12 December 2017

News Flash

कलेचा सांगाडा आणि आत्मा

मोनालिसा हे लिओनादरे दा विन्चीचे चित्र सर्वाना माहीत असते, अनेकांना प्रिय असते. हेच एक

मुंबई | Updated: December 15, 2012 2:07 AM

मोनालिसा हे लिओनादरे दा विन्चीचे चित्र सर्वाना माहीत असते, अनेकांना प्रिय असते. हेच एक चित्र श्रेष्ठ मानण्याचे काही कारण नसूनसुद्धा कलेतिहासाची खूणगाठ त्या चित्राशी बांधली जाते आणि कलास्वादाचे गूढगुंजन या चित्रातील स्मितापाशी रुंजी घालते. चित्राची चौकट ओलांडून एखाद्या चित्राची चर्चा वर्षांनुवर्षे, दशकानुदशके सुरूच राहावी, त्यातून चित्र बिचारे बाजूलाच आणि चर्चा करणाऱ्यांचे नैतिक आग्रह वा दुराग्रहच अधिक स्पष्ट होत जावेत, असेही प्राक्तन या चित्राच्या वाटय़ाला आले आहे. कलेची सांगड कशाकशाशी घालायची, याला मोनालिसाने काही धरबंध ठेवला नाही.. या चित्रात ‘स्फुमॅटो’ तंत्राने रंगवल्यामुळे धूसर होत जाणारे दूरचे निसर्गदृश्य प्रत्यक्षातही तसेच भासत असेल, तर या भासामागे कोणती शास्त्रीय कारणे असतात, याचा वेध वैज्ञानिकांना घ्यावासा वाटला. गरोदर स्त्रीचे मंदस्मित मोनालिसासारखेच असते, असे काही तज्ज्ञांनी म्हटले, तर चित्रकलेची तांत्रिक अंगे महत्त्वाची मानणाऱ्यांनी लिओनादरेच्या रंगतंत्रालाच या स्मिताचे सारे श्रेय दिले. इतिहासकारांनी लिओनादरेचा काळ मोनालिसाच्या चित्राला केंद्रस्थानी ठेवून अभ्यासला आणि त्यातून लिओनादरेचे उभयान्वयी लैंगिक चरित्र उघडकीस आणले. त्यामुळे मोनालिसा हे लिओनादरेचेच स्त्रीरूप असे मानले जाऊ लागलेच, पण भलतीच नैतिक चर्चा रंगू लागली. या भलत्या संशोधनाच्या काही वर्षे आधीच, मार्सेल द्युशाँ या दृश्यकलावंताने मोनालिसाच्या छापील पोस्टकार्डावर मिशा चितारल्या आणि हे मिशाळ पोस्टकार्ड म्हणजे कलेतील बंडखोरीचे एक प्रतीक मानले जाऊ लागले. मोनालिसा ही लिसा नावाची स्त्रीच होती, ती उमराव घराण्यातील होती आणि लिओनादरेचे तिच्यावर अव्यक्त प्रेमही असावे, असे अनेक इतिहासकार सांगत; त्याकडे दुर्लक्ष होत होते. गेल्या सप्टेंबरात मात्र हे चित्र जिचे असल्याचे मानले जाते त्या लिसा गेरार्डिनी हिचा सांगाडाच फ्लोरेन्समध्ये सापडल्याची बातमी आली आणि सरत्या वर्षांत एकंदर कला-संस्कृती-इतिहास या क्षेत्रांतील ती महत्त्वाची घडामोड ठरणार, असे संकेत आहेत. लिसाचे लग्न १४९५ साली झाले, त्यानंतर १५०७ पर्यंत तिला चार मुले झाली आणि लिओनादरेने मोनालिसा हे चित्र १५०३ ते १५०६ दरम्यान कधी तरी केले. लिसाचा सांगाडा सापडल्याने तिच्या दातांची, जबडय़ाची ठेवण तपासता येणार आहे आणि तिचे स्मित असेच होते का, याचाही छडा लागणार आहे. अर्थात, त्यासाठी आणखी थांबावे लागेल. सध्या तरी हा