कुंभार, विणकर, लोहार, सुतार,  शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे. समाजातले हे सर्व निर्माते आपले काम विश्लेषक पद्धतीने चोख बजावत असतील, तर समाजात नकळतपणे प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसू लागते, उमगू लागते..
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) सिंधू संस्कृतीवर sam05एक सुंदर माहिती-देखावा आहे. मुद्रा, खेळणी, शिल्पे, भांडी, दागिने, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, नकाशे अशा कित्येक गोष्टींनी तो भरलेला आहे. त्याचसोबत शिक्षक, विद्यार्थी यांना वापरण्यासाठी एक माहिती पुस्तक व सिंधू संस्कृतीतील काही वस्तूंचे नमुने भरलेली पेटीही विकत घेता येते.
सिंधू संस्कृतीप्रमाणेच आधुनिक काळातील इराक, इराण या देशांत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत, तैग्रीस आणि युक्रेटीस् या दोन नद्यांच्या मधल्या भागात! मेसोपोटेमियन संस्कृती असे त्या संस्कृतीला म्हटले जाते. मोहंजोदारो-हडाप्पा-लोथलसारखी शहरे या संस्कृतीतही आहेत..
या दोन्ही संस्कृतींत अतिशय उत्तम दर्जाच्या वस्तू बनवल्या गेल्या, पण आपण आपल्या भूप्रदेशातील सिंधू संस्कृतीवर लक्ष देऊ या. सिंधू संस्कृतीमधील अवशेषात शहरे व त्यातील विविध भागांत अनेक वस्तू सापडल्या आहेत. भांडी, दागिने, शिल्पे, मूर्ती, खेळणी, मुद्रा, वजने, तराजू अशा कित्येक.. या वस्तूंखेरीज घरे, त्यांची रचना, शहराची मांडणी, रस्ते, कालवे, गटारे, तटबंदी, बंदरे, सार्वजनिक पोहण्याचे तलाव.. या सगळ्या गोष्टी बघताना त्यांचे तपशील हे अचंबित करतात. बारीक लक्ष देऊन तयार केलेल्या या वस्तू आहेत. वस्तू केवळ आकाराने लहान म्हणून बारीक लक्ष दिलेय असे नाही, तर मुळातच काम करताना उच्च दर्जा व परिपूर्ण-नीटनेटके, दूरदर्शीपणे कामे करायची इच्छा दिसू लागते.
या गोष्टी पाहताना असा प्रश्न पडतो की, या समाजाला या सर्व गोष्टी कोणी शिकवल्या? ही दृष्टी कुठून प्राप्त झाली? अशा प्रकारची सौंदर्यसमज कशी काय विकसित झाली? त्याची प्रक्रिया काय असेल? आपल्याला प्राचीन संस्कृतीबद्दल त्यातल्या अवशेषांवरून माहिती कळते. त्या अवशेषांचा लागलेला, लावलेला अर्थ जुळत आपल्याला प्राचीन संस्कृतीमधील समाजजीवनाविषयी एक दृष्टी प्राप्त होते. परिणामी आपल्याला आत्तापर्यंत सापडलेल्या अवशेषांवरूनच ही सौंदर्यसमज विकसित होण्याची प्रक्रिया शोधायची आहे.
सिंधू व मेसोपोटेमियन संस्कृतींमध्ये एक समान गोष्ट आहे- वीट, मातीची वीट. विटेचे एवढे काय महत्त्व? विटेची गंमत अशी की, तिला एक प्रमाणबद्धता असते. १:२:४, १ उंची २ रुंदी तेव्हा ४ लांबी अशी प्रमाणबद्धता.. या प्रमाणबद्धतेच्या असंख्य विटा बनवून घरे, रस्ते, शहरे बनली. या प्रकारच्या विटा मजबूत असतात, त्यांची रचनाभिंत मजबूत होते.
मुद्दा विटेचा नाही, तर प्रमाणबद्धतेचा आहे. शेणाच्या गोवऱ्या करणे, मातीने भिंत लिंपणे, हाताने थापून भांडे बनवणे व हळूहळू चालविणाऱ्या मातीला हाताचा पंजा, बोटे यांचे वेगवेगळे भाग वापरून आतून-बाहेरून आकार देणे, त्यांना वाळवून-भाजून भांडी बनवणाऱ्या कुंभाराला व विटा रचून बांधकाम करणाऱ्या गवंडय़ालाही प्रमाणबद्धता सर्वप्रथम उमगली का?हे सर्व लोक आज जे डिझायनर म्हणून मिरवतात तसे होते का? म्हणून त्यांना या गोष्टी कळल्या का? माहीत नाही! पण हे लोक शेतकरी, कुंभार, शिल्पकार, मूर्तिकार, लोहार, सुतार, चांभार, विणकर, गवंडी, पाथरवट, बोटी बनवणारे इत्यादी असणार. समाजातले निर्माते.. ज्यांनी बनवलेल्या वस्तू समाज वापरतो. या सर्व लोकांच्या कामाकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, या सर्व कामांत, उद्योगांत, तंत्रात निसर्गाचा कुठचा ना कुठचा घटक अवलंबून असतो. त्यावर हे काम अवलंबून असते.
