बांधकामबंधूंच्या वाटेल त्या अटी कशा मुकाट सहन करतात याचा अनुभव असल्याने ठाकरे यांनी मोदी यांना फटकारले ते चांगलेच झाले. मोदी यांनी आपल्या कृत्याने संकुचित प्रादेशिकवादाचे घृणास्पद प्रदर्शन मांडले असल्याचे सेनेचे म्हणणे असून त्याबद्दलही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. तेही योग्यच झाले. कारण संकुचित प्रादेशिकवादाबाबत मूळचे स्वामित्व हक्क हे सेनेच्या नावावर आहेत. तेव्हा आपल्या हक्काच्या याही क्षेत्रात नरेंद्र मोदी घुसल्याचे पाहून सेना नेत्यांस राग येणे स्वाभाविकच आहे. तेव्हा ही नाराजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून व्यक्त केली. ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्र वगळता सर्वदूर पोहोचत असल्याने ही टीका मोदी यांच्यापर्यंत गेली आणि त्यांनी डोळे वटारले. पूर्वीच्या काळी मूळ सेनाप्रमुख असेच करीत याची आठवण उद्धव यांना यानिमित्ताने झाली असणार. त्यामुळे त्यांनी मोदी क्रुद्ध झाल्या झाल्या आपली भूमिका बदलली आणि या नवनरेंद्राचा अवमान करण्याचा आपला कदापि हेतू नसल्याचे स्पष्ट केले. तेही योग्यच. कारण विद्यमान काळात मोदी यांचा अवमान करण्याची मक्तेदारी भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांच्याकडेच आहे. तो त्यांचा विशेषाधिकार आहे हे उद्धव ठाकरे यांच्या ध्यानात आले. दरम्यानच्या काळात भाजपही संतप्त झाला. त्यांच्या हुकमी एक्क्याच्या उतारीबाबत असा कोणी प्रश्न निर्माण केलेला त्यांना अलीकडे चालत नाही. त्यामुळे त्यांनीही उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. मुदलात भाजपचे दोन्ही गाल सध्या उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंकडून खावे लागत असलेल्या हस्तप्रहरांमुळे बधिर झाले आहेत. त्यात आता उद्धव यांच्या वाक्बाणांची परतफेड करायची संधी मिळाल्यावर भाजप ती सोडणार कसा? त्यामुळे भाजपनेही सेना पक्षप्रमुखांवर शरसंधान केले. त्याच वेळी कृष्णकुंजातील कोपऱ्यात ही गंमत पाहात बसलेल्या राज ठाकरे यांनी ही संधी साधत सेना आणि भाजप या दोघांनाही चार तडाखे दिले. अशा तऱ्हेने नुसता हलकल्लोळच झाला.
परंतु यात अत्यंत महत्त्वाचा असा कोण कोणाचा शत्रू आहे याबाबतच गोंधळ निर्माण झाला. भाजपचे बिलकूल नवेकोरे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मते सेना. भाजप. रिपब्लिकन आणि मनसे यांनी एकत्र येऊन काँग्रेसचा पाडाव करावयास हवा. ‘लोकसत्ता’ व्यासपीठावरून त्यांनी असे सुचवल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी या लक्ष्यपूर्तीसाठी बस. तीनही काफी है असा दावा करीत मनसेच्या सहभागाची शक्यता फेटाळली. त्यावर भाजपचा दुसरा गट म्हणाला, केवळ मनसे काय म्हणून? सेनेबाबतच्या युतीचाही फेरविचार करावयास हवा. तिकडे मनसेप्रमुखांनी भाजपच्या नेत्यांचे खलबतगुपित फोडण्याची धमकी दिली. त्या गुपितांत नितीनभौ गडकरी यांचे खानपान किस्से वा गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली शुक शुक याशिवाय अन्य काहीही असणार नाही याची बिलकूल खात्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याने त्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. वास्तविक ही सर्व मंडळी ज्यांच्याबरोबर राजकीय मधुचंद्राची स्वप्ने पाहात आहेत त्या राज ठाकरे यांचे या प्रस्तावित नातेसंबंधांबाबत मत काय या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यात राज ठाकरे यांची लबाडी ही की आपण बोहल्यावर उभे राहणार की नाही, हे सांगायला ते तयार नाहीत आणि त्याच वेळी भाजप आणि सेनेतील काही ज्येष्ठ मात्र मनसेबरोबरील सहजीवनाची मनोहर स्वप्ने पाहण्यात मश्गूल. यास डोळे जमेल तितके मोठे करून आळा घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी कितीही केला तरी त्याकडे दुर्लक्ष करीत आपला कार्यभाग कसा साधायचा याच्या कोहिनूर शिकवण्या सेनेत अनेकांनी घेतलेल्या असल्यामुळे त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही.
अशा वेळी हे सर्व विरोधी म्हणवून घेणारे पक्ष नक्की कोणाचे विरोधक आहेत याचा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाल्यास साहजिकच म्हणावयास हवे. तो दूर करण्याचा प्रयत्न करताना उद्धव ठाकरे यांनी मुखपत्रातील अग्रलेखाचा राजकीय अर्थ काढू नये, असे सांगून समस्त सैनिकांना विद्यमान महाभारताच्या अन्वयार्थासाठी संजयावरच अवलंबून राहावे लागेल अशी व्यवस्था केली. तेव्हा या वातावरणात पलीकडच्या गोटातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीयांना विरोधकांपासून काहीच धोका वाटत नसेल तर ते साहजिकच म्हणावे लागेल. हा गोंधळ शमेपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आणखी पाच वर्षे आनंदात निघून जातील, याची खात्री त्यांना आहेच. त्यामुळे हे सत्ताधारी तुका म्हणे होय मनाशी संवाद.. असे म्हणू शकतील कारण विरोधक आपुलाची सामना आपणासी.. करण्यातच मग्न आहेत.