13 December 2017

News Flash

भ्रष्टाचाराचा ‘स्मॉग’

राजधानी दिल्लीचे अवघे भवताल प्रदूषणाने व्यापले आहे. थंडीची चाहूल आकाशावर पसरलेल्या स्मॉगने लागावी हे

सुनील चावके-sunil.chawake@expressindia.com | Updated: November 12, 2012 12:21 PM

ही अर्थात, येथल्या भ्रष्टाचाराची अन् नेतृत्वाच्या बेपर्वाईची परिणती आहे. राजधानीवर दाटलेले प्रदूषणाचे धुके दिल्ली आणि आसपासच्या आर्थिक व नैसर्गिकदृष्टय़ा संपन्न परिसरात अव्याहत चालणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचे भान अजूनही कोणाला आलेले नाही..
देशाच्या राष्ट्रपतिपदावरून पदमुक्त झालेल्या प्रतिभाताई पाटील यांना पुण्यातील नागरिक आणि स्वयंसेवी संघटनांच्या ‘सौजन्या’ने दिल्लीतील सरकारी बंगल्यामध्येच वास्तव्य करणे भाग पडले. दिल्लीचे प्रतिकूल आणि प्रदूषित हवामान प्रतिभाताईंना अजिबात मानवत नाही. निवृत्तीनंतर त्यांना दिल्लीऐवजी पुण्यात स्थायिक व्हायचे होते. पण सरकारी बंगल्याच्या भूखंडावरून वाद उद्भवल्याने त्यांना पुण्याला मुक्कामाचा बेत पुढे ढकलावा लागला. ३४० खोल्यांच्या विस्तीर्ण राष्ट्रपती भवनातून ल्युटेन्स दिल्लीतील तुघलक लेनमध्ये तीन बेडरूमच्या एका छोटय़ाशा बंगल्यात त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली. २९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १७ नव्या सहकाऱ्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडत असताना दिल्लीच्या बिघडलेल्या हवामानाचा फटका बसल्याने प्रतिभाताई पाटील लष्कराच्या इस्पितळात उपचार घेत होत्या!
सव्वातीनशे एकरांवर वसलेल्या, बाह्य वातावरण आणि बाह्य विश्वापासून बऱ्यापैकी अलिप्त असलेल्या राष्ट्रपती भवनात पाच वर्षे व्यतित केल्यानंतर प्रतिभाताईंना दिल्लीच्या वायुप्रदूषणाने गाठलेल्या भयावह वास्तवाचा अंदाज प्रथमच आला असेल. रुग्णालयातून उपचार घेऊन प्रतिभाताई परतल्यानंतर दिल्लीच्या आसमंतावर दाटलेल्या मानवनिर्मित प्रदूषणाचा थर आणखीच गडद झाला. तमाम शासकीय सुविधा सदैव दिमतीला असलेल्या प्रतिभाताई जर या प्रदूषणापुढे हतबल ठरत असतील, तर दिल्ली व आसपासच्या परिसरात राहणाऱ्या कोटय़वधी सर्वसामान्यांची अवस्था काय होत असेल याची कल्पना सहज करता येईल.
थंडीचे ऑक्टोबर महिन्यातील मुदतपूर्व आगमन आणि वाहत्या वाऱ्याचा अभाव यामुळे हवेतील सूक्ष्म प्रदूषित कण आणि एअरोसोलमुळे धुके गडद होण्यास चांगलाच हातभार लागला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी धानाच्या शेतांमधील उरलेला कोंडा पेटवून दिल्यामुळे धुराचीही त्यात भर पडल्याचे नासाच्या उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले. हवेतील १० मायक्रॉन आणि २५ मायक्रॉन व्यासाच्या सूक्ष्म प्रदूषित कणांच्या प्रमाणाने धोक्याची पातळी तब्बल पाच ते दहा पटींनी ओलांडल्याचे निष्पन्न झाले. दिल्लीवर ओढवलेल्या या प्रदूषण संकटाचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयर्नमेंटने केलेल्या विश्लेषणानुसार केवळ हवेतील प्रदूषित कणच नव्हे तर नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन आणि बेन्झीनच्या स्तरातही धोकादायक वाढ झाली. हवेतील प्रदूषित कणांच्या सान्निध्यात आल्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढते, अस्थमा, फुप्फुसाचे विकार, श्वासनलिकेला सूज येण्याचे प्रकार तसेच दीर्घकाळ अशा वातावरणात राहिल्याने फुफ्फुसाचा कर्करोगही होण्याची दाट शक्यता असते. हवेत प्रचंड प्रमाणातील नायट्रोजन डायऑक्साईडमुळे धडधाकट व्यक्तींनाही श्वसनाचा