शेती तर पूर्णपणे निसर्ग घटकांवर अवलंबून आहे, पण कुंभाराकडे पाहा. विचारा त्याला त्याच्या कामाबद्दल. सगळं सांगेल. माती कुठून आणायची, ती कशी मिळवायची, ती कशी हवी, तिला कसे चाळून घ्यायचे, किती दिवस भिजवायचे, कुजवायचे, मातीत इतर प्रकारची माती मिसळून कसे मिश्रण बनवायचे. इतके सगळे करून होते काय- फक्त भांडी बनवायला माती तयार होते. त्यानंतर भांडी बनवणे, सुकवणे, भाजणे, झिलई इत्यादी..
हे सगळे ऐकले की लक्षात येते की, कुंभार किती मातीमय झालाय! तो माती-पाणी-उष्णता-वारा आदींविषयी किती संवेदनशील आहे. हे घटक त्याच्या कामावर किती परिणाम करतात हे त्याला ठाऊक आहे. परिणामी कुंभाराचे दैनंदिन जीवन, दिनक्रम, त्याची शिस्त हे सर्व या निसर्ग घटकांवर अवलंबून, कामाच्या बारकाव्यांवर अवलंबून!
जी गोष्ट कुंभाराची तीच विणकर, लोहार, सुतार, सोनार, चांभार, शिल्पकार, मूर्तिकार, पाथरवट इत्यादींची.. सर्व जण निसर्गचक्रावर आधारित.. त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे. परिणामी दिनचर्या, जीवनक्रम हा निसर्गचक्राशी अगदी अतूटपणे जुळून गेलेला.
समाजातल्या या निर्मात्यांचा स्वत:च्या कामाविषयीचा, निसर्गाविषयीचा दृष्टिकोन, त्यासंबंधातली शिस्त, संवेदनशीलता यामुळे एक प्रकारचे महत्त्व, मूल्य प्राप्त होते. समाजातले सर्व निर्माते अशाच प्रकारे आपले काम विश्लेषक पद्धतीने चोख बजावत असतील, तर समाजात नकळतपणे प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसू लागते, उमगू लागते, कारण समाजातील सर्व निर्मितीत प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसू लागते. परिणामी सिंधू संस्कृतीत केवळ वीट नाही; पुरुषांची कबन्ध मूर्ती, बैलाची प्रतिमा असलेली मुद्रा, मूर्त्यां, दागिने, भांडी, घरांचा आकार, शहराची रचना, सगळीकडे ही प्रमाणबद्धतेची सौंदर्यसमज दिसते. विटेसारख्या एका छोटय़ा घटकापासून ते संपूर्ण शहराची मांडणी, विभागणी.. सगळीकडे सौंदर्यसमज व्यापून आहे.
या वस्तूंपलीकडे गेले की हळूहळू आकडय़ांच्या चलनावर आधारित सारिपाटासारखे खेळ, मोजपट्टय़ा, तराजू व वजने, अशी विविध व्यवहार पद्धतींची प्रमाणे, मापे ठरवण्यासाठी, मोजण्यासाठीची साधने समोर येतात. सौंदर्यसमज, प्रमाणबद्धता या केवळ अमूर्त गोष्टी नाहीत हे स्पष्ट होते.
इथे हे लक्षात घ्यायला हवे की, आपण वस्तूचे सौंदर्य हे केवळ त्याच्या बनण्या-बनवण्यापुरते मर्यादित न करता, त्याच्या मापांवर अवलंबून न ठेवता जीवनविषयक समग्र दृष्टिकोनाशी त्याला जोडतोय. समग्र वृत्तीतून-दृष्टीतून ती सौंदर्यसमज उमगते असे म्हणतोय.
जाता जाता आपण बैलाची प्रतिमा असलेली मुद्रा पाहू या.. एका छोटय़ा रबर स्टॅम्पच्या आकाराची. त्यावर हा बैल कोरलेला. बैल बघा, महाराष्ट्रातल्या लोकांना कृष्णाकाठच्या बैलांची आठवण होईल! मस्त उंच, मोठी बाक असलेली शिंगे, भरदार वशिंड, मजबूत पाय, मानेखालील सैल कातडी, असा बैल चालायला लागला की, मस्त झोकात, तोऱ्यात एकतालात चालणार. हा बैल गाडीवर, शेतात जीवनाचा एक महत्त्वाचा भाग. त्याला रोज पाहिले, त्याच्यासोबत जगणे झाले, की त्याच्या आकारातली लय, जोम कळतो, जाणवतो, ते चित्रित करता येते. बहुतेक आपल्यापैकी लोक प्राणी-पक्ष्यांची चित्रे रंगवत नाहीत. याचे कारण आपल्या जीवनाचा ते भागच नाहीत. अनुभवाचा भाग नाहीत. मग चित्रे कशी येतील काढता. खूप प्रयत्न करून फोटोंवरून काढता येतील! पण त्यामुळे सौंदर्यसमज कधीच निर्माण होणार नाही. सिंधू संस्कृतीतल्या कलाकाराचे मात्र आपल्यासारखे नाही. त्याच्या जीवनशैलीतून, त्याविषयीच्या समग्रवृत्तीतून सौंदर्यसमज विकसित झाली आहे. प्रत्येक निर्मितीतून ती ओसंडून वाहते.
*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.