X

आत्म्याचे अस्तित्व (?)

मानव- विजयआपली जीवनप्रक्रिया आणि मेंदू व मनबुद्धी (म्हणजे जाणिवा, संवेदना, व्यक्तिमत्त्व वगैरे) यांची कार्ये चालविण्यासाठी आपल्या शरीरात कुणी आत्मा असण्याची व मृत्यूनंतर तो निघून कुठे तरी जाण्याची काही गरज नाही.

मानव- विजयआपली जीवनप्रक्रिया आणि मेंदू व मनबुद्धी (म्हणजे जाणिवा, संवेदना, व्यक्तिमत्त्व वगैरे) यांची कार्ये चालविण्यासाठी आपल्या शरीरात कुणी आत्मा असण्याची व मृत्यूनंतर तो निघून कुठे तरी जाण्याची काही गरज नाही. आपले ‘जिवंत असणे’ हा आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही..

मागील दोन लेखांत आपण हे पाहिले की १) काही विशिष्ट निर्जीव मूलद्रव्यांच्या अणूरेणूंवर अतिदीर्घकाळ रासायनिक प्रक्रिया होऊन त्यातून सूक्ष्म सजीव निर्माण होऊ शकतात, होतात व २) सूक्ष्म सजीवांतून तशाच दीर्घकाळाने अनेक (शेकडो हजारो) पिढय़ांनंतर, गुंतागुंतीची बहुपेशी शरीरे असलेले मोठे बहुक्षम प्राणी उत्क्रांत होऊ शकतात, होतात. त्यामुळे असे दिसून येते की, आज आपल्याला पृथ्वीवर दिसणारी बहुविध सजीव सृष्टी ही याच प्रक्रियेने इथे निर्माण झालेली असणार. म्हणजे मूलत: निर्जीव असलेल्या आपल्या भौतिक विश्वात, स्वयंचलित व पुनरुत्पादनक्षम सजीवांची-माणसासह सर्व सजीवांची-निर्मिती ही कुणा ईश्वराच्या इच्छेने, हुकमाने जादूने झालेली नसून, अतिदीर्घकालीन ‘उत्क्रांती प्रक्रियेने’ ती ‘आपोआप’ (म्हणजे कुणा ईश्वरी हस्तक्षेपाशिवाय) घडून आलेली आहे. परंतु झाले काय की मनुष्य जेव्हा रानटी किंवा निमरानटी अवस्थेत या जगात मोठय़ा कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचा प्रयत्न करीत होता तेव्हा भय, भूक आणि निसर्गाविषयींचे अज्ञान यांनी बेजार होऊन त्याने मानसिक आधारासाठी ईश्वर कल्पना रचली व ईश्वर दिसत नसल्यामुळे तो ‘अदृश्य, अमर, सर्वशक्तिमान व दयाळू आहे’ असे त्याने ठरविले. आता दुसरी मोठी अडचण अशी होती की माणसाला स्वत:चा ‘जिवंतपणा’ किंवा ‘प्राण’ म्हणजे नेमके काय व ‘मृत्यू होतो’ म्हणजे नेमके काय होते हे कळत नसल्यामुळे त्याने स्वत:ची सजीवता किंवा प्राण ही शक्ती ही त्या ईश्वराची खास देणगी आहे व ती आपल्या शरीरात कुठे तरी, बहुधा हृदयात सूक्ष्म किंवा अदृश्य रूपात त्याने ठेवलेली आहे असे कल्पिले व त्या कल्पनेला ‘आत्मा’ हे नाव दिले. या आत्म्याचा पुनर्जन्म होतो ही कल्पना जरी, भारताबाहेर निर्माण झालेल्या कुठल्याही धर्मात नाही तरी ‘आत्म्याचे अस्तित्व’ मात्र ‘ईश्वराचे अस्तित्व मानणाऱ्या’ जगांतील एकूण एक सर्व धर्मामध्ये आहे. त्यामुळे माणसाला अत्यंत दु:खदायक असलेल्या त्याच्या मृत्यूनंतर कुठे तरी स्वर्गात, ईश्वराच्या राज्यात त्याला पुन्हा सुखाचे जीवन आहे अशी कल्पना करता येणे शक्य झाले व माणसाने नेमके तेच केले. माणसाने त्याला ईश्वराकडून मिळालेला आत्मा एकमेवाद्वितीय, अदृश्य (भौतिकापलीकडील) व अमर आहे असे मानले. त्यामुळे जगांतील सर्व धर्मानी अशा आत्म्याचे अस्तित्व ठामपणे सांगितले आहे. पण हे झाले आध्यात्मिक अस्तित्व. याला ‘खरे अस्तित्व’ म्हणता येईल का, की ती केवळ एक मानवी कल्पना आहे, असा आता प्रश्न आहे!

