पारशी , ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम अशा चार धर्मामधील साम्य स्थळे व फरक यांची चर्चा करणारा लेख
आर्यवंशीय झरथ्रुष्ट्राचा धर्म (पारशी लोकांचा धर्म) ज्या देशात निर्माण झाला तो ‘इराण’ आणि इस्लाम जिथे निर्माण झाला तो ‘अरबस्तान’ वगैरे भूभागाला साधारणत: ‘मध्य आशिया’ व त्याच्याही पश्चिमेला असलेल्या इस्रायल, पॅलेस्टाईन जिथे ज्यू व ख्रिस्ती धर्म उगम पावले त्या भूभागाला ‘पश्चिम आशिया’ असे साधारणत: म्हटले जाते. परंतु या संपूर्ण भूभागाला मी सोयीसाठी ‘पश्चिम आशिया’ असे म्हटले आहे. तर झरथ्रुष्ट्राचा धर्म आणि ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम हे तीन सेमिटिक किंवा ‘अब्राहमिक’ (म्हणजे ‘जुना करार’ मानणारे) धर्म, अशा एकूण चार धर्मामधील ‘साम्य स्थळे’ व ‘फरक’, आपण या लेखात थोडक्यात पाहणार आहोत.
ईश्वर – चारही धर्मातील ईश्वर एकेकच (एकमेवच) आहे व सर्वशक्तिमान आहे. पण या चार धर्मातील ईश्वराच्या एकत्वावर व सर्वशक्तिमानत्वावर कमी-अधिक जोर आहे. म्हणजे असे की, पार्शी धर्मात ‘चांगला आणि वाईट’ अशी वेगवेगळी चक्क दोन देवत्वे असून, वाईट देवत्व (अहरिमन= सैतान) चांगल्या देवत्वाला चक्क टक्कर देऊ शकते; पण शेवट विजय अहुरमज्द या देवाचा होणार असतो. नंतर ज्यू धर्मात व पुढे त्यातून ख्रिश्चन धर्मात ‘सैतान’ हे पात्र आले खरे, पण ते पुष्कळ दुबळे होऊन आले व चांगला देव खरा सर्वशक्तिमान बनला. आता या देवाला कुणी आव्हान देऊच शकत नाही. नंतर आलेल्या इस्लाम धर्मात अल्लाच्या एकमेवत्वावर व सर्वशक्तिमानत्वावर इतका भर आहे की, अगदी झाडाचे पान पडायचे असले, तरी ते ईश्वराच्या हुकमानेच पडते. इस्लाममध्ये दुष्ट कर्मासाठी इब्लिस हा सैतान आहे खरा. पण तो ईश्वराचा नोकर आहे. ईश्वराबरोबर कुणाचीही तुलना होऊच शकत नाही.
आत्मा- चारही धर्मात माणसाला अमर आत्मा आहे. पण माणसाचे स्वरूप कमी-अधिक ‘आध्यात्मिक’ आहे. पार्शी, ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम या क्रमाने तुलनेने इस्लाममध्ये मनुष्य सर्वात कमी आध्यात्मिक आहे.
माणसाचे स्थान- दैवी योजनेतील माणसाचे स्थान, पार्शी धर्मात सर्वात महत्त्वाचे, त्याखालोखाल ज्यू व ख्रिश्चन धर्मात आणि सर्वात कमी महत्त्वाचे (आज्ञाधारक सेवकासारखे) इस्लाम धर्मात आहे.
स्वातंत्र्य- चारही धर्मात माणसाला कमी-अधिक स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा क्रम नेमका त्याच्या वर दिलेल्या स्थानाप्रमाणे आहे. इस्लाम धर्मात मनुष्य अल्लाच्या दासाप्रमाणे असल्यामुळे त्याला आचारविचार स्वातंत्र्य सर्वात कमी व शिस्तपालनाचे कर्तव्य सर्वात जास्त आहे.
जगाची निर्मिती- चारही धर्मात जग ईश्वरानेच निर्मिले. ज्यू व ख्रिश्चन धर्माप्रमाणे ‘शून्यातून’ व ‘सहा दिवसांत’. पण पार्शी व इस्लाम धर्मात नेमके कसे व कशातून ते स्पष्ट नाही.
जगाचा शेवट- चारही धर्मात जग ईश्वरावर अवलंबून आहे व त्याला वाटेल तेव्हा तो ते नष्ट करील.