गंभीर त्रास जाणवू लागतो आणि अर्भकांचा आकस्मिक मृत्यू ओढवतो. नायट्रोजन डायऑक्साईडच्या सूर्यप्रकाशात हवेतील काही रासायनिक कणांच्या संपर्कातून निर्माण होणाऱ्या ओझोनचे संकटही दिल्लीवर घोंघावू लागले आहे. हवेच्या प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. पण दिल्ली तसेच आसपासच्या गुरगाव, नोईडा, ग्रेट गाझियाबाद, फरिदाबाद, सोनीपत, पानिपत, रोहतक, मेरठ, अल्वर, बुलंद शहर, बागपत आदी शहरांतील रहिवाशांमध्ये हृदयगतीतील चढउतार, फुफ्फुसाचा त्रास, अस्थमा, डोळे चुरचुरणे, धाप लागणे, श्वास कोंडण्याचे आणि गुदमरल्यासारखे वाटण्याचे प्रकार वाढले. गडद धुक्याने आठवडाभर मुक्काम ठोकल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यात दिवाळीत एका रात्रीत उडविल्या जाणाऱ्या हजारो कोटींच्या फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडणार आहे.
अकरा वर्षांपूर्वी दिल्लीतील वायुप्रदूषणाची भयावह स्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्व सार्वजनिक वाहनांना सीएनजी इंधनावर चालविण्याचे आदेश दिले. त्यामुळे दिल्लीला काही वर्षे मोकळा श्वास घेणे शक्य झाले. पण हे समाधान अल्पजिवी ठरले. रोज २५ लाख प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मेट्रो रेल्वेलाही दिल्लीच्या हवेतील तजेला कायम राखता आलेला नाही. सीएनजीवर चालणाऱ्या बसेस, ऑटोरिक्षा आणि खासगी गाडय़ांमुळे प्रदूषणमुक्त झालेली स्थिती पुन्हा पूर्वपदावर येऊन पोहोचली आहे.
महाघोटाळे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यकर्त्यांमुळे दिल्लीची जगभर बदनामी झाली. आता वायुप्रदूषणामुळे बदनाम झालेल्या जगातील अव्वल शहरांमध्ये पुन्हा स्थान पटकावण्यासाठी दिल्ली सरसावली आहे. वायुप्रदूषणातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म कण धुक्याच्या संपर्कात येऊन दिल्लीच्या आकाशावर जमणारे फॉग आणि स्मोक यांचे मिश्रण म्हणजे स्मॉग दिल्लीसाठी नवे नाही. दिल्लीत दरवर्षी हिवाळ्यात हे चित्र हमखास बघायला मिळते, असे म्हणून दिल्लीवर नव्याने ओढवलेल्या संकटाला कमी लेखणे कुणालाही परवडणार नाही. दिल्लीवर दरवर्षी हिवाळ्यात ओढवणारी ही दैवी आपत्ती आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करणे राज्यकर्त्यांना परवडणार नाही. खरे तर दिल्लीच्या आसमंतात दाटलेला स्मॉग हा त्यांच्या भ्रष्टाचाराचाच गडद पुरावा ठरला आहे. पर्यावरणाच्या विनाशाची तमा न बाळगता भ्रष्ट मार्गाने वेगवान आर्थिक विकासाचा ‘ध्यास’ घेणाऱ्या राजकीय नेतृत्वाची बेपर्वाई सध्या दिल्लीच्या आकाशात त्यांच्यासह सर्वाचाच काळ बनून तरंगते आहे. राजकीय वरदहस्तामुळे प्रदूषण नियंत्रणाचे सारे नियम व कायदे धाब्यावर बसवून भ्रष्ट मार्गाने चालणाऱ्या दिल्ली, नोईडा, गाझियाबाद, फरिदाबादमधील कारखाने वेगवान विकास साधताना वायुप्रदूषणात मोठी भर घालत आहेत. गेल्या सहा-सात वर्षांपासून दिल्लीत दररोज सरासरी अकराशे खासगी वा सार्वजनिक वाहनांची भर पडत आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या अन्य तीन महानगरांतील एकूण वाहनांपेक्षाही अधिक वाहने दिल्लीच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणावर हवेचे प्रदूषण करीत अहोरात्र धावत आहेत. आज दिल्लीतील एकूण वाहनांची संख्या ७५ ते ८० लाखांच्या घरात आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांपेक्षा अधिक खासगी गाडय़ा एकटय़ा दिल्लीत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासात काढण्यात आला आहे. पावणेदोन कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत देशातील सुमारे २० टक्के कार असल्याचे मानले जाते. पंधराशे चौरस किमी क्षेत्रफळाच्या दिल्लीतील जवळपास पावणेदोनशे चौरस किमी म्हणजे मुंबईच्या क्षेत्रफळाचा एकतृतीयांश भाग केवळ पार्किंगनेच व्यापून टाकला आहे. केवळ स्टार्ट होण्यासाठी लिटरभर डिझेल पिणाऱ्या अतिश्रीमंतांच्या कोटय़वधी रुपयांच्या आलिशान गाडय़ांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. शिवाय गुरगाव, नोईडा, ग्रेट गाझियाबाद, फरिदाबाद, सोनीपत, पानिपत, रोहतक, मेरठ, अल्वर, बुलंद शहर, बागपत अशा ३३ हजार चौरस किमी क्षेत्रफळाच्या राष्ट्रीय राजधानी परिसरातील बारा शहरांतून दररोज लाखो वाहनांचे लोंढे दिल्लीत अखंडपणे शिरत असतात. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात होणाऱ्या वायुप्रदूषणात वाहनांचा वाटा २५ ते ३० टक्क्यांचा असल्याचे मानले जाते. रस्त्यांवर उतरणाऱ्या वाहनांचा लोंढा एवढा जबरदस्त असतो की तीन व चारपदरी रस्ते बांधूनही वाहतूक तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही. एखाद्या व्हीआयपीची तब्येत बिघडली तर नशीब बलवत्तर असेल तरच त्याला तुंबलेल्या वाहतुकीतून मार्ग काढत वेळेत इस्पितळात पोहोचविणे शक्य होते. अर्थात, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींसह तमाम केंद्रीय मंत्र्यांसाठी वाहतूक रोखून मार्ग प्रशस्त करण्याचा पर्याय असल्यामुळे अशा ज्वलंत समस्येला त्यांना सामोरे जावे लागत नाही. हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीतील दृश्यमानता चांगलीच प्रभावित झाली आहे. पण सदैव सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात असलेले मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि त्यांच्या व्हीव्हीआयपी सहकाऱ्यांना क्षीण होणाऱ्या दृश्यमानतेशी तसे काहीच देणेघेणे नाही. कारण दृश्यमानतेशी जुळवून घेण्याची डोकेदुखी प्रामुख्याने त्यांचे कारचालक आणि वैमानिकांची असते.
तरीही हवेच्या प्रदूषणाची झळ त्यांनाही बसते. आजकाल सकाळी उठून मॉर्निग वॉकला जाणारे राज्यकर्ते वायुमंडलात भारलेल्या विषकणांमुळे कासावीस होऊ लागले आहेत. हिवाळ्यात होणारा दम्याचा त्रास सोनिया गांधींना नवा नाही. वारंवार बायपास होऊन हृदय क्षीण झालेल्या नेत्यांसाठी दिल्लीचे सध्याचे हवामान पोषक नव्हे तर घातकच ठरणारे आहे. दिल्लीच्या वायुप्रदूषणावर गेल्या बारा वर्षांपासून देखरेख ठेवणारे सर्वोच्च न्यायालय दिल्लीत प्रदूषणाचे सर्वात मोठे आगर मानल्या जाणाऱ्या आयटीओच्या शेजारीच असल्यामुळे न्यायदानाच्या महत्त्वपूर्ण कामात गुंतलेल्यांचाही श्वास विषारी वायूमुळे कोंडला जात आहे. त्यामुळे या हवामान बदलाची सर्वोच्च न्यायालयानेही तत्परतेने दखल घेत ठोस पावले उचलण्याची तयारी चालविली आहे. दिल्लीची हवा अशीच बदनाम होत राहिली तर ‘संघर्षग्रस्त’ जम्मू आणि काश्मीरप्रमाणे अमेरिकन नागरिकांनी दिल्लीचीही वारी टाळावी, अशी सूचना देण्याची वेळ अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यावर येऊ शकते. मात्र, दिल्लीत राहणाऱ्या देशातील तमाम बडय़ा नेत्यांनी या संकटाची अजूनही पुरेशा गांभीर्याने दखल घेतलेली नाही. देशाच्या राजधानीवर दाटलेले प्रदूषणाचे धुके हे दिल्ली आणि आसपासच्या आर्थिक व नैसर्गिकदृष्टय़ा संपन्न परिसरात अव्याहत चालणाऱ्या भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरले आहे, याचे भान त्यांना अजूनही आलेले नाही.

First Published on November 12, 2012 12:21 pm

Web Title: smog of corruption