‘पाच आजारी सरकारी कंपन्यांना सरकार टाळे लावणार’ या बातमीत (१२ मार्च) कंपन्यांची नावे नाहीत.  मात्र एअर इंडिया या सरकारी कंपनीच्या  गोष्टी धक्कादायक आहेत.
राजकारण्यांसाठी आणि आजी-माजी बाबूंसाठी जनतेच्या पैशांवर चालणाऱ्या या कंपनीची विमानोड्डाणे अनेकदा उशिरा होतात. नवी दिल्ली-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या १३ फेब्रुवारीच्या उड्डाणासाठी हवाईसुंदऱ्या वेळेवर हजरच झाल्या नाहीत. त्यापैकी एक जण दोन तास उशिरा आली. तर दुसरीने   जवळच्या दुबई सेवेची मागणी केली. प्रवासी ताटकळत राहिले. सिडने मेलबर्न दिल्ली ही फ्लाइट (४ ऑक्टो. २०१४) थांबवावी लागली. कारण? टॉयलेट तुंबलेले होते. ते साफ होईतो पायलट वैगरेंची कामाची वेळ संपली होती. म्हणून १४८ प्रवाशांना दुसऱ्या विमान कंपनीमार्फत दिल्लीला पाठवण्यात आले. हा जादा खर्च सर्वसामान्यांच्या करातून गेला. मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी राखीव असलेल्या विमानात बॉम्ब सापडला. सुरक्षा व्यवस्था किती चोख आहे ते यावरून दिसून आले. १७ ऑक्टोबर रोजी पुणे-दिल्ली हे विमान लोहगाव विमानतळावर २४ तास तांत्रिक कारणांमुळे रखडले. १८ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबिया-कोझिकोड या विमानाचे उड्डाण ४० तास रखडले. त्यातील २०० प्रवाशांचे अन्न-पाण्याविना हाल झाले.
अलीकडेच नियमापेक्षा कमी काम केल्याबद्दल चार वैमानिकांच्या पगारातून पैसे कापायची वेळ कंपनीवर आली. वैमानिकांच्या मनमानीवर तर प्रबंध लिहिता येईल. दिल्ली-लंडन हे विमान व्यवस्थित पोहोचले. ते विमान एक तासाने परत दिल्लीकडे निघणार होते (फ्लाइट ११२, ६ जानेवारी), पण पायलट नेमलेला नव्हता. आधीच्या पायलटची डय़ुटी संपलेली होती. मग २०० प्रवाशांना हॉटेलमध्ये राहावे लागले. खर्च अर्थातच कंपनीचा. अगदी अलीकडचा हलगर्जीपणा. दिल्ली-बìमगहॅम विमानाचे उड्डाण झाले. पण लागलीच ते माघारी आणावे लागले. कारण.. ९/११ च्या हल्ल्यानंतर प्रवासी मागे राहिला आणि सामान विमानाबरोबर गेले तर फ्लाइट सोडायची नाही, असा नियम केला आहे. इथे असेच झाले. मुळात विमान उडालेच कसे?
कंपनीचा प्रत्यक्ष तोटा  ७००० कोटींवर गेला आहे. एकूण काय, तर एअर इंडियाचा कारभार सुधारणे शक्य नसल्याने तिला टाळे लावणेच चांगले.

कोकणचा (माजी) राजा झिम्मा खेळण्यास तयार?
‘मालवणी जत्रोत्सव’ हा अन्वयार्थ (१३ मार्च) वाचला. कोकणाच्या राजाला मतदारांनी कोकणातून तडीपार केल्यामुळे आता त्याच्यावर वांद्रय़ाच्या जत्रेतील दशावतारात झिम्मा खेळण्याची वेळ आली आहे. अनेक वष्रे विविध पक्षांच्या वळचणीखाली पोट फुटेपर्यंत लोकांची सेवा केल्यानंतर आणि आपल्या मुलाबाळांकडे तोच वारसा यशस्वीपणे सोपवल्यानंतर आता तरी निवृत्ती मान्य करून आपण कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात बांधलेल्या स्वत:च्या बंगल्यांत आळीपाळीने आराम करावा असे या खऱ्या जातिवंत राजकारण्याला कधीच वाटणार नाही! ‘‘चुकलां ढ्वॉर.. तां धामापूरच्या तळ्यावरच गावनार!’’ याचप्रमाणे ‘‘बचेंगे तो और भी लडेंगे!’’ असे म्हणत सुंभ जळला तरी (मिशीचा) पीळ न सुटणारा हा माजी कोकणसम्राट पक्षश्रेष्ठींकडून आपली किंमत वाजवून घेऊन या दशावतारी खेळात उतरल्याशिवाय राहणार नाही.      
– प्रमोद तावडे, डोंबिवली