खरेच आत्मा अशी काही वस्तू किंवा शक्ती आपल्या शरीरात कुठे तरी असली तर ती अमर असेल का? १) बरे असा आत्मा असलाच तर तो आपल्या शरीरात नेमका केव्हा प्रवेश करतो? तो बाळाच्या पित्याच्या वीर्यात, शुक्राणूत असतो का? की तो मातेच्या स्त्रीबीजात असतो? की तो गर्भ वाढताना निर्माण होतो? की बाळाची नाळ सुटून प्रत्यक्ष जन्म होताना, आत्मा त्याच्या शरीरात शिरतो? २) आणि आत्मा शरीरातून जातो केव्हा? मृत्यूनंतर? म्हणजे हृदय बंद पडल्यावर का? आणि एखाद्याचे बंद पडलेले हृदय जर पुन्हा चालू होऊ शकले तर तो आत्मा परत येतो का? कधी कधी ‘ब्रेड डेड’ माणूस भाजीपाल्यासारखा अनेक वर्षे जिवंत राहू शकतो. मग अशा त्या माणसाला आत्मा असतो की नसतो? आत्मा कोमात जाऊ शकतो का? ३) अमीबासारखे काही सूक्ष्म सजीव स्वत:च एकाचे दोन होऊन नवा जीव निर्माण करू शकतात. हिंदू धर्मात सर्व सजीवांना आत्मा असतो. तर एकाचे दोन झालेल्या त्या दोन अमीबांना दोन आत्मे असतात का? तो दुसरा आत्मा कुठून व कसा येतो? ४) सजीवांची शरीरे ज्या पेशींनी बनलेली असतात, त्यांना वेगळ्या करून स्वतंत्रपणे टिकविता, वाढविता येऊ शकते. आता एका शरीराला जर अब्जावधी पेशी असतात, तर त्यांना प्रत्येकी एक असे अब्जावधी आत्मे असतात का? ५) सध्या जीवशास्त्रातील आनुवंशिकता शास्त्रात चाललेल्या ‘स्टेमसेल्स रिसर्च’, ‘क्लोनिंग’ इत्यादीविषयी आपण सामान्य माणसांनीही काही ऐकलेले, वाचलेले असते. आता प्रश्न असा पडतो की बिनबापाची व तीन आयांचा काही अंश असलेल्या सुप्रसिद्ध डॉली या क्लोन मेंढीला ‘आत्मा’ कुठून मिळाला? की मेंढीला आत्माच नसतो असे तुमचे म्हणणे आहे? बरे मग माणसाचे क्लोन बनले तर त्यांना आत्मे कुठून व कसे येतील? ६) मृत व्यक्तीचे डोळे, मृत्यूनंतर दोन तासांत काढले तर ते गरजू अंधाला उपयोगी पडू शकतात. मग त्या डोळ्यात = जीवित्व नाही का? त्या जीवित्वाला आत्मा नसतो का? की त्यात आत्म्याचा काही अपूर्णाश शिल्लक असतो? ७) काही रोगांचे अतिसूक्ष्म विषाणू ज्यांच्या पेशी नसतात व जे स्वत: पुनरुत्पादन करू शकत नाहीत त्यांना सजीव म्हणायचे का? व त्यांना आत्मा असतो का? ८) सजीव वनस्पतींनासुद्धा जर आत्मे असले व एका बीपासून तयार झालेल्या एकेका वृक्षाला जर एकेक आत्मा असला तर अशा प्रत्येक बीमध्ये एकेक आत्मा असतो का? एखाद्या वृक्षावर जर शेकडो फळे व त्यात हजारो बिया असल्या तर त्यांत तेवढे हजारो आत्मे असतात का? व ते त्यात केव्हा आलेले असतात? ९) आत्मे अमर कसे होतात?

