‘पन्नाशीचे बडबडगीत’ हे संपादकीय (१९ जून) वाचले. कधी दाक्षिणात्यांच्या विरोधात, कधी उत्तर भारतीयांच्या विरोधात, कधी िहदुत्वाच्या बाजूने, कधी पाश्चिमात्य डेजच्या विरोधात, कधी पाकिस्तानच्या विरोधात, अशा निरनिराळ्या दरडींवर पावले ठेवून शिवसेनेचा आतापर्यंतचा प्रवास झाला आहे.
या सर्व भावना सामान्य मराठी माणसाच्याच होत्या, यात शंका नाही. आणि त्या व्यक्त करणारे नेतृत्व आपल्यासारखीच अघळपघळ (पक्षी: रांगडी, आणि अधेमधे शिवराळही!) भाषा बोलते, हे नावीन्य असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जनता शिवसेनेकडे आकर्षित झाली. पण ही नवलाई अल्पजीवी आहे आणि जनतेला तिच्या (सामान्य) भावनांच्या पलीकडे जाऊन काही ठोस विचार आणि रोजचे जगणे सुसह्य़ होईल, इतपत नागरी/ ग्रामीण जीवनमान द्यायला हवे, हे शिवसेनेने कधीच ध्यानी घेतले नाही. अर्थात, हा विचार तामिळनाडू, आंध्र, बंगाल येथील प्रादेशिक पक्षांनी तरी किती केला, हाही प्रश्नच आहे. मात्र एक खरे की, या अन्य राज्यांतील पक्षांना/ त्यांच्या तद्दन प्रादेशिकवादी वा भाषावादी भूमिकांना केंद्रीय स्तरावर जितके गांभीर्याने घेतले जाते, तितके शिवसेनेला घेतले जात नाही. याचे मूळ कदाचित शिवसेनेच्या नको तितक्या ‘रोखठोक’ आततायीपणामध्ये असावे.
तेव्हा शिवसेनेला आवाज न चढविताही आपले मत स्पष्टपणे आणि मुत्सद्दीपणे मांडता कसे येईल, हे शिकायला हवे. आज पन्नाशीत पदार्पण करताना आणि पुढील मार्गक्रमणा आखताना, शिवसेनेने या सर्वाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
– गुलाब गुडी, मुंबई

पन्नाशीच्या प्रगतिपुस्तकावर लाल रेघच!
‘पन्नाशीचे बडबडगीत’ हा शिवसेनेचे रास्त मूल्यमापन करणारा अग्रलेख (१९ जून) वाचला. अमराठी लोकांकडून मराठी लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेनेने दंड आणि भेदाचा मार्ग स्वीकारला. साम-मार्ग कधीच शिवसेनेच्या संस्कृतीत बसला नाही आणि दामाच्या बाबतीत शिवसेना याच अमराठी समूहावर अवलंबून राहिली. त्यामुळे मराठी अस्मिता चुचकारून एकीकडे मराठी जनांची सहानुभूती (आणि मते!) मिळवायची, पण दुसरीकडे वरवर विरोध करून अमराठी धनको वर्गाकडून आपली (स्वार्थी) धन करून घ्यायची, हेच धोरण शिवसेनेने आपल्या पन्नाशीच्या आयुष्यात आजवर अवलंबले. या सर्वाचाच परिपाक म्हणजे, आज आशा-अपेक्षांचे धुमारे फुटलेला उच्चशिक्षित, उच्चमध्यमवर्गीय आणि या वर्गात जाण्याची आस ठेवणारा मध्यम/ निम्नवर्गीय मराठी माणूस (विशेषत: तरुण वर्ग) याची शिवसेनेबरोबरची नाळ तुटण्यास प्रारंभ झाला आहे.
लघुदृष्टितेचा दोष तर शिवसेना नेतृत्वात सुरुवातीपासूनच होता आणि आहे. त्यामुळेच वडापावच्या गाडीच्या पलीकडच्या उद्यमशीलतेचे स्वप्न साकार करणे तर सोडाच, पण ते स्वप्न पाहायलाही शिवसेनेला जमले नाही. राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना शिव-उद्योग सेना काढून मायकेल जॅक्सनचे कार्यक्रम, इ. बाळलीला केल्या; पण पुढे त्यातूनही जमा शून्य. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनीच खड्डेमय मुंबई पावसाने ठप्प व्हावी, यातच अनेक दशके मुंबई महापालिकेवर सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेची नेतृत्वक्षमता आणि प्रशासकीय पकड किती प्रगल्भ आहे, याची कल्पना येते.
राजकीय पक्षाच्या जीवनचक्रात पन्नाशी गाठली म्हणजे काही निवृत्तीचे वेध लागावेत, असे काही नाही. पण या वयात व्यक्तीप्रमाणेच पक्षानेही काही एक किमान कर्तृत्व गाजविलेले असावे, अशी अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. या बाबतीत शिवसेनेच्या पन्नाशीच्या प्रगतिपुस्तकावर लाल रेघ मारण्याशिवाय पर्याय नाही, हेच खरे.
 – परेश वसंत वैद्य, गिरगाव (मुंबई)