जपणूक केलीत, तर  वारसा जरूर सांगा..
ट्रेक इट या पानावर अभिजित बेल्हेकर यांचा परांडा किल्ल्यावरचा लेख वाचला. जवळपास सगळय़ाच किल्ल्यांची दुरवस्था परांडा किल्ल्यासारखीच आहे. इतर वेळी शिवाजी महाराजांवर हक्क सांगणारे व अस्मितांचे राजकारण करणारे राजकारणी व इतरही लोक अशा वेळी कुठे जातात? केवळ तिरस्काराचे विघातक राजकारण करण्यापेक्षा आपला वेळ व शक्ती त्यांनी गडकोटांच्या, ऐतिहासिक वारशाच्या जपणुकीसाठी वापरावी.. त्यानंतर त्यांनी महाराजांचा वारसा जरूर सांगावा.
-अभिजीत पाटील, कोल्हापूर</strong>

आर्थिकदृष्टय़ा मी कोण?
उपनगरीय गाडीतून प्रवास करीत असताना एक तृतीयपंथी भीक मागण्यासाठी आला. मी सुट्टे पसे नाहीत म्हटल्यावर तो दुसरीकडे वळला. त्या ठिकाणच्या दोघा-तिघांनी त्याला प्रत्येकी १० रुपये दिले. त्यावर त्या तृतीयपंथीयाने त्यांना डोक्यावर हात ठेवत शुभाशीर्वाद दिले. येथे सांगण्याची गोष्ट ही की, माझ्याशिवाय त्या तिघांतील एकानेही सुट्टे पसे नसल्याचे कारण सांगितले नाही. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने श्रीमंत! आणि साधारण ३० सेकंदांत ३० रुपये त्या तृतीयपंथीयाने मिळवले म्हणून सेंकदाला एक रुपया मिळवणारा तो तृतीयपंथीयही श्रीमंत! मग राहिलो मीच. आर्थिकदृष्टय़ा मी कोण?
विद्याधर पोखरकर,  ठाणे  

कर्जमाफीची सवय लागणे वाईटच
संसदेत व विधानसभेत आरडाओरडा करून आपणास फक्त शेतकऱ्यांची काळजी आहे,  हे खासदार व आमदार दाखवत आहे. पण एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याने आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला स्वत:च्या कमाईतून मदत केल्याचे ऐकिवात नाही. सर्व खासदार तसेच राज्यातील आमदारांनी आपले एका महिन्याचे वेतन जर दिले असते तरी मोठा निधी उभा राहू शकेल. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांबद्दल आम्हालाही कळवळा आहे, परंतु पीक चांगले आल्यानंतर शेतकरी आनंदाने कर्ज भरत आहे असे वाचण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना सतत कर्जमाफीची सवय लागणे चांगले नाही.  शेतकऱ्यांचे नेते त्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा आपले हित जपण्यात धन्यता मानतात. आता खरी गरज आहे ती सर्वानी मिळून या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची. कारण बेभरवशाचा पाऊस, गारपीट, बदलते हवामान या सर्व समस्या आपल्या देशात ठाण मांडून बसल्या आहेत. देशातील प्रत्येकाने महिन्याला फक्त दहा रुपये बाजूला काढून जमा केले तरी आपण सर्व नसíगक आपत्तींवर तोडगा काढू शकतो. आवश्यकता आहे ती कृती करण्याची.
शीला राऊत, पुणे

महात्मा गांधींवरील टीका अनाठायी
महात्मा गांधींविषयीचे पत्र (लोकमानस, १३ मार्च) वाचले. गांधींविषयीची टीका अनाठायी आणि टीकाकाराचे अज्ञान आणि पूर्वग्रहदूषित वृत्ती प्रकट करणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे करून िहदू धर्म व त्यावर श्रद्धा असणारे गांधीजी यांच्यावर सखोल अभ्यास आणि चिंतन न करता िशतोडे उडवण्याची सवय बहुजन समाजातील स्वत:ला विद्वान समजणाऱ्या काहीजणांना झालेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या महात्म्याला किंवा प्राचीन सहिष्णू धर्माला नावे ठेवून समाजात दरी निर्माण करणे निंदनीय आहे.
– जयंत रा. काकंडीकर, नांदेड</strong>