काही लोकांना असे वाटते की ज्याअर्थी जगातील ईश्वर मानणाऱ्या सर्वच धर्मानी माणसाची सजीवता त्याच्या आत्म्यामुळे असते असे सांगितलेले आहे, त्यावरून आत्मा खरेच अस्तित्वात असला पाहिजे. पण ते लोक हे लक्षात घेत नाहीत की विविध धर्मानी सांगितलेले आत्मे परस्परभिन्न आहेत. कसे ते पाहा. १) ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व झरथ्रुष्ट्राचा धर्म यांतील अमर आत्मा फक्त माणसालाच असतो, तर हिंदू धर्मात मात्र माणसाबरोबर सर्व प्राणी, पक्षी, क्षुद्र जीव आणि अगदी वनस्पतींनासुद्धा दैवी आत्मा आहे. २) ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व पारशी धर्मातील आत्मा हा ईश्वराने शून्यातून किंवा कशातून तरी निर्माण केलेला आहे, तर हिंदू धर्मात मात्र ईश्वराने तो ‘स्वत:मधून’ निर्माण केलेला आहे. ३) हिंदू धर्मातील आत्म्यांना मोक्ष मिळण्यापूर्वी लाखो पुनर्जन्म घ्यावे लागतात, तर पश्चिम आशियातील उगमाच्या धर्मातील आत्म्यांना प्रत्येकी एकेकच जन्म असतो. ४) हिंदूंचे आत्मे एकेकटे व वेळोवेळी स्वर्गनरकात जातात, तर पश्चिमी उगमाच्या धर्मातील आत्मे बहुश: सगळ्यांचा एकदम निवाडा होऊन, कयामतच्या दिवशी सगळे एकदमच स्वर्गनरकात जातात. ५) पारशी धर्मात विश्वाच्या अंती अगदी सर्व आत्म्यांना ईश्वर स्वर्गसुख देणार आहे, तर इतर कुठल्याही धर्मातील आत्म्यांना तशी गॅरंटी नाही. सारांश, सर्व धर्माच्या आत्म्यांबाबतच्या कल्पना एवढय़ा परस्परभिन्न आहेत की त्या त्या धर्माच्या गूढ ‘पारलौकिक जीवनासाठी’ रचलेल्या त्या मानवी कल्पना आहेत असे म्हणावे लागते.

सर्व धर्मामधील आत्मा ‘अमर’ आहे एवढे मात्र खरे. परंतु त्याचे कारण हे आहे की मुळात आत्मा ही ‘कल्पना’ रचली गेली ती त्याच्या अमरत्वासाठीच होय. आपले शरीर तर मर्त्य आहे. ‘मृत्यू’ या अटळ व दारुण वास्तवावर उपाय म्हणून तर आत्मा ही कल्पना अस्तित्वात आली. जनजीवनांतील अगणित अन्याय, अपार दु:ख व अत्याचार यांचे सर्वमान्य स्पष्टीकरण देता येत नसल्यामुळे, सर्वच माणसांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्माची फळे भोगण्यासाठी, मृत्यूनंतर दुसरे महत्त्वपूर्ण जीवन असणे आवश्यक होते. मग ते स्वर्गनरकात असो की आपल्या पुनर्जन्मात असो. त्यासाठी शरीराच्या मृत्यूने मरत नाही असे काही तरी शरीरात असणे आवश्यक होते व त्यासाठीच आत्मा आलेला आहे व म्हणूनच सर्व धर्मानी तो अमर आहे असे सांगितले.

सजीवांच्या प्राणाचे-जीवित्वाचे कोडे आज ‘संपूर्ण’ उलगडलेले आहे, असा दावा विज्ञानसुद्धा करीत नाही. परंतु जीवशास्त्र आपल्याला सांगते की माणसाचा जीव हा शरीरातील कुठल्या एका भागात केंद्रित झालेला नसून तो कोटय़वधी पेशींच्या स्वरूपात सर्व शरीरभर पसरलेला असतो. आपला श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण इत्यादी प्रक्रियांद्वारे या असंख्य पेशींना ऊर्जापुरवठा होऊन त्या पेशी सजीव बनून राहतात. या सर्व भौतिक रासायनिक क्रिया म्हणजेच सजीवत्व आहे. या सर्व क्रिया बंद होऊन ऊर्जापुरवठा थांबेल, तेव्हा पेशींचे कार्यही थांबेल आणि आपली प्राणज्योत मालवेल व आपण मरण पावू. एकदाच आणि कायमचे. दिव्यातील तेल संपल्यावर दिवा विझतो तसे. आधुनिक प्रगत मेंदू विज्ञानानेही आता सिद्ध केलेले आहे की आपल्या मेंदूच्या व मनबुद्धीच्या प्रक्रिया या केवळ मेंदूतील पेशींच्या ‘रचना’ व त्यांच्या ‘भौतिक व रसायनशास्त्रीय नियमांनी’ घडतात. तेव्हा आपली जीवनप्रक्रिया आणि मेंदू व मनबुद्धी (म्हणजे जाणिवा, संवेदना, व्यक्तिमत्त्व वगैरे) यांची कार्ये चालविण्यासाठी आपल्या शरीरात कुणी आत्मा असण्याची व मृत्यूनंतर तो निघून कुठे तरी जाण्याची काही गरज नाही. सारांश- आपल्या शरीरात आत्माबित्मा असे काही नाही, हे कुणाही विचार करणाऱ्या माणसाला पटावे, असे मला वाटते.

आपले ‘जिवंत असणे’ हा आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही. मनुष्य आपला ‘भौतिक, क्षणभंगुर मर्त्यजीव’ आणि त्याने स्वत:च कल्पिलेला ‘अमर आत्मा’ यांची गुंफण करून, त्याच्या अल्पायुषी, दु:खमय सजीवतेला तथाकथित शाश्वत आत्म्याचा मानसिक आधार घेत जगत राहतो, एवढेच खरे आहे.

 

  • Tags: soul,