संन्यास- चारही धर्मात संन्यास घेणे वा सर्वसंगपरित्याग करणे ‘अयोग्य’ आहे. फक्त सुरुवातीचा ख्रिश्चन धर्म काहीसा निवृत्तीवादी होता असे म्हणता येईल.
नैतिकता- चारही धर्मात येथील जीवनाच्या नैतिकतेवर पुरेपूर भर आहे.
जन्म- पार्शी धर्मात मनुष्य ‘शुद्ध व निष्पाप’ जन्मतो. ज्यू व ख्रिस्ती धर्मात मनुष्य आरंभीच्या पापांचा (म्हणजे आदमच्या पापांचा) बोजा घेऊन जन्मतो. तर इस्लाममध्ये मानवी जन्म, ईश्वराच्या सेवेसाठीच आहे.
पुनर्जन्म- या चारही धर्मात सध्याचा जन्म हा एकमेव- म्हणजे एकच एक जन्म आहे. कुणालाही दुसरा जन्म, दुसऱ्या जन्माचा चान्स मिळत नाही.
मृत्यूनंतरचे जीवन- या चारही धर्मात माणसाला त्याच्या शरीराच्या मृत्यूनंतर परलोक जीवन आहे व तेच दीर्घ व जास्त महत्त्वाचे आहे.
नरक- ख्रिस्ती व इस्लाम धर्मामध्ये, अखेरच्या निवाडय़ानंतरचा नरक अनंत काळाचा व ‘न संपणारा’ आहे. ज्यू धर्मात वेगवेगळ्या कल्पना असून त्यातील एक कल्पना बारा महिने नरकवास अशी आहे. पार्शी धर्मात नरक थोडा काळ भोगल्यावर जगाच्या अखेरीस ‘अगदी सर्वाना सुखी जीवन आहे.’ अशी शेवटी सर्वाना सुखी जीवनाची गॅरंटी, जगात इतर कुठल्याही धर्मात नाही.
स्वर्ग- या चारही धर्मात ‘स्वर्गप्राप्ती’ हे मानवाचे अंतिम ध्येय आहे. स्वर्ग म्हणजे ईश्वराशी जवळीक. ती कमीअधिक प्रमाणात आहे. पण या चारांपैकी कुठल्याही धर्माने ‘ईश्वराशी एकात्मता’ काही सांगितलेली नाही.
देवदूत- या चारही धर्मात देवाभोवती किंवा त्याच्याबरोबर त्याचे देवदूतही आहेत. अर्थातच त्यांचे आकडे व नावे प्रत्येक धर्मात वेगवेगळी आहेत.
अद्वैत व अवतार- या चारही धर्मात आत्मा व परमात्मा वेगवेगळे आहेत (म्हणजे द्वैत). या चारही धर्मातील ईश्वर, स्वत: मनुष्यरूपात अवतार घेऊन पृथ्वीवर कधीही जन्मत नाही, येत नाही.
सैतान- अहरिमन किंवा सैतान किंवा इब्लिस असा जगभर वावरणारा दुष्टात्मा, दु:खदाता, पार्शी, ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम या चारही धर्मात आहे. असे म्हणता येईल की, खरे तर मानवी दु:खांना, मानवावरील अन्यायाला व त्याच्या दुर्दैवाला, बहुधा त्याचे स्वत:चे मन, त्याचे अज्ञान आणि कधी कधी नैसर्गिक उत्पात (पूर, वादळे, भूकंप, सुनामी इत्यादी) हीच मूळ कारणे असतात. त्यांच्यामुळे रोगराई, दुष्काळ, युद्धे अशा आपत्तीही येऊ शकतात. शिवाय कुठल्याही आपत्तीत, पुण्यशील माणसे व दुर्जन सारखेच भरडले जातात. जगातील या प्रत्यक्ष परिस्थितीमुळे, ईश्वराच्या न्यायबुद्धीविषयी शंका निर्माण होते आणि त्याच्या संपूर्ण चांगुलपणाच्या प्रतिमेला तडा जातो. ईश्वराला या अडचणींतून सोडविण्यासाठी दु:खे, दुष्कर्मे व दुष्टपणा यांचे जनकत्व दुसऱ्या कुणाकडे तरी असावे म्हणून ‘सैतान’ या कल्पनेचा जन्म झाला असावा असे वाटते.