चित्रकाराला विचारतो कोण?
खूप दिवसांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ हे अस्सल मराठी नावाचे नाटक असल्यामुळे ते पाहण्याचा योग जुळवून आणला.
त्यात एक गोष्ट जाणवली- नाटकातील नेपथ्यामध्ये एके ठिकाणी चित्रकार मारिओ मिरांडा यांच्या चित्राचा भिंतभर एक मोठ्ठं ‘म्युरल’ म्हणून केलेला वापर! मी एक चित्ररसिक आणि मारिओ हा माझा आवडता चित्रकार असल्यामुळे नाटकापेक्षा त्या गोव्याच्या भिंतभर चित्रातील पात्रांमध्येच अधिक रंगून गेलो. नेपथ्याच्या अनेक ठिगळांमध्ये हे चित्र म्हणजे भरजरी वस्त्राचा तुकडा वाटला.  मध्यंतरानंतर श्रेयनामावलीच्या उद्घोषणेत मारिओ मिरांडा या चित्रकाराचा कोठेही नामोल्लेख झाला नाही, हे जरा खटकले. मारिओ मिरांडा हा एक नामवंत चित्रकार होता, पण नाटकवाल्यांना त्याचे काय हो?
– दत्तात्रय पाडेकर, अंधेरी (मुंबई)

फक्त प्रश्नांची मांडणी नको, उत्तरेही सांगा
‘आपण काय शिकणार?’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, १३ जून) वाचला. लेखामध्ये अमेरिका तेलक्षेत्रात प्रचंड भांडवल ओतून, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून व ते यशस्वीपणे वापरून कशी स्वयंपूर्ण झाली आणि आपण यातून काय शिकणार, असे विचारले आहे.
प्रश्न असा आहे की, मुळात काहीही करायला लागणारे प्रचंड भांडवल कोठून आणावयाचे व ते असल्यावर भ्रष्टाचारमुक्त कारभार कसा करावयाचा या दोन मूलभूत बाबींवर काही लिहीत नाही किंवा उत्तर शोधून काढत नाही तोपर्यंत पुढील सर्व गोष्टी गौण आहेत.
प्रत्येक वेळी आपण अमेरिका व युरोपशी तुलना करत बसलो तर एक प्रकारची मानसिक दुर्बलता समाजात निर्माण करत आहोत हे लक्षात घ्यावे. स्मार्ट सिटीच्या बाबतीतही आपण असेच लिहिले होते, याचे स्मरण व्हावे. त्या अगोदरच्या एका लेखात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर जेव्हा खाली येतात तेव्हा जास्तीत जास्त तेल विकत घेऊन साठवले पाहिजे, पण आपला देश काही करत नाही असे निरीक्षण आपण नोंदवले होते. पण ती वस्तुस्थिती नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत याचे नियोजन झाले होते. २००५ साली विशाखापट्टणम येथे अंडरग्राऊंड गॅस स्टोरेज व २००७ साली ऑइल स्टोरेज प्रकल्प सुरू झाले होते. गॅस स्टोरेजचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून ऑइल स्टोरेज या महिन्यात होणार आहे. मी स्वत: अंडरग्राऊंड कामाचा तंत्रज्ञ असून वरील कामाचे टेंडर भरले होते. म्हणूनच हे लिहीत आहे.
आपल्याकडे तंत्रज्ञानाचा अभाव नाही. आपण अमेरिकेसारखेच काम करू शकतो. गरज आहे ती स्वच्छ व पुरेसे भांडवल व भ्रष्टाचारमुक्त  सरकारी कारभाराची. या दोन बाबींवर आपण उत्तर शोधले की आपल्या देशाचे जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात. आपण फक्त प्रश्नांची मांडणी करू नका, उत्तरेही सांगा ही अपेक्षा.
– संजय लडगे, बेळगाव