‘मी माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायांना स्मरून शपथ घेतो की, मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन.. पद असो वा नसो, मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेइमानी करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचे आदेश मी कडवट निष्ठेने पाळीन, त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावण्याचे स्वप्न निष्ठेने व शपथपूर्वक पूर्ण करीन.  भगव्या झेंडय़ाची शान राखीन, त्याला कलंक लागेल असे काहीही करणार नाही. मी धगधगत्या निखाऱ्यासारखा जगेन, व त्यावर कधीही राख साचू देणार नाही.  महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना शब्द देऊन प्रतिज्ञा करतो की, महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, शेतकरी व माताभगिनींच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्याचे स्वप्न पूर्ण करेन’.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अशी शपथ घेऊन हजारो शिवसैनिकांनी मनगटावर शिवबंधनाचा धागा बांधला, तेव्हा ‘आता सत्तेचे दिवस दूर नाहीत’ अशी स्वप्ने शिवसेना भवनाला पडली असतील. पण राजकारण बदलते आहे. निरपेक्ष भावनेने काम करावयाचे असेल, तर एखाद्या संघटनेत जावे आणि पदाच्या अपेक्षेने काम करावयाचे असेल, तर सत्तेच्या जवळपास वावरणाऱ्या राजकीय पक्षाला जवळ करावे अशी भावना बळावत चालली आहे. असे असताना, ‘पद असो वा नसो’ भावनेने काम करणारे शिवसैनिक खरोखरीच कायम राहतील का, अशी शंकाही त्या दिवशी कदाचित शिवसेना भवनाला आली असेल. संघटनेच्या सुरुवातीच्या काळात, पदाची अपेक्षा न करता सोबत राहिलेल्या अनेकांकडे अनपेक्षितपणे पदे चालून आली. स्वप्नातदेखील नसताना अनेकांची आयुष्ये बदलून गेली. त्यानंतर मात्र, पदाची जणू मक्तेदारी सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आणि पदाच्या अपेक्षेने काम करणाऱ्यांचेच पेव फुटले. यामुळेच महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची यादी आयत्या वेळी जाहीर झाली. त्यामागेही या वास्तवाचेच कारण असावे. त्यामुळेच, ‘पद असो वा नसो’ अशी अट घालून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देववून सैनिकांना शिवबंधनात अडकविण्याचा प्रयोग झाला असावा.. शिवसेना ही आता संघटना राहिलेली नाही. बघता बघता संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर झाले आहे, आणि आघाडीचे सत्ताकारण पर्व सुरू झाल्यामुळे या पक्षाने राष्ट्रीय राजकारणातही जम बसविला आहे. त्यामुळे, पदाची स्वप्ने पाहातच कुणी या पक्षाच्या राजकारणात राहिले, तर ते विसंगत ठरणारच नाही. उलट, पदांची धुवांधार आमिषे आसपास असतानादेखील पदाची अपेक्षा न ठेवता केवळ एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षासोबत राहण्याची आणि कधीही गद्दारी न करण्याच्या शपथेमध्ये स्वत:ला गुरफटून घेणेच विसंगत ठरले तर त्यात विशेष नाही. शिवबंधन धाग्याची मनगटावरील गाठ सैल होण्याआधीच याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानंतर दोनच दिवसांत मुंबई महापालिकेतील सेना नगरसेविकांच्या मुस्कटदाबीच्या प्रकाराला वाचा फुटली आणि त्यापाठोपाठ शिवबंधनातून मुक्त होण्याची जणू अनेकांना आस लागून राहिली. अन्यायाच्या भावनेने शिवसेनेपासून  दूर गेलेल्या नगरसेविकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. काही ठिकाणी शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरला, काहींनी काँग्रेसची वाट धरली. मोहन रावलेही दुरावले, आणि आता तर शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुका समोर दिसत असताना ‘पदाची अपेक्षा न ठेवता’ संघटनेशी ‘एकनिष्ठ’ राहण्याची अट जाचक ठरू लागली असावी, असा याचा एक अर्थ निघू शकतो. शिवबंधनाचा प्रयोग आखताना नेत्यांनी त्याचा विचार केला असेलच!