आपण पाहिलेच आहे की, सैतान (अहरिमन) ही कल्पना सर्वप्रथम झरथ्रुष्ट्राने मांडली. त्याने सर्व वाईटाचे कर्तृत्व या अहरिमनकडे दिले. तसेच त्याला ईश्वराचा म्हणजे चांगल्याचा समर्थ विरोधक ठरविला. दोघांचा म्हणजे चांगल्या-वाईटाचा सतत संघर्ष दाखविला व अखेर विजय ईश्वराचा म्हणजे अहुरमज्दचा होईल असे सांगितले. या नव्या कल्पनेने क्रौर्य, दुष्टपणा व अन्याय अशासारख्या आरोपांतून ईश्वर मुक्त झाला. व तो संपूर्ण चांगला ठरला. पण त्यामुळे दुसराच प्रश्न निर्माण झाला. साक्षात् ईश्वराशीही युद्ध करण्याच्या सैतानाच्या कर्तबगारीमुळे, ईश्वराचे सर्वशक्तिमानत्व अडचणीत आले. म्हणून ज्यू धर्माने व पुढील काळात निर्माण झालेल्या ख्रिश्चन व इस्लाम या धर्मानी ही कल्पना स्वीकारताना, ईश्वराचे सामथ्र्य परिपूर्ण करण्यासाठी, राखण्यासाठी, सैतानाच्या सामर्थ्यांत कपात केली. ईश्वर सैतानावर रागावतो, पण त्याला नष्ट करीत नाही. म्हणून जगात दुर्बुद्धी, दुष्कर्मे, अन्याय व दु:खे चालूच राहतात. इस्लाममध्ये तर अल्लानेच सैतानाला त्याचे चाळे कल्पांतापर्यंत चालू ठेवायला परवानगी दिली आहे.
आपण आधीच्या लेखांमध्ये हेही पाहिलेच आहे की, या चार धर्मामध्ये ज्यू धर्म सर्वात प्राचीन, म्हणजे चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. तसेच आपण हेही पाहिले आहे की, ज्यू धर्माच्या जुन्या करारांतील बाराव्या पुस्तकापर्यंत ‘सैतान’ अशी काही कल्पनाच नव्हती आणि त्या वेळी ईश्वरच चांगली आणि वाईट, सुष्ट व दुष्ट अशी सर्व कामे स्वत:च करीत असे. पुढे म्हणजे आजपूर्वी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आर्यवंशीय पार्शी धर्माबरोबर संपर्क आल्यावर मात्र सर्व दु:खे, अन्याय व दुष्टपणाचे कर्तृत्व स्वीकारण्यासाठी ज्यू धर्मात सैतान आला असावा असे दिसते. त्यापुढील धर्मपुस्तकांमध्ये ईश्वराकडे फक्त चांगुलपणाची कामे राहिली. नंतर त्यापुढील काळात निर्माण झालेल्या ख्रिश्चन व इस्लाम धर्माने ही सोईस्कर कल्पना काही बदल करून स्वीकारली असावी असे दिसते. भारतात निर्माण झालेल्या धर्माना मात्र ‘आत्म्याचा पुनर्जन्म’ ही कल्पना मान्य असल्यामुळे आणि म्हणून मानवी जीवनातील अन्याय व दु:ख दुष्टाव्यासाठी ज्याच्या-त्याच्या ‘पूर्वजन्मीचे पाप’ हे स्पष्टीकरण त्यांना उपलब्ध असल्यामुळे, त्यांना अशा प्रकारच्या सैतानाची गरजच नव्हती. भारतीय उगमाच्या सर्व धर्मात ‘सैतान नाही, पण पुनर्जन्म आहे’ आणि पश्चिम आशियात निर्माण झालेल्या सर्व धर्मात ‘पुनर्जन्म नाही, पण सैतान आहे’. याची कारणे ही अशी असावीत. त्यामुळे वास्तवात सैतान नाही, पुनर्जन्मही नाही आणि मुळात ईश्वरही नाही. म्हणजे सर्व मानवरचित, केवळ कल्पना आहेत, सत्य नव्हेत, असे आम्ही विवेकवादी मानतो.
शरद बेडेकर

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Pakistani flight attendants
पाकिस्तानी एअर होस्टेस अचानक देश का सोडतायत? कॅनडामध्ये आश्रय घेण्याची कारणे काय?
secularism in india conception of secularism in indian constitution
संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?