सांगाडा त्या लिसाचाच आहे का, याचीच शहानिशा सुरू आहे. हे सारे का करावे, एखाद्याच चित्राचे महत्त्व इतके का वाढावे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. इतिहास आणि वर्तमान यांची सांगड कशी घालायची, हा त्यामागचा मूळ प्रश्न निरनिराळय़ा संदर्भात समोर येत असतो. संशोधकांना इतिहासाचे किंवा आजच्या घटनेमागील कालातीत वैज्ञानिक सत्यांचे आकलन महत्त्वाचे वाटत असते. सामान्यजनांपर्यंत या आकलनाचे सार पोहोचले तरी, त्या आकलनामागची तटस्थता आणि अभ्यासू वृत्ती यांची अपेक्षा सामान्यजनांकडून करता येणार नसते. मग कलेबद्दल इतिहास वा विज्ञानाने शोधलेल्या तथ्यांच्या आधारे भलभलत्या चर्चा रंगू लागतात आणि कलेच्या सांगाडय़ातून तिचा आत्मा निघून जातो.
तंत्रच पाहायचे, इतिहास किंवा विज्ञानच पाहायचे आणि चित्राबद्दल माहिती मिळाली असे मानायचे, हा मार्ग चित्राकडे न नेता इतिहासाकडे, विज्ञानाकडे वा तंत्राकडेच अधिक नेतो. हे केवळ मोनालिसाच्या बाबतीत सामान्यजनांचे झाले वा होणार आहे असे नाही. आशयापेक्षा तंत्रावर विसंबणाऱ्या सामान्य चित्रकारांचेही असेच होत असते. याबद्दल त्यांना दोष देण्याचेही काही कारण नाही.. प्रचलित शिक्षणपद्धतीवर विसंबून राहून काम केले की कुठल्याही क्षेत्रात असेच होणार असते. त्यातच आयते हाती असलेले तंत्रशुद्धतेचे भांडवल सोडून मध्यंतरी भारतीय चित्रकार नवकलेकडे वळले आणि तेथेही जे यशस्वी झाले त्याची नक्कल करण्यात धन्यता मानू लागले, तेव्हा पुन्हा सांगाडाच उरला आणि आत्मा निघून गेला.
याच्या अगदी उलट पद्धत सध्याचे म्हणजे समकालीन चित्रकार वापरत आहेत आणि तिचे स्वागत करायला हवे. ते आता चित्रकार उरलेले नसून दृश्यकलावंत झालेले आहेत, कारण कलेचा आत्मा टिकवण्यासाठी चित्राच्या तंत्राशीच एकनिष्ठ राहण्यात हशील नाही, हे त्यांना समजलेले आहे. समाजात किंवा आसपासच्या टापूत जे दिसते आहे, तेथूनच हे दृश्यकलावंत सुरुवात करतात आणि सामान्यजनांना जे रोज दिसते, त्याचा निराळा कलानुभव घेण्यास प्रवृत्त करतात. केरळात कोची येथे भारतातील जे पहिलेच ‘बिएनाले’ म्हणजे द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय महाप्रदर्शन सुरू झाले, तेथे कलेचा आत्मा पुन्हा शोधण्यासाठी कलावंत काय काय करताहेत, याची प्रचीती येत्या मार्चपर्यंत येत राहणार आहे. भावनांना महत्त्व देणे म्हणजे भावनिक होणे नव्हे, तर भावनांचा वापर विचारांचा- बुद्धीचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी करून घेणे.. केवळ समोर आहे त्याची नव्हे, तर स्वत:चीही प्रचीती घेणे. आत्मा असलेली कलाकृती असा प्रत्यय आपल्याला देतच असते. कोचीतही त्यापेक्षा निराळे काही होणार नाही, पण हा जो मानव्यप्रवर्तक कलानुभव आहे, तो घेण्याची प्रत्येकाची क्षमता निरनिराळी असणार हे लक्षात घेतले तर, बिएनालेसारखी महाप्रदर्शने नेहमीच विविध अनुभवक्षमतांच्या प्रेक्षकांना आवाहन करत असतात. एकटय़ा ओरिसा राज्यात तांदळाच्या २९६ जाती आहेत आणि त्यापैकी अनेक जाती आता व्यापारीकरणाने नामशेष होणार आहेत, शिवाय तांदूळ  पिकवणारे शेतकरीही नव्या जातींमुळे कंगालीकडे जाऊन जमिनी विकत आहेत, ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी अमर कन्वर यांनी या सर्व जातींचे वाण कोचीच्या महाप्रदर्शनात प्रेक्षकांसमोर ठेवले. सोबतच्या व्हिडीओ कलाकृतीतून तांदळाच्या शेतात दगडविटांचा भराव घातला जात असताना पाहणे प्रेक्षकांना भाग पाडले. कोचीनमध्ये आलेल्या यहुदींना तत्कालीन राजाने ७२ सवलती दिल्या, त्यांचे महत्त्व आता जुन्या ताम्रपटाइतकेच उरले असून हल्लीच्या काळात त्यांचा त्याग करणेच बरे, हे मूळचा बगदादी ज्यू असलेल्या जोसेफ सेमा या ज्येष्ठ कलावंताच्या लक्षात आले आणि इतरांच्याही लक्षात आणून देण्यासाठी त्याने ७२ ताम्रपटांची कलाकृती करतानाच, या सवलती एकेका शब्दात कागदाच्या कपटय़ांवर लिहून ते कपटे ७२ कलाविद्यार्थ्यांना सर्वासमक्ष जाळावयास लावले. कागद जाळण्याच्या त्या साध्या कृतीला तंत्राचे कोंदण नव्हते. त्यात रंगरेषा नव्हत्या आणि रूपही नव्हतेच. त्यामुळे चित्रकलेच्या सांगाडय़ात ही कृती बसणारच नाही; परंतु कोचीन ज्यूंची सद्यस्थिती एका हॉलंडवासी बगदादी ज्यू कलावंताने जाणावी, भिंतीवरल्या ७२ चौकटींतील कोलाज चित्रांसोबतच ७२ ताम्रपट दाखवून त्या सवलती नष्ट करण्याची कृती त्याने घडवावी आणि जुन्या सवलतींना चिकटून राहू नका हे राजकीय-सामाजिक सत्यही मांडावे, हे सारे कलेच्या सांगाडय़ात बसत नसले, तरी आत्म्यात नक्की बसते. कलेने माणसाला विश्वासकट स्वतकडे पाहायला न शिकवता- म्हणजेच शिव-सत्याचा प्रत्यय न देता आधी निव्वळ सौंदर्याचा प्रभाव पाडणे, हा रूढ मार्ग झाला. त्याऐवजी प्रसंगी सौंदर्याऐवजी शिव-सत्याशी स्वतचे व प्रेक्षकांचे डोळे भिडवण्याची हिंमत आजचे दृश्यकलावंत करताहेत, हे अभिनंदनास्पद आहे.
मोनालिसावर प्रेम करताना कोची बिएनालेसारखी बिनव्यापारी महाप्रदर्शनेही महत्त्वाची ठरतात, ती सांगाडय़ाइतकाच आत्माही महत्त्वाचा असल्यामुळे. संशोधनाचा मार्ग सांगाडय़ापाशी पोहोचला तरी ते त्याचे काम असते. प्रेक्षकाने, रसिकाने मात्र कलेतून आपल्याला काय मिळाले आणि मिळत राहणार हे शोधायचे असते, त्यासाठी कलेचा सांगाडा पुरेसा नसून आत्माही महत्त्वाचा असतो.. तो जाणला की कलेचे सौंदर्य प्रेक्षकांत उतरते.

First Published on December 15, 2012 2:07 am

Web Title: skeleton